...दहीहंडीसाठी 'पुन्हा' वाट्टेल ते?




दहीहंडीला अजून तसा बराच वेळंय. पण पुढच्या आठवड्यात गुरुपौर्णिमेला गोविंदा पथकांच्या सरावाचा नारळ फुटेल.  पण खरंतर त्या आधीच दहीहंडीच्या बातम्यांचा नारळ फुटलाय. आशिष शेलार, प्रताप सरनाईक जोडीनं चॅनलवाल्यांना बाईट देताना दिसतायेत. साहसी खेळात दहीहींडीचा समावेश होण्याच्या शक्यता वाढल्याच ते सांगतायेत. नवी स्वप्न गोविंदा पथकांना दाखवली जातायेत. आनंदी आनंदय. आता दहीहंडीच्या उलट सुलट चर्चा सुरु राहतीलंच. पण पुन्हा एकदा या सीजनल बातम्यांना पेव फुटलंय. त्यावर प्रत्येक चॅनेलने एक-एक तासाचं डिस्कशन घेतलं तर आश्चर्य वाटायला नको. दहीहंडीबाबत थोडा सिरियसली विचार केला जातोय.. याचा आनंद आहेच.. त्याबद्दल कौतुक व्हायलाच हवं. पण…

बरोब्बर चार वर्षांपूर्वी..२०१२ मध्ये दहीहंडीवर डॉक्युमेन्ट्री बनवली.. दहीहंडीसाठी वाट्टेत ते… हे त्या डॉक्युमेन्ट्रीचं नावं. दहीहंडीने नवी ओळख दिलीये. जेव्हा डॉक्युमेन्ट्रीवर काम करायला घेतला, तेव्हापासून ते आत्तापर्यंत अजूनही हा विषय जैसे थेच आहे. म्हणजे दहीहंडीविषयीचे जे प्रश्न घेऊन आम्ही उत्तर शोधायला चार वर्षांपूर्वी बाहेर पडलो.. तेच प्रश्न काल परवा मला विचारले गेले… पुण्यातील एका लोकल न्यूज चॅनलने माझा फोनो घेतला…तेव्हा विचारले गेलेले प्रश्न हे आम्हाला चार वर्षांपूर्वीच पडले होते… त्यामुळे पुन्हा पहिले पाढे पंच्चावन्न होताना बघणं, थोडं अस्वस्थ करणारंय. असो. धंदाय आपला… उगा जीव लावण्यात अर्थ नाही.

दहीहंडी वर डॉक्युमेन्ट्री केलीये, त्यामुळे मला दहीहंडीबद्दल काही ग्रेट माहितीये.. त्यातलं रॉकेट सायन्स मला पूर्णपणे कळलंय, असं अजिबातच काही नाहीये… मुळात दहीहंडीवर माझ्यापेक्षा चांगलं बोलणारी माणसं आहेत… मग ते मुंबई टाईम्सचे प्रवीण मुळ्ये असतील.. गोवेकर सचिन परब असतील.. आयबीएनचे महेश म्हात्रे असतील… किंवा या सगळ्यांना मागे टाकणारी गोविंदा पथकांमधली.. सटासट थर रचणारी मंडळातली पोरं असतील.. एकूणचं यांच्या सगळ्यांच्या माध्यमातनं माझं म्हणणं मांडण्याचा मी छोटासा प्रयत्न केलाय… त्याच्या प्रोमो ला सात हजाराच्यावर हीट गेलेत… पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे.. आम्ही मुंबईतल्या उपनगरचा राजा समजलं जाणारं जोगेश्वरीच्या जय जवान या गोविंदा पथकाचा ही व्हीडीयो त्याच दरम्यान रिलिज केलेला त्याला पावणे चार लाखाच्या घरात हीट्स आहेत.. दोघांच्याही लिंक खाली दिल्यात.. पाहून घ्या...

दहीहंडीसाठी वाट्टेल ते 

जय जवान - ऑफिशीअल थीम सॉन्ग

पुढे माहितीपट पूर्ण झाला.. 
२०१२ मध्ये डॉक्युमेन्ट्रीला फेस्टीवल्समध्ये पुरस्कार मिळाले.. कौतुक झालं.. पेपरवाल्यांनी आमची चांगलीच दखल घेतली... नावं फोटो वगैरे छापून आले... मग आम्ही ही डॉक्युमेन्ट्री अक्षरक्षः गोविंदा पथकातल्या मुलांनी बघावी म्हणून जिथे मिळेल तिथे स्क्रिनिंग लावत सुटलो होतो… पण दहीहंडीची गोष्ट इथेच संपत नाही.. 




त्यानंतर दोन वर्ष गेली.. २०१३-१४… या दोन वर्षांत मी ग्राऊंड लेवलवर जाऊन दहीहंडी बघितली.. काहीसे विचित्र..काही चांगले.. काही खूपच वाईट.. तर काही विचार करायला लावणारे अनुभव आहेत.. ते शेअर करावेसे वाटले..म्हणून हे सगळं…

२०१४ ची गोष्ट… एबीपी माझानं एका पोराची स्टोरी केलेली.. दहीहंडी खेळताना कोणे एकेकाळी तो पोरगा थरावून पडला आणि त्याला लागलं.. तो अजूनही कसा जगण्याशी लढा देतोय वगैरे एन्गल होता स्टोरीचा… त्या पोराचं नाव काही आता आठवत नाही… पण यु-ट्यूब वर त्याची लिंक लगेच सापडते…स्टोरी फर्स्टक्लास झाली होती….पण ही अशी बरीच पोरं आहेत. साधारण याच एन्गलवर सचिन परबांनी लेख लिहीलेलाय.. त्याच्या ब्लॉगवरचा पहिलावाहिला लेखंय तो… प्रविण भुवड अमर रहे..त्याची लिंक खाली दिलीये… तो ही वाचयालाच हवा असा…


ह्या खेळाला-सणाला खरं तर न्यूजच्या टीवी मीडियानेच मोठं केलंय, असं म्हटलं तर आश्चर्य वाटू नये… सध्या एकूणच जे काही स्वरूप या सणाचं झालंय.. त्याला ४० टक्के जबाबदार टीव्ही आहे… ४० टक्के राजकारणी आहेत आणि १० टक्के गोविंदा मंडळं आणि १० टक्के तुमच्या आमच्यासारखे बघे या सगळ्याला जबाबदार आहेत…

प्रतिष्ठीत दहीहंडीचं आयोजन करणाऱ्यांमध्ये अनेक नावं घेता येतील.. पण त्या सगळ्यांचे जनक ठाण्याचे आनंद दिघे साहेब आहेत. दहीहंडीने राम कदमला आमदार बनवलंय, असं स्वतः आसबे सरांनी आम्हाला बाईट देताना सांगितलेलं. पण सालं यात काहीतरी झोल आहे.. गडबड आहे.. राजकारण आलं तिथं संपलंच सगळं.

जितेंद्र आव्हाड विरुद्ध प्रताप सरनाईक, जय जवान विरुद्धा श्री दत्त, रणझुंजार विरुद्ध पार्ले स्पोर्ट्स… ही फक्त प्रातिनिधीक उदाहरणंयत… अशा अनेक छुप्या स्पर्धा मी गेली तीन चार वर्ष पाहतोय. राजकारणही पाहतोय. एकाच मंडाळाची चार मंडळं झालेली पाहिलीयेत. या मंडळांशी असणारे राजकिय हितसंबंध पाहिल्येत.

पथकांची मंडळं आणि त्यांची कार्यकारणी सोडून आता थोडं लोअर लेवल बोलायचं झालं… तर ज्या पोरांना राजकारणतला र म्हणजे काय हे ही माहित नाही अशा सगळ्या पोरांचा सांस्कृतिक सणाच्या नावाने वापर केला जातोय. बरं ज्यांना थोडंफार कळतंय.. त्यांचे हात बांधले गेलेत.. काहीजण दहीहंडीच्या अशा एका थराला जावून पोहोचलेत की जिथून परतणं म्हणजे आत्तापर्यंत मिळवलेली प्रतिष्ठा-पुरस्कार वगैरेंना लाथाडण्यासारखं होईल, अशी त्यांची समजूत झालीये.

दहीहंडी एक ब्रान्ड झालाय.. त्यात मार्केटींग आलंय… पण तरीही माझ्यासाठी हा सण संमिश्र भावना देणाराच ठरलाय.. मी अजूनही ठामपणे सांगू शकत नाही की दहीहंडी चांगली की वाईट… किंबहुना जो दहीहंडीला वाईट बोलेल त्याला मी दहीहंडी चांगली कशी, हे पटवून देऊ शकतो आणि कोण चांगल बोल्ला तर त्याला ती वाईट कशीये हे ही समजावून सांगू शकतो… अगदी मुद्देसूद.. संदर्भासहीत स्पष्टीकरण देऊन…

गेल्या वर्षी मी मराठीवर लाईव्ह ला बोलवलंल.. दहीहंडीवर बोलायला… वयाची अट..उंचीची अट.. ह्याची अट..त्याची अट… असा काहीसा विषय होता… दोन मिनिटं मिळाली बोलायला फक्त.. त्यात मोडकी-तोडकी मांडणी केली.. पत्रकार संघात पण बरीच बडबड केलेली.. त्यानंतर दादच्या एका शाळेत पण बोलावलं होतं दहीहंडीवर बोलायला… पण मला डॉक्युमेन्ट्रीतूनच बोलायला आवडलं होतं… डॉक्युमेन्ट्रीमधला भावोजींचा बाईट आठवतो.. संपूर्ण डॉक्युमेन्ट्री मधला तो मला प्रचंड आवडलेला बाईट आहे …..बाईट असा होता…


"एक-दुसऱ्याला आपल्या खांद्यावर चढवून दुसरा पडणार नाही याची काळजी घेतात.. आणि आपल्यापेक्षा कोणीतरी वर जावं यासाठी कोणीतरी दुसरा खाली साथीला भक्कमपणे उभा राहतो.. हाच मोठा थॉट आहे दहीहंडीमधला, असं मला वाटतं." - आदेश बांदेकर

भावोजींनी दहीहंडीला मेन स्ट्रीममध्ये आणलं… आता एक छोटेखानी कार्यक्रम करायचं मनात आहे..
या डॉक्युमेन्ट्रीचं स्क्रिनिंग ठेवून मुंबईतल्या छोट्या बड्या गोविंदा पथकांना बोलवून एक चर्चा घडवून आणावी असं मनापासून वाटतंय.. या चर्चेत फक्त गोविंदा पथकातली पोरं असावीत.. कोणीही राजकारणी नको… या सगळ्यांकडे बोलण्यासारखं-सांगण्यासारखं खूप असेल असं मला वाटतं. करोडो रुपये हंडीवर खर्च होतात…उगागच कोणी का खर्च करेल एवढा पैसा… जेव्हा हा पैसा खर्च होत असतो तेव्हा दुष्काळ, आत्महत्या करणारा शेतकरी, महागाई, बेरोजगारी यांसारखे प्रश्न गौण असतात का… की आपल्याला या सगळ्या प्रश्नांशी दहीहंडीशी तुलनाच करायची नाहीये… दहीहंडी आनंद मिळवण्यासाठी की अजून कशासाठीये… आव्हाडांना एवढंच जर का सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी असं वाटत असेल तर लाखोनी खर्च होणारा पैसा द्या की शेतकऱ्याला…हे असं सगळं खदखदणं सुरुचंये.. यावर अजूननही नवीन काहीतरी करावं असं वाटतंय.. त्या पोरांशी संवाद साधता यायला हवा कसातरी करुन. पण नूसतं वाटतंय… 

दहीहंडीचं सिजनल महत्व मी जाणून आहे.. त्यामुळे बघू… आपल्या लेवलवर जमलं तर पुन्हा एकदा दहीहंडीसाठी वाट्टेल ते दाखवायला मला तरी मज्जा येईल…

तर सांगायची गोष्ट अशी की.. पुन्हा दहीहंडीसाठी वाट्टेल ते, दाखवावी असं आम्हाला वाटतंय… त्यासाठी काही करता येईल का आपल्याला.. तुम्ही-आम्ही… आपण मिळून काहीतरी करायचं का... मिळून वैचारिक थर रचायचे का… काहीतरी करायला हवं.. पण काय करावं ते क्लिअर नाही होतंय...

तुम्हाला काही सुचलं तर थेट संपर्क करा… ९८२०७६०३४४… तुमचाच, सिद्धेश



Comments