मी मज हरपून...



त्यानं फोन स्विच ऑन केला. आताशा दोन आठवडे निघुन गेले होते. तो भानावर आला होता. पण राग काही शमला नव्हता.
चुकून कुठंतरी व्यक्त होऊ म्हणून त्यानं व्हॉट्सअप, फेसबुकवरचा स्टेटसही अपडेट केला नव्हता. 
रागाच्या भरात तिला फोन लावू म्हणून मुद्दाम फोनमध्ये बॅलन्सही भरला नव्हता. सगळं काही जाणीवपूर्वक. जाणूनबुजून. 

आज काही ती फोन करणार नाही. त्याला खात्री होती. दोन आठवडे फोन बंद ठेवल्यावर ती कशाला आपल्याला करेल फोन? 
तिलाही आला असेलच की राग. 

आपण करावा का तिला फोन? तिला बिचारीलाही आपल्यासारखंच वाटत असेल ना? एकटं एकटं. 

बट व्हाय शूल्ड अलवेज आय? हा विचार खाटकन त्याच्या डोक्यात शिरला.  तिला फोन करण्याचा विचार त्यानं सोडून दिला. स्वतःला उगाचच कशात तरी गुंतवून घ्यावं.. त्यानं ठरवलं.  पण कशात जीव गुंतवावा या विचारात असतानाच… फोन वाजला…

रिंगटोन होती… मी मज हरपून.. बसले गं.. आशा ताईंच्या आवाजातलं गाणं.. सखी मी मज हरपून…. बसले गं.. सुरु होण्याआधीचं त्यानं तप्तरतेनं फोन रिसिव्ह केला…  कानाला लावला.. फोन आलाच तर काय बोलायचं आणि काय नाही… हे आधीच ठरलेलं होतं. दोन आठवडे त्याच विचारात गेले होते… त्याने सुरुवात केली…

तो - हॅलो…
ती - हॅलो.. अरे आहेस कुठे तू..?
तो - मी इथेच..
ती - अरे किती फोन केले तुला.. मेसेज केले…
तो - हो.. ते माझं… आपलं.. ((सारवासारव करत))
ती - ..आपलं काय?
तो - आपलं नाही काही.. माझा फोन बिघडला होता…
ती - अच्छाच्छा… झालाय का ठीक आता?
तो - कोण?
ती - फोन.. बिघडला होता ना?
तो - हां.. होतोय हळूहळू..
ती - फार जुना झाला ना आता?
तो - हो… फारच जुना झालाय…
ती - बदलत का नाहीस तू फोन..?
तो - फोन काय केव्हाही बदलता येईल… पण फोनसोबत असलेल्या आठवणी नाही ना बदलता येणार
ती - तू पुन्हा रडवणार आहेस का मला?
तो - मी कधी रडवलं तुला…? तूला नेहमी हसवण्याचाच ध्यास होता..अजूनही आहे..
ती - बरं.. ते सोड
तो - सोडलंच आहे… 
ती - अजूनही रागवलाएस?
तो - कुणावर?
ती - माझ्यावर
तो - मी स्वतःवरच रागावलोय
ती - सॉरी अरे..
तो - युअर वेलकम
ती - आता तरी नीट बोलणार आहेस का?
तो - नीट.. ते कसं बोलतात?
ती - ते नाही मला सांगता यायचं
तो - ठीकय..
ती - आणि बोल
तो - खरंच बोलू?
ती - हो.. खरंच. मला ऐकायचंय तुझं.
तो - तू नको ऐकूस माझं. माझं तू ऐकलं असतंस तर..
ती - प्लीज ना रे.. किती दिवसांनंतर बोलतोय आपण…आता पुन्हा तोच विषय काढणार आहेस का?
तो - ओके.. ठीकंय… बोल मग तू..
ती - ठेवू का मी फोन..?
तो - अॅज यू विश
ती - ठेवते.. चालेल ना..?
तो - हम्म्म…
ती - बोलते नंतर.. लव्ह यू..
तो - खरंच लव्ह यू टू म्हणावसं वाटत नाहीये गं.. पण एक सांगू का?
ती - हो सांग नं…
तो - नंतर जेव्हाकेव्हा तू पुन्हा फोन करशील तोपर्यंत तुला फार अंतर पार करावं लागेल… 
ती - का..? …कशासाठी?
तो - माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी…बाय

फोन कट. 

यावेळी फोन कट केल्यानंतर त्यानं फोन ऑफ नाही केला. त्याला वाटत होतं, ती पुन्हा लगेच फोन करेल. त्याला रागवेल. ओरडेल. पुन्हा सगळं भांडण होईल. पुन्हा दोन जीव एकरुप होतील.

पण यातलं काहीचं घडलं नाही. यावेळी त्याचा फोन वाजला नाही. पण त्याच्या कानांना सतत भास होत राहीला… त्याच्या कानात आशा भोसलेंच्या आवाजातलं ते गाणं घोंगावत राहीलं..

मी मज हरपून बसले गं… 
सखी मी मज हरपून बसले गं…


क्रमशः


Comments