सुगंधी जखमा

आपला जन्म मुळातच मरण्यासाठी झालेला आहे, यावर त्याचा ठाम विश्वास होता. जगण्यासाठी जन्माला आलेल्यांना हे तो किंचाळून किंचाळून सांगू लागला होता. त्याला मरणाची एवढी ओढ लागली होती, की तो मरणावर प्रेम करायला लागला. मरण्यासाठी जगू लागला. कधीतरी श्वासांना थांबवायचंय म्हणून तो प्रत्येक श्वास मोजायला लागला. हृदयाच्या ठोक्यांचा अंतर्मुख करणारा आवाज त्याला मरणाची साद घालत होता. तल्लीन होउन, डोळे मिटून तो मरणाची वाट बघत होता. आणि तेव्हा त्याला फराज च्या दोन ओळी आठवल्या.
वफ़ा के ख़्वाब मुहब्बत का आसरा ले जा
अगर चला है तो जो कुछ मुझे दिया, ले जा...
कधी कोणे एके काळी तो कोणावर तरी प्रेम करुन हरला असेल. अदरवाईज अशी गझल कुणाला का आठवावी. तशाच मिटलेल्या डोळ्यांनी तो देशी दारुच्या त्या दुकानासमोर निमुटपणे जेव्हा झोपी गेला तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती.
पहाटेची चाहूल लागत होती. कुत्रे आळसावलेल्या आवाजात भुंकत होते. रुममेटचा फोन लागत नाही म्हणून आम्ही तीघे त्याला शोधायला बाहेर पडलो. नेहमीच्या नाक्यांवर चक्रा मारल्या. रात्रभर धावपळ. पोलिसांत जाण्याअगोदर १० वेळा विचार केला. पोलिसांकडे जायला तशी ही फारच भीती वाटत होती. म्हणून आम्ही पुन्हा शोधाशोध सुरु केली.
आणि पुलाखालची गर्दी पाहून आम्ही त्या दिशेने धाव घेतली. गर्दीतना वाट काढत आम्ही पुढे गेलो. तिथे तोच. डाव्या हाताची नस कापलेली... खूप रडून सुकून गेलेले डोळे, आणि दुस-या हातात सुरा. तिथे एक इसम त्याच्या नावानं शिव्या घालत त्याच्या बाजूला पित बसलेला ...मेलेल्या बॉडीला ठणकावून तो पिणारा सांगतोय.... -  ह्या असल्यांनीच मुहब्बत का नांम खराब करुन ठेवलंय.. स्टेमिना नाय तर पिरमात बिरमात पडायचंच कशाला... रात्रभर वफा आणि ख्वाब च्या बाता मारणा-या ह्या बेवड्याला कालच बोल्लेला आपुन....
वादा करके और भी आफ़त में डाला आपने,
ज़िन्दगी मुश्किल थी, अब मरना भी मुश्किल हो गया ..


आणि खिशातून एक चपटी काढून टॉप टू बॉटम मारली आणि तो पुन्हा पहिल्या पासना सांगू लागला. आपला जन्मच मुळात मरण्यासाठी झालाय, यावर ठाम आहे आपुन. जन्माला आलेल्या सगळ्यांना बोल्ला त्यो. त्याचं प्रेम आहे मरणावर. एन्ड रेस्ट इज हिस्टरी विथ पिस..
-क्रमशः

Comments