सांगण्यासारखी गोष्ट अशी... की

२०१४ आता संपायला आलंय. या वर्षात नाय बरेच डॉक्युमेन्ट्रीचे प्रोजेक्ट करायचं ठरवलेल. नाय नाय म्हणता त्यातले बरेच अर्धवट राहीले. काही फक्त डोक्यात अजूनही निपचित एका कोप-यात पडून आहेत. काहीं बद्दल खूपदा फॉलो अप करुनही एक्जिक्यूट करायला जमलेच नाहीत.
असं सगळं असतानाही खूप समाधानकारक वर्ष होतं २०१४ असं म्हणायला हरकत नाही.
या वर्षात अधिकाधिक कमरशिअल होत असतानाही स्वतःला करावेसे वाटणारे प्रोजेक्ट करता आले.. त्या साठी नोकरी सोडावी लागली नाही, याचं मला विशेष कौतुक वाटतंय. माझं मीच अभिनंदन करतो...

सांगण्यासारखी गोष्ट अशी... की

गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यात माझ्या हातून एक भयंकर अपघात घडला.
संध्याकाळची वेळ होती. देवगड हून गोव्याला बहीणीकडे तिचीच वँगेनार गाडी घेउन निघालो होतो. सोबत आई बाबा, आणि बहीणीचे सासरे होते. एकूण आम्ही चौघे जण.
आमच्या घरात बाईमाणूस सहसा कधी ड्रायवर च्या बाजूच्या सीटवर बसत नाही. हे असं का ते विचारलं नाही कधी.. पण आई एकटीच स्त्री कँटेगरी मध्ये असल्यामुळे मी तिला त्या दिवशी पुढे बसायला सांगितलं. त्याप्रमाणे ती बसलीही. साधारणपणे संध्याकाळी चार च्या दरम्यान आम्ही देवगड मु.पो. वळीवंडे हून गोव्याला बहीणीच्या घरी परतीच्या प्रवासाला निघालो.
आम्हा चौघांमध्ये गाडी चालवता येणारा मी ऐकटाच होतो. गाडी चालवताना मी सहसा फोन उचलतो... त्यासाठी वेगळी गाडी थांबवत नाही. पण त्या दिवशी मला कधी नव्हे ते संध्याकाळी तीन फोन आले. हे तीनही फोन मी पद्धतशीर पणे गाडी एका साईडला लावून मग घेतले. त्याच दिवशी मी असं का केल हे माझं मला अजूनही स्मरत नाही.
फोन झाल्यावर पुढच्या प्रवासाला लागलो. कणकवली सोडलं. आपला मुंबई गोवा हायवे रोड माझा फेव्हरेट ड्रायव्हींग ट्रँक होता. अजूनही आहे. कणकवली सोडल्यानंतर हलकासा सुर्यास्तानंतरचा अंधार पडू लागला होता. नाईट ड्रायव्हींग चे चांगलेच धडे मी मित्रांसोबतच्या पिकनीक मध्ये गिरवले होते. त्यामुळे अंधारामध्ये गाडी चालवणं..ते ही अशा हायवेवर जिथे स्ट्रीट लँम्प नाहीत... हे माझ्यासाठी फार आव्हानात्मक नक्कीच नव्हतं.
पंदूर तिटा आम्ही क्रॉस केला. नेहमीप्रमाणे माझी ड्रायव्हींग सुरु होती. मी ड्राईव्ह करत असताना ज्यांनी सोबत प्रवास केलाय त्यांना नेहमीप्रमाणे या शब्दाचा अर्थ कळेल. व्हँगेनर ८०-९० च्या दरम्यान होती. ८०-९०चा स्पीड मुंबई गोवा हायवेसाठी ग्रेट वेग नसला तरी अपघात घडायला २०चा स्पीड ही पुरतो.
तर... पंदूर तिटा आम्ही सोडला.
कुडाळ गाव लागण्याअगोदर बेळणे नदीचा अरुंद पूल लागतो. त्या पूलापासून जवळपास १.५ किमी चा स्ट्रेट रोड आहे.
सरळ रोड असल्याचा अंदाज घेउन मी गाडीचा वेग वाढवला. तो वाढवत असताना एक बाई रस्ता ओलांडत असलेली मला दिसली. ती बाई उजव्या बाजूने डाव्या बाजूला रस्ता ओलांडत होती. तिच्या अंगावर शर्ट आणि परकर होता.  एका हातात पिशवी आणि दुस-या हातात काठी होती. त्या बाईचा अर्ध्याहून अधिक रस्ता ओलांडून झाला होता. .पण पूर्ण ओलांडून झाला नव्हता. म्हणून मग मी गाडी उजव्या लेन मधून घेतली.
मी उजव्या साईडला थोडासा आलो.. तोच ती बाई आमच्या गाडीच्या दिशेने रस्त्याच्या मधोमधच आली. मी गाडी कंट्रोल करण्यासाठी हँन्ड ब्रेक खेचला.. लेग ब्रेक कचकचून दाबला.. गिअर पाच मधून सेकन्ड वर आणला.. कर्णकर्शश ब्रेक चा आवाज झाला.. ह्या सगळ्या घडामोडीत आई मला ओरडतेय..अरे अरे... एवढ्या सगळ्य़ात मी पूर्णपणे राईट लेन मधे गाडी ड्रीफ्ट करण्याचा प्रयत्नात होतो जेणेकरुन त्या बाईला गाडीची ठोकर लागणार नाही.
पण... तो पर्यंत उशिर झाला होता. गाडीच्या हेडलाईट ला असणारे गार्ड त्या बाईच्या पायाला आधी लागलं आणि कधीच पुढे न बसणा-या आईच्या बरोब्बर समोर काचेवर ती बाई जोरदार आदळली. गाडी रस्त्यावरना उतरतेय नं उतरतेय... तोच कशीबशी ती थांबली. थोडा अजून गाडी थांबायला उशिर झाला असता तर कदाचित आज हे सांगायला लिहायला मी ही जिवंत नसलो असतो.. कारण गाडी जरासाठी रस्त्यावरुन खाली कलंडायची राहीली होती. आईच्या समोरच त्या बाईला धडक बसल्यामुळे आई प्रचंड धास्तावली होती. बाबा आणि बहीणीच्या सास-यांना त्या अंधारात काय घडलं हेच समजायला थोडा वेळ गेला. गाडी थांबल्या थांबल्या मी आधी उतरलो आणि त्या बाईला पाहीलं...
मागून एक बाईक वाला येत होता.. तो म्हणाला खुळा आहे ता.. मेला ता.. नाय वाचूक.. खूप प्रयत्न केलंस, व्हायचा ता होवाचाच.. रस्त्यावर ती बाई उताणी पडली होती. तिचं डोकं फुटलं होतं. रस्त्यावर रक्तच रक्त.
मी स्वतःला सावरेपर्यंत आजूबाजूचे सगळे माझ्याभोवती गोळा. लोकं आता मिळून मला मारणार अशा भितीनी आई त्या घोळक्यात शिरली. मी पोलिसांना कळवा.. अँम्बूलन्स ला फोन करा.. आवेशाने उद्वेगाने आजूबाजूच्यांना सांगत होतो. कोणाचीच त्यावर काहीच प्रतिक्रीया नव्हती. सगळे केविलवाण्या नजरेने मला न्याहाळत होते.
बहीणीच्या मिस्टरांना फोन केला.. काही वेळांने त्यांचे मित्र आले.. पोस्टमार्टर.. अपघाताचे फोटो वगैरे सगळ्या तपासण्या घटनास्थळी व्हायला लागल्या. संपूर्ण रस्ता काही वेळ ब्लॉक होता.
गाडीत असल्यावर बाबा मला नेहमी म्हणायचे... सगळे दिवस सारखे नसतात. या गोष्टीचा प्रत्यय मला त्या दिवशी आला होता.
सगळी परिस्थिती पोलिसांकडे सुपूर्त झाल्यानंतर मला थोडं हायसं वाटू लागलं. पण NH17 .. आपल्या मुंबई गोवा हायवेची भीती कायमी मनात घर करुन राहिली. ज्या बाईला गाडी धडकली होती ती वेडी असल्याचं पोलिसांकडून समोर येत होतं. थोडंस निश्चिंत व्हायला झालं.
बापरे... ती वाई वेडी नसती तर... ह्या प्रश्नाने आजही अंगावर काटा येतो..
ही घडना घडल्यानंतर काही दिवस फार विचित्रच गेले. का ते वेगळं सांगयला नकोच.
हे सगळं घडून गेल्याला काही महिने लोटून गेल्यानंतर....
एप्रिल मध्ये एका राजकीय नेत्याच्या माहितीपटाचं काम करत होतो. तेव्हा मित्रांसोबत गप्पामधून या हाववेवर काहीतरी केलं पाहिजे हे डोक्यात होतं. त्यातून हा NH 17 चा विषय जन्माला आला. आणि त्यावर माहितीपट करण्याचं ठरवलं. योगायोगानं ठरवलेलं पूर्णत्वाला ही आलं.
तुमच्या समोर ही गोष्ट आणताना समाधान वाटतंय... एवढा निसर्गरम्य असलेला आपला हा रस्ता ड्रायव्हींगचा मनमुराद आनंद मिळवून देणारा असला तरी अतिशय डेंजर आणि रिस्क टेकींग आहे. तुमच्या आम्च्या सुरक्षिततेचा प्रश्न तर आहेच पण हायवेच्या आजूबाजूने असणा-यांचाही प्रश्न आहे. रस्त्याचं चौपदरीकरण आता होतंय. असं असतानाही वाटेत किती चौक्या आहेत पोलिसांच्या, सुरक्षेची काय साधनं आहेत..असं कितीतरी बरंच आहे.. जे या हायवे शी रिलेटेड आहे. ते या माहितीपटाच्या निमित्तानं मांडण्याचा प्रयत्न करतोय. डॉक्युमेन्ट्री काही फार ग्रेट असण्याचा माझा दावा नाही. मात्र किमान ह्या गोष्टींचा विचार करण्यासाठी तरी आपल्या मेंदूमध्ये थोडीफार उलथापालथ होईल, एवढी खात्री आहे.


सादर करतोय... NH17 – लवकर निघा.. सावकाश जा.. सुरक्षित पोहचा..!!

Comments