शाहिर अ'मर' रहे..!




शाहीर अमर शेख यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून सुरुवात झाली. गुरुने त्यांच्यावर भलामोट्ठा ब्लॉग लिहीलाय. त्यात लिहीलेलं सगळच्या सगळं एकदम खरंखुरं आणि प्रामाणिक आहे. मलाही शाहिरांवर लिहावसं वाटतं होतं… पण काय लिहायचं हे नक्की होत नव्हतं. अजूनही नक्की होत नाहीये.

शाहीर अमर शेख मोठा माणूस. तुमच्या आमच्या सारख्यांना त्यांची किंमत नाही. हे उद्गार आहेत ते कोर्टचं म्युझिक ज्यांनी केलेलं ना…त्यांचे. शाहीर संभाजी भगत यांचे. आयला आपल्याला हा माणूस इंटरेस्टिंग का वाटू नये… हा प्रश्न मला पडला. पण जसजसं आम्ही त्यांच्या माहितीपटावर काम करू लागलो तसतसे आम्ही समृद्ध होत गेलो, हे खरंय. काम करताना अनेकदा कार्यालयीन व्यवस्थेचा गुरुला आणि मला प्रचंड त्रास झाला. पण सालं त्या अमर शेखांच्या दुःखापुढे आमचं दुःख काहीचं नव्हतं. म्हणून गपगुमान सगळं सहन केलं. एकदा तर एवढा राग आलेला.. पण एका शब्दाने काही बोल्लो नाही. त्याचं झालं अस्सं..

रोजा देशपांडे.. कॉम्रेड डांगेंची कन्या. त्यांचा या डॉक्युमेन्ट्री संदर्भात इंटरव्हू करायचा होता. कॅमेरामन फ्रेम सेट करत होता. मी त्याला सांगितलं आपल्याला टीपिकल फ्रेम नकोय.. तुला हवी तशी फ्रेम लाव पण न्यूज फॉरमॅट वाटला नाही पाहिजे. त्याने फ्रेम लावली. मला दाखवली. त्याला बोल्लो ही चांगली फ्रेमय.. पण ब्लँक आहे.. थोडी क्रीएडीव्ह करता येईल फ्रेम अजून.. कॅमेरामन पिसटला माझ्यावर. कधी डॉक्युमेन्ट्री पाहिलीये का.. फ्रेम वगैरे.. कम्पोझिशन.. ऐकलंय का कधी…असा उलट मला कॅमेरामनचा प्रश्न. आयला.. तळपायाची आग मस्तकातच गेली…मग आपण त्याला एवढंच बोल्लो… माफ करा हं.. चुकलं माझं…ही फ्रेम भारी लागलीये… रोल करुयात का?

आठवणीतली अजून एक गोष्ट अशी की… त्या दिवशी संभाजी भगत नुकते नाशिकहून सकाळी ९ वाजता मुंबईला पोहोचले होते… आणि आम्ही पोवाडे शूट करण्यासाठी लोककला अकादमीमध्ये जाणार होतो.. वाटेत असताना त्यांनी फोन केला आणि म्हणाले मी ही येतो सोबत. अख्खा दिवस ते आमच्या सोबत राहिले. आमच्या सोबत पोटभर गप्पा मारल्या. छान जेवले होते.. पण तरीही त्यांनी आग्रहावरून माझा सगळा डब्बा खाल्ला. 

काय गरज होती त्या माणसाला आमच्यासारख्या चिल्लर पोरांसोबत वेळ काढण्याची? ते ऑस्करच्या शेडूल्डचं काम सोडून आमच्यासाठी आले नव्हते. ते अमर शेखांसाठी आले होते. अमर शेख म्हणजे माझ्या बापासारखा माणूस आहे असं ते आम्हाला सांगत होते. हा मोठेपणा आहे. एका शाहीराने दुसऱ्या शाहीराला दिलेला. आपल्या मनात संभाजी दादांबद्दल प्रचंड आदर.. प्रेम.. जिव्हाळा.. आणि बरंच काही…म्हणजे अमेरीकेत जायच्या प्लॉनिंग पेक्षा आमची डॉक्युमेन्ट्री संभाजी दादांना जास्त जवळची वाटते ही आमच्यासाठी थोर गोष्ट होती.



शाहीर अमर शेख यांच्यावर डॉक्युमेन्ट्री आपल्याला करायचीये.. असं आमचे संपादक सर राजीव खांडेकर यांनी सांगितलं.. अगदी त्या क्षणापासून माझ्या मनात एक प्रश्न घर करून होता.. तो म्हणजे.. कोण बघणार हे..? आणि कोणी का बघावं हे…? यात काहीचं इंटरेस्टींग नाही. मला या प्रश्नावर उत्तर हवं होतं.. आणि ते उत्तरही संभाजी दादांनी दिल. ते असं…
संभाजी दादा - कसंय की आता जी व्यवस्था आपल्या आजूबाजूला आहे, तिनं आपल्या सगळ्यांना एक कन्झ्यूमर बनवून ठेवलंय. ग्राहक. आपण माणसं नाही आहोत. आपण ग्राहक आहोत. आपल्यासमोर कोणताच विचार नाही. आताच्या जनरेशनकडे कोणताच विचार नाही. ज्यांच्याकडे विचार आहे, असे ग्राहक व्यवस्थेला नको आहेत. शितल साठे तडीपार का आहे..? हे त्याचं उत्तम उदाहरण. तो कोर्ट मधला कांबळे का नको आहे..? का तर त्यांच्याकडे विचार आहे. आणि तो विचार कांबळे आपल्या शाहिरीतून इतक्या प्रखरपणे मांडतात की ते मासला अपील होतं. ते आपली अवस्था सांगतात. आणि ग्राहकांचं प्रबोधन करतात. ग्राहकांच माणसामध्ये कन्हवर्जन करतात. आणि हेच व्यवस्थेला नकोय. 
आताही आपण कुठेतरी व्हॉटअप, फेसबुक, इंटरनेट चे ग्राहक आहोत. त्यापुरते मर्यादित आहोत. थोडंपुढं गेलं तर नोकरदार ग्राहक. आयुष्यात आपल्या काय विचार आहे? ठोस? आपल्या भोवताली असं वातावरण व्यवस्थेनं निर्माण केलंय की आपल्यात कम्युनिश्ट, सेक्युलर, किंवा डावा-उजवा असा कोणता विचारच नाही. आपण भरडले जातोय, हे सांगण्याची ताकद ज्या शाहीरीमध्ये आहे, ती शाहीरीच मुळापासून उपटून काढली म्हणजे व्यवस्थेला बरोब्बर बाजार भरवता येतो. आणि यात व्यवस्था जिंकली. अमर शेख हरले. मी हरलो. तुम्ही हरलात. आपण सगळेच हरलो. हे ते कारण आहे.. ज्यामुळे आपल्याला ही डॉक्युमेन्ट्री महत्वाची वाटत नाही कारण आपण ग्राहक म्हणून विचार करतो.

कोण बघणार ही डॉक्युमेंन्ट्री… छे…छे.. याला काही ग्राहक नाही.. टीआरपी नाही. व्यवस्थेला हेच तर हवंय. मी सुद्धा ग्राहक म्हणून विचार करू लागलो. म्हणजे उद्या मी मेलो तर एक कस्टमर मेला असं होणार. व्यवस्थेसाठी माणूस नाय मरत. त्यामुळे या व्यवस्थेचा भाग असलेले ग्राहक ही डॉक्युमेन्ट्री पाहतील.. असं वाटत नाही…

दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेना… त्या शिवसैनिकांच्या महाराष्ट्र प्रेमाबद्दल आपल्या मनात भयंकर आदर.. पण जेव्हा ते पाकिस्तानींना मज्जाव करतात भारतात वगैरे येण्यासाठी, तेव्हा प्रश्न पडतो.… पठ्ठ्यांनो आडनावाने मुस्लिम असलेल्या मेहबूब हसन शेख हा माणूस… यानं आपल्या शाहीरीमुळे संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यासाठी हातभार लावला.. त्यांच्यासाठी तुम्ही काहीच देणं लागत नाही का…? शाहीरांसाठी एक कार्यक्रम मनसेनेही करायला हरकत नव्हती… एमआयएमनेही काहीतरी केलं असतं आज शाहीर अमर शेख यांच्यासाठी तर मज्जाच आली असती. सगळ्यांचीच थोडी-थोडी इमेज बदलली असती. पण तशी तुमच्याकडून कोणीच काही अपेक्षा करायला नको… अगदी पहिल्यापासून उपेक्षित राहिलेले शाहिर अमर शेख या ग्राहकांच्या भाऊगर्दीतही हरवलेत.. आपण त्यांना ऐकलं नाही… पाहिलं नाही.. वाचलं नाही…जाणून घेतलं नाही… तर आपल्या जगण्यात काही ग्रेट फरक पडणार नाहीच… पण जाणून घेतलं तर एक विचार मिळेल… त्यातून आपणच समृद्ध होऊ.. अमर शेखंच काय.. कोणत्याही शाहीराचं गाणं ऐकताना अंगावर काटा येतोच ना आपल्या..? म्हणजे केवढी ताकद आहे बघा या माध्यमात… पण हे माध्यमच नाही ना आता आपल्याकडे अस्तित्वात… आणि ज्यांनी ते अस्तित्वात ठेवण्याचा प्रयत्न केला.. त्यांना धरलं आणि ठेचलं या व्यवस्थेने…

असो.. झालंय असं की अण्णाभाऊ साठेंना मातंग समाजाने घेतलं तसं शाहिर अमर शेख यांना त्यांचा समाज तरी जवळ घेईल का असा प्रश्नय. अर्थात आजवर कोणी काही केलं नाही.. आता जन्मशताब्दीच्या निमित्ताने शाहीर अमर शेख यांच्याबद्दल कोण काही करेल, अशी अपेक्षा करणचं चुकीचंय. एनीवे.

शाहीरांनी त्यांच्या डायरीत लिहून ठेवलेल्या आठवणी खूप भारी आहेत. ते भालचंद्र नेमाडे आहेत की नै… त्यांच्या पांडुरंग सांगवीकरच्या डायरीसारखी खरीखुरी डायरी अमर शेख लिहीत असतं. आज घटस्फोट घेतला. पक्षाची भूमिका पटली नाही. आज मजा आली गायला. आज एक सुंदर मुलगी दिसली. मी तिच्या प्रेमात पडलो. असं सगळं भारी भारी त्या डायरीत लिहलेलं आहे. ते वाचताना अमर शेख आपले पंटर आहेत असं वाटत राहतं. थोर माणूस. थोरवी लिहावी तितकी कमी. 

या ब्लॉगचा शेवट कशाने करायचा असा विचार करत असताना आठवलं… मी आणि गुरुने शाहीर अमर शेख यांची डॉक्युमेंट्री केली आहे, असं कुठेच या ब्लॉगमध्ये लिहावंस वाटलं नाही. असं का? माहीत नाही. शेवटी एकच वाक्य… जे वेळोवेळी अनुभवायला आलं हे काम करताना… शाहीर अमर शेख यांची ही डॉक्युमेंट्री करताना 'मजा' आली… पण 'मजा' नाही आली. 

यु ट्यूबची लिंक पुढे आहेचबघा समृद्ध व्हावंस वाटलं तर करा क्लीक...



http://abpmajha.abplive.in/videos/amar-geet-special-story-on-shahir-amar-sheikh-154455

Comments

Vishal Dhondge said…
फारच छान लिहलय भावा