जगण्याचं 'अभय' मिळेल?


मॉर्निंग शिफ्ट केली आणि तसाच डायरेक्ट काल पत्रकार संघात गेलो होतो. रात्री यायला बराच उशीर झाला. खूप थकायला झालेलं. पुन्हा दुसऱ्या दिवसी सकाळी ऑफिस होतं. रात्रभर जुलाब… बाथरुममधनं बाहेर येण्याची खोटी… की पुन्हा मी आत. रात्र संडासात काढावी का असा विचार मनात येतच होता की त्यात बाबा उठवायला आले… अंगाला हात लावला तर अंग गरम….केवढा ताप आलाय… घामाघुम झालायेस.. बाबांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मी उठून बसलो अंथरुणात तर ही पाठ पुन्हा दुखायला लागली… सगळं अंग जड झालं होतं… लगेचच सरांना फोन करून बरं नसल्याचं सांगितलं… आणि तासभर झोपून लगेच मेडीकल चेकअपला बाबा घेऊन गेले… डॉक्टरांनी गोळ्या दिल्या… त्याने थोडं बरं वाटलं पण कालची रात्र काही केल्या विसरता येत नव्हती… त्यावरूनच दिनेश आठवला… अभयला दिनेशबद्दल सांगायला हवं… दिवसभर घरीच होतो… काय करू या विचारांत अजून थकवा येत होता.. फेसबुकवर बेरक्या ची पोस्ट पाहिली… ती अभयचीच होती.. च्यायला म्हटलं ब्लॉगवर लिहूच आज आपण अभयला… आज त्याला फुकटत सेलिब्रिटी वगैरे झाल्यासारखं वाटलं असेल… तर मिश्टर अभय कुमार देशमुख…

अरे ए... ऐक ना अभ्या.. तूला एक सांगायचं होतंएक मित्र होता…

…दिनेश. तू त्याला ओळखत नाहीस. दिनेशची आणि माझी एकदाच भेट झालेली. संतोष भिसेच्या चित्रावर एक लेख लिहीलेला. तो दिनेश ला फार आवडलेला. दिनेश सगळ्यांचा सिनिअर. एटीडीची ही पोरांची गँग.. अंधेरीला आकृतीजवळच्या म्हाडाच्या बिल्डिंगमध्ये राहायची. सगळे साले बॅचलर. त्यांत दिनेश सिनियर. बडबड्या…पीजे जोक करणारा… कविता लिहणारा.. रसिक माणूस. याला आता अॅड एजेन्सीमध्ये चांगली नोकरीही लागली होती. पण त्या िदवशी काय झालं कुणालाच कळलं नाही.. सकाळी उलटी झाली…साधारण साडेसातच्या सुमारास… नंतर तासाभराने रक्ताची उलटी झाली. रुमवरची पोरं ऑफिसला जायच्या गडबडीत. पण तशातही याला डॉक्टरकडे नेलं… डॉक्टरांनी लगेच हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितलं… डॉक्टरांनी गेल्यागेल्याचं तो मेल्याचं सांगून टाकलं. सगळी पोरं बिथरली.. वीशी-तिशीतली पोरं… स्वाभाविकपणे अशावेळी काय करावं, हे त्यांना सुचणारं नव्हतं. दिनेशला कोणताच आजार नव्हता. तो अॅटेकमुळं गेला असं डॉक्टरांच्या रिपोर्टमधनं समोर आलं. 

गावी असलेल्या आपल्या लहान भावाचं शिक्षण दिनेश बघत होता.. घरात अठराविश्व दारिद्र्य.. जगण्याचा संघर्ष करत आता कुठे तो मुंबईतल्या एका प्रतिष्ठीत अॅड एजेन्सीत सेटल होत होता. त्याच्या पगारावर घरं चालत होतं. पण आता काय…हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. एटीडीच्या मुलांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे एक फोटोग्राफी एक्झिबिशन भरवलं होतं. त्या पलिकडे ही मुलंतरी काय करणार आहेत.. त्यांनी बँकेत एक अकाऊंट ओपन केलंय… त्यात ही पोरं महिन्यामहिन्याला जमतील तेवढे पैसे टाकतात… ते दिनेशच्या घरातल्यांना मदत मिळावी म्हणून… बाकी शून्याच्या दिशेने प्रवास सुरू.

त्या दिवशी मॉर्निंग शिफ्ट होती. सकाळी नाश्ता करायला कँन्टीनमध्ये गेलो. दिपक पळसुले, प्राजक्ता धर्माधिकारी, कृपा विचारे आणि बहुतेक सचिन पाटील बसले होते. मी गेलो. त्यांच्यातच जाऊन बसलो. कृपा फार घाबरलेली दिसत होती. मोबाईलवर सारखी डोकावत होती. बाकीच्यांच्या रेग्युलर गप्पा सुरु होत्या. अभयला अॅटॅक आलाय… कृपाने मला सांगितलं.. बापरे… मी उडालोच. पण तो तर नाशिकला असतो ना… कृपा - हो… काल संध्याकाळी स्क्रिप्ट लिहायला बसला…. अचानक… पॅरेलिसीसचा अॅटेक. काही वेळासाठी स्तब्धच व्हायला झालं. जाऊन भेटून यायला हवं अभ्याला, नव्हे गेलंच पाहिजे. माझा निर्णय झाला होता. आमचे टीव्ही९ मधले विशाल, रणजीत आणि बहुधा व्हीडीओ एडीटर असलेला अखिलेश अभ्याला भेटण्यासाठी गेले होते. दुपारपर्यंत कळलं की आता तो बरांय. पण भेटायला जायलाच हवं होतं.

दुसऱ्या दिवशी अनायसे सुट्टी होती. मी आणि सचिन गव्हाणेने अचानक प्लान केला आणि तडक नाशिकच्या वाटेला लागलो. अडीच तासात नाशिक गाठलं. नाशिकमधल्या संतोष वाघचौरेंना भेटलो आणि त्यांच्यासोबतच सोपान हॉस्पिटलमध्ये अभयला भेटायला गेलो. दुसऱ्या माळ्यावर आत शिरल्या शिरल्या पहिलाच बेड. आम्हाला दोघांना बघून अभय थोडासा भांबावलाच होता. पण त्याच्या डोळ्यांत वेगळाच उत्साह दाटून आलेला. लगेच जागाबिगा करून आम्हाला बसायला दिलं… आम्ही जायला आणि त्याला आयसीयूमधनं बाहेर काढलेल्याल थोडासाच वेळ झाला होता. आमच्यासाठी चहा मागवला त्यानं… त्यानिमित्तानं त्यालाही प्यायला मिळेल म्हणून आम्हीही होकार दिला. जवळपास २ वर्षांनी अभयला भेटलो. अध्येमध्ये मी मराठीवर लाईव्ह देताना किंवा पीटिसी देताना त्याला बघणं व्हायचं. बाकी फेसबुकवरच्या फोटोत अभय दिसायचा तेवढाचं. पण बोलणं जवळपास बऱ्याच वर्षांनी झालं. पण अगदी कालपरवाचाच ताजेपणा आमच्या बोलण्यात होता. अगदी पत्रकारांच्या स्टोऱ्यांपासना ते पत्रकारांच्या पाणचटपणाबद्दल गप्पांचा फड रंगला. 

आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा अभय एकदम एनरजेटीक वगैरे असल्याचा आव आणत होता. मूळात जबरदस्त अॅटेक येता येता राहिलाय..असं त्याच्या बोलण्यातना कळत होतं. मी मराठीचा नाशिकचा रिपोर्टर म्हणून अभय देशमुखचं जेव्हा पण टीव्हीवर नाव यायचं तेव्हा आपला दोस्तंय असं सांगायला फारच भारी वाटायचं. पण त्या दिवशी अभय ज्या पोटतिडकिने नाशिकच्या एकंदरीत प्रवासाबद्दल सांगत होता.. ते निश्चितच संघर्षमय आणि स्ट्रेसफूल होतं. 

मंडळी मी तुम्हाला सांगतो, मुंबईत मुंबईबाहेरची पत्रकार मंडळी खूप आहेत. ती अतिशय क्वॉलिटी कामही करतायेत. पण त्यांच्या जगण्याच्या आपआपल्या वेगवेगळ्या समस्या आहेत, त्या फक्त पत्रकारांपुरत्याच मर्यादित नाहीयेत. तर प्रत्येकच क्षेत्रात आहेत. अभ्या टीव्ही९ मध्ये होता. एकत्र कामं केलंय सोबत. जेवणाचे डबे शेअर केलेत एकाच टेबलात. वयाच्या २८ व्या वयात पॅरेलिसीसचा अॅटेक येणं काही भूषणावह निश्चितच नाही. पण घरच्यांपासून कुठेतरी लांब राहायचं. जेवणाचे हाल. नविन माणसांशी रेपो व्हायला नाही म्हटलं तरी वेळ जातोच.. मग तिथल्या जिल्ह्याचा भुगोल अभ्यासायचा, तिथलं वेगळं नेटवर्क तयार करायचं… हे काही खायचं काम नाही. अभयनं हे सगळं निश्चितच यशस्वीपणे केलं. कशाचीही कधीच तक्रार केली नाही. 

पण हो.. अभय स्ट्रेसफुल होता. ताण कितीही म्हटलं की घ्यायचा नाही तरी तो त्याला आला होता. फक्त त्यानं ते बोलून दाखवलं नाही. त्याच्या जेवणाच्या वेळेत बिघाड झाला होता… पण जेवणाच्या काळजीपेक्षा कामाच्या डेडलाईन महत्वाच्या होत्या. आता हा कराडचा पोरगा. पुणे, मुंबई, नाशिक… असा ह्यानं पत्रकारीतेत प्रवास केला. काय आलं ह्याच्या वाटेला?… १५ हजाराची नोकरी?… महिन्यातून काही वेळा टीव्हीवर झळकण्याची संधी?… आणि पॅरेलिसीसच्या अॅटेकचे तीन स्ट्रोक? भलेही घरच्यांपासनं लांब येऊन पत्रकारीतेत आपलं करीअर करण्याचा व्यक्तिगत निर्णय अभयने घेतला असेल… पण २०१३साली अभयनं टीव्ही९ मधनं वारी कवर केली होती.. ते लेजेंडरी काम होतं. मी प्रोडक्शनला असताना आत्तापर्यंत असा एकही पोलाईट पोरगा पाहिलेला नाही जो पँकेज किंबहुना अॅन्कर व्हिज्युअल बाईट साठी आरडाओरड किंवा घाईगडबड करत तावातावात आला असेल. पण अभय कुमार देशमुख या सगळ्याला अपवाद आहेत. एका गुणी पत्रकाराच्या वाटेला अशा गोष्टी येणं दुर्दैवी आहे. हे लिखाण सर्वतोपरी भावनिक पातळीतून केलेलं असेल… नव्हे ते आहेच… पण या निमित्तानं एक गोष्ट सांगाविशी वाट्टे…

खरंच आपल्याला एवढी गरज असते का स्ट्रेस घेण्याची… कितीही डेडीकेटेड काम केलं तरी त्याच्या आऊटपुट आणि आऊटकमकडे प्रोफेशनली बघायचंच नाही का… मी मराठीने अभयची काळजी घ्यावी.. वगैरे सारख्या बाता करणं तर निव्वळ बोगस… मुळातच आपल्या सिस्टममध्ये काहीतरी त्रुटी शिल्लक राहिल्यात… त्या तपासून घेण्याचं, त्यावर पुर्नविचार, कृती वगैरे करण्याचा स्कोप आणि वेळ कुणाकडेच नाही… अभय सारख्याच्या कुटुंबियांनी आता त्याला नोकरी सोडून घरी बसवलं तर त्यात अजिबात आश्चर्य वाटण्यासारखं नाही… मुळात त्यांनी तसंच करायलं हवं. अभय आपली पिढी स्वतःला खूप ओव्हरस्मार्ट समजते… आपण जेवढं कमावयला जातोय…त्याच्या बदल्यात ही दुनिया आपल्याकडनं तिप्पट चौपट वसूल करतेय. वेळीच स्वतःला सावरून घ्यायला हवंय… 

अभ्या.. तुमच्या चॅनेलवर एक प्रोमो पाहिलेला आठवतोय… तुम्ही पत्रकार म्हणून नोकरी नाही करत म्हणे, पत्रकारीता करता… असे कसली घंट्याची पत्रकारीता… स्वतःच्या घरात अंधार झालेला असताना दुनियेला प्रकाशमान करण्याच्या गप्पा पत्रकार मारत आलेत, याची कित्येक उदाहरणं आहेत आपल्याकडे मित्रा. काळजी तर घ्यायलाच हवी ना मग. आपण पोटासाठी नोकरी करतो की नै.. मग नोकरीसाठी पोटाची उपेक्षा करायची नाय… छानपैकी कराडला जा… कांदेपोह्यांचा कार्यक्रम वगैरे कर… त्यातली एखादी पोरगी पसंत कर आणि आम्हाला बोलव लग्नाला लवकर… कुंभमेळा वगैरे गेला खड्यात… बचेंगे तो और भी लडेंगे वाले दिवस गेले रे बाबा… त्या दिवशी नशीब नाशिकमधल्या भावांनी लगेच त्या सोपन मध्ये अॅडमिट केला… त्यांना विसरून चालणार नाहीये कधीच..

आता दिनेश… अभय… यांच्यासारखे कित्येकजण असतील… ज्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नाही… माहिती असण्याचं काही कारणंही नाही… पण माझ्या पिढीतल्या जिवलग मित्रांनो……आपल्या मनात आतल्या आत खूप गोष्टी आपल्यात खदखदत आहेत… कोणी प्रेमात मार खाल्ला असेल, कोणाला नोकरी लागत नसेल, कोणी नोकरीत खुष नसेल, कोणाचं लग्न जमत नसेल, किंवा यापेक्षाही अजून कोणत्यातरी भलत्याच पेचात एखादा असेल… आपल्याला सगळ्या पेचप्रसंगांना वेळीच बांध घालायला हवं… त्यांची वाट लावता यायला हवी… कारण त्यांना खतपाणी घालणं आपल्याला परवडणारं नाही.. त्यामुळे आपल्या मनातल्या खदखदीला वाट करून देत राहायला हवी वेळोवेळी… नाहीतर.. अवघडंय..

बाकी छान वाटलं तुला भेटून अभ्या…आपला सेल्फीपण ऐतिहासिक फोटो होईल बघ आता... पण एकंदरीत आनंद मिळाला गप्पा मारून तुझ्यासोबत… हॉस्पिटलमध्येही आपली चमडीगिरी काही थांबलेली नव्हती…असो… वारीचे वेध तूला पुन्हा लागायला हवेत. माऊली साद घालतेय.. लवकर वाट धरं…  म्हणजे लवकरच जगण्याचं अभय मिळेल.. तूला.. मला.. आपल्या सगळ्यांनाच..

थांबतो.

तुझा मित्र,
शिsssद्या!


Comments

Unknown said…
आपल्या मनातल्या खदखदीला वाट करून देत राहायला हवी वेळोवेळी… नाहीतर.. अवघडंय..खरय तुझं पण … त्यासाठी एखादा तरी जिवलग मित्र असावा … ज्याच्याशी किंवा जिच्याशी सगळ सांगाव … वेल खूप सारे प्रश्न पडलेत तुझ्या पोस्ट वरून….