सॉरी रे बाप्पा..

ऐ बाप्पा.. ऐकतोयेस ना... तुझ्याशी बोलायचं होतं.. थोडं प्रायव्हेट होतं.. आहेस का तू ऑनलाईन...यू देअर...  ऑनलाईन दिसतोयेस तरी पण एका शब्दाने तुझा रिप्लाय नाही.. हे काही बरोबर नाही हा... मला राग येतोय आता तुझा... माझी सटकायच्या आधी प्लीज बोल ना काहीतरी.. अँटलिस्ट एखादी स्मायली तरी पाठव.. जेणेकरुन तू ऐकतोयस याची खात्री होईल मनाला.. बरं जाउदे.. मी सांगायचं काम करतो...

ऐक.. मी काय म्हणतो.. 

ते खरं तर तुला उद्या आणायला हवं होतं ना लोकांनी.. पण चारचार पाचपाच दिवस आधीच मंडपात आलायेस तू.. ठिक आहे.. कळतंय मला की तू बौअर झाला असशील कारण सोबत कोणी नसेल तुझ्या... पण उद्यापासून चांदीच आहे ना तुझी... पुढचे दहा दिवस तुझेच की... मग काय वर्षभर मोकळे आहेतच की सगळे.. वर्षभर चर्चा तर होणारच ना...

असो.. त्याचं काय झालं की लेख वगैरे वाचले रे मी तुझ्या उत्सवावरचे.. खूप बदलला वगैरे आहेस म्हणे तू... पेपरात बिपरात चर्चा आहे फुल ऑन... चेंच तर पायजेच ना राव... तो तुझा लालबागचा फंटर आहे ना... यंदा भारी काम झालंय बग त्याच्या डेकोरेशन चं.. हा.. आठवलं.. एक्च्युली एक डाउट होता.. ह्या ज्या तुझ्या एवढ्या सा-या मुर्त्या आहेत.. त्यातला तू वेगवेगळा आहेस... तुझं रुप वेगवेगळं आहे.. तुझे मालक वेगवेगळे आहेत... की अजून काही वेगळं क्रिएटीव्ह कॉन्सेप्ट वगैरे आहे तुझ्या डोसक्यात... एकदा काय ते क्लिअर कर..

अरे सोन्या... ह्या मुंबैवाल्याचं मरो... सार्वजनिक वगैरे सगळं थोतांडच रे.. तू का जातोस तिथे... नको ना जाउस.. सार्वजनिक उत्सव वगैरे म्हटलं की आमच्या टिळक आजोबांना वरतीच ग्लानी वगैरे येते असं वाचलं मी यमदूत.कॉम वर... पश्चाताप वगैरे होत असेल ना त्यांना... काय सुरु करायला गेलेलो आणि लोकांनी काय म्हणून हे मान्य केलं... अदभूतच की.. ऐनिवे..

     यंदा तर माझ्या डोसक्यात गेलायेस तू... तूला माहितीये का.. ते शिल्पकार कसल्या एकएक भारी मुर्त्या करतात तुझ्या... तुझ्यावर एक सिनेमा पण येतोय.. आम्ही पण एक डॉक्युमेन्ट्री करतोय की.. साला किती फोटोजेनिक आहेस माहितीये का तू... भेंडी फोटोग्राफरची हौसच फिटत नाही... कधी सोंडेकडून..कधी कानाकडून.. कधी पाठमोरा.. कधी आडोशाला.. दाही दिशा कमी पडत्यात तुझ्या चांगल्या अँन्गल साठी.. अमर्यादितच आहेस तू... पण तरीही पूर्णँ नाही रे.. काहीतरी गडबड आहे बघ
     दिवसातून दोनदा आरत्या... तू आपला चूपचाप... दगडात गेलासच का तू... हे काही तू योग्य केलं नाही... आता पण एकदम सायलेंन्ट मोड वर आहेस... तरीही दोन हात जोडतो आम्ही तुझ्यासमोर... तू आतमध्ये आहेस हे माहित असतानाही.. तुला नैवेद्य दाखवतो आधी... तू तो खाणार नाहीस हे ठाउक असतानाही... तूच सांग.. कितपत योग्य आहे हे... आताही काहीच बोलणार नाही तू... नेहमीचंय तुझं हे...
     तू ही आता पहिल्यासारखा राहिला नाहीस... सर्रास चंद्राकडे पाहिलेलं मी गेल्या वर्षी... काही चोरीचा आळ वगैरे आला नव्हता हं... ते आमचे दाभोळकर काका... त्यांचा नवस करायला यायचा विचार होता मनात... मारेकरी सापडले तर पुढच्या वर्षी सव्वा रुपये प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळाला देणार होतो... पण छे... तू इतका निर्दयी असशील असं नव्हत वाटलं मला... सोड.
     आता ही मंडळं टीव्हीवर झळकायला जोरदार पीआर करतील.. घरगुती गणपतींचे फोटो पेपरात छापून यावे म्हणून नातेवाईक ओळखी काढत बसतील... आणि त्यात ते तुझं नवीन फँड आलय ना.. इथला राजा... तिथला राजा.. आणि काय रे स्पर्धा वगैरे मध्ये जायला लागलास तू... अरेरे... कहरच केलास. तुझे आईवडील काहीच कसे नाही बोलत तूला... इतका कसा वाया गेलास तू... आणि मिरवणूकीत कोणत्या गाण्यांवर नाचायला लावतोस रे तू... काटा लगा पासून बघतोय... आता यंदा शिटी वाजेलच ना डीजेवाल्यांकडे... कसं काय सहन करतोस तू.. असं नाही करायचं रे... से सॉरी टू ऑल अदर लॉर्ड्स...
चल तू एकदमच निशब्द झालायेस.. आता प्लीज रडू वगैरे नकोस.. मला कळंतय रे की तुला माझं बोलणं लागलं असेल.. पण काय करु तू आपला वाटलास म्हणून बोल्लो... बघ जमलं तर सुधार आणि पार्वती काकू आणि शंकर चाचूंना विचारलं म्हणून सांग... आणि हो... रिद्धी सिद्धी ना... गोड पापा... उंदीर मामा वर जास्त लोड देउ नकोस... डाएट करत जा जरा... जिम वगैरे लाव... जिम वरुन आठवलं त्या खामकर ला फुकटचा अडकवलास.. असो.. त्याच्या ब्रांचेस उघडतोय तो मुंबईभर... बघ तुला जमेल तस जात जा.. आणि ते वाढलेलं पोट आत गेलं तर स्मार्ट दिसशील अजून... जस्ट किंडींग रे...
यातलं सगळंच मनावर घेउ नकोस... पण मनात आलं तर एकदा रिप्लाय कर... प्रत्येक वेळी मीच सुरुवात करायला हवी असंच काही नाही.. चल थांबतो.. ऑफिस सुटायची वेळ होतेय... बॉस आज लवकर गेलाय म्हणून लिहायला मिळालं.. जातो.. उद्या सकाळी बाबांची तूला करायला जीएसबी च्या मुंबईतल्या आपल्या सगळ्यात श्रीमंत फंटर कडे जायचंय. चल... ऑफलाईन गेलास... सॉरी रे बाप्पा..
    




Comments

Unknown said…
Waaaaaaaaah....he kharr kamaaal aahe🙏