गेले द्यायचे राहुन


त्यानं तिला फोन लावला..रिंग वाजत राहली. शेवटी ऐकू आलं...नो आन्सर.
पुन्हा फोन लावला. पुन्हा तेच. प्रयत्न सुरुच राहिले. अखेर तो वैतागला.

वैतागून त्यानं प्रयत्न करणं सोडून दिलं. फोन दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवला.
वैतागलेलं मन स्थिर होण्यात काही काळ गेला. शांत होण्यासाठी पुस्तक हातात घेतलं.
तो पुस्तकात लक्ष केंद्रीत करू लागला. पण नजर सारखी फोनकडेच जाई..

अस्वस्थता स्थिर राहू देईना. फोन स्विच ऑफ करण्याचा विचार त्याच्या मनात येऊन गेला.
मरु दे..तो मनाशीच पुटपुटला. हातातलं पुस्तक टेबलवर आटपलं आणि फोन तिथंच ठेवून तो निघून गेला.

परत आला तेव्हा तिचा मिस कॉल होता... त्यानं लगेचंच कॉल बॅक केला…
यावेळी रिंग वाजली…
नो आन्सर ऐकू येण्याच्या काही क्षण आधी तिनं फोन उचलला..

ती- काय रे.. फोन करत होतास?
तो - हो..
ती - बोल.. काय झालं?
तो - काही झाल्यावरच फोन करायला हवा का?
ती - तसं नाही.. पण ३० मिस कॉल होते.. म्हणून म्हटलं..
तो - बोलावसं वाटत होतं..
ती - अच्छा..बोलं ना
तो - पण आता नाही वाटतंय बोलावंस
ती - का?
तो - वेळ टळून गेली आता
ती - सॉरी अरे, फोन सायलेन्टवर होता..
तो - ठिक आहे…इट्स ओके, मी ही सायलेन्ट झालोय आता.

ती - बोल ना रे.. काय म्हणतोएस?
तो- काही नाही.. ठिक
ती - काय करतोएस?
तो - काही नाही.. नेहमीचंच.
ती - हम्म.. बोल..
तो - ऐकतेस का जरा?
ती- हो बोल नं...
तो - ….नको.. जाउदेत सोड
ती - अरे.. असं काय करतोय.. बोल नं
तो - नाही… नकोच..
ती - बघ.. बोलून टाक… मनात काही ठेवू नकोस
तो - हम्म्
ती - नंतर तूलाच त्रास होईल..
तो - तूला कधीच त्रास होत नाही का?
ती - आता हे काय मध्येच
तो - मध्येच नाही.. मुद्दाम विचारतोय
ती - कसला त्रास
तो - एकूणचं सगळा
ती - मी समजले नाही
तो - तुला कधी समजणारचं नाहीयेस का.. माझा जीव का तुटतोय ते?
ती - तसं नाही अरे.. मला कळतंय पण..
तो - ..पण काय? काय कळतंय तूला
ती - हेच की तूझा त्रागा होतोय..पण म्हणून बोलायचं नाही..
तो - मग बोलायचं काय?
ती - काहीही बोल
तो - पण म्हणजे नेमकं काय बोलू?
ती - ते मी कसं सांगू
तो - बरं. 
ती - हम्म्म…. बोलं..

((तो काय बोलायचं याच्या विचारात असतानाच))
ती - नको रे फार विचार करुस.. नको त्रास करुन घेऊस.
तो - छे गं… आता जमतंय हळूहळू
ती - हम्म्.. गुड बॉय
तो - अगं तूला ते…
((त्याला विषय सुचलाच होता.. तितक्यात तिनं त्याला तोडलं..))
ती- ...ऐक ना.. नंतर बोलूयात का.. थोडं काम आलंय..
तो - नंतर कधी?
ती - नंतर.. वेळ मिळाला की
तो - वेळ मिळेल?
ती - मला नाही माहीत
तो - ..चल ठेवतो…बाय

त्यानं पटकन फोन कट करुन स्विच ऑफ केला. तिला बाय बोलण्याची संधीही न देता. 
नंतर ती त्याचा फोन ट्राय करत राहीली. पण यावेळी त्याच्या फोनची कॉलरट्यून ऐकण्याचीही संधी तिला मिळाली नाही..
पण तिला अजूनही वाटत होतं… की त्याचा फोन लागेल आणि त्याच्या आवडीचं ते गाणं तिला ऐकू येईल…

गेले द्यायचे राहुन, तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्या पास आता कळ्या आणि थोडी ओली पाने…

क्रमशः





Comments