गाववाल्या


फेब्रुवारी महिना जवळपास कोकणातच गेलाय. कोकणातच माझं गाव. मौजे वळीवंडे. तालुका देवगड. जिल्हा सिंधुदूर्ग. इथे माझ्या बाबांनी आणि तीन काकांनी मिळून एक सार्वजनिक घर बांधलय. म्हणजे चार भावांनी मिळून एकत्र घर बांधल. चारही भाउ चुलत हे नमूद करण्यासारखंच. ह्यांच्या सख्या भावांमध्ये १२ लफडी. एकाचा प्रोपर्टी वरुन वाद. दुस-याचा मान सन्मान देण्यावरुन वाद. तिस-याचाचा वाद काहीच नाही. पण बोलणं टाकलेलं. भाई माझ्याशी बोलत नाही म्हणून बापू भाईशी बोलत नाही. वगैरे वगैरे.
      अशावेळी हे एकत्र घर थोडं आश्चर्यकारकच. इथे होम होता. होम हा तसा इंग्रजी शब्द. अजबच आहे सगळं. तर त्या होमहवनाच्या दिवशी हा ब्लॉग मला सुचला. गृहप्रवेश होता. गणेशपूजन झालं. संध्याकाळी शैजारच्या गावातल्या भजनी मंडळाला भजनाची सुपारी मिळालेली.
      धन्य ते चार भाऊ...
धन्य ते घर..
धन्य धन्य धन्य ते भजनी मंडळ...
पायपेटी...चकी...मृदंग...टाळ...
      पायपेटीवर एक माणूस दोन हातांनी बटणांवर बोटं फिरवतोय. सराईतपणे. पायांखाली पेटीचा भाता मारताना तो डुलतोय. लयबद्ध मृदंग वाजवणारा एक तरूण त्याच्या पाया जवळच बसलेला. मृदंगाचा ठेका नाद लावणारा. चकी वाजवणारा परमोच्च आनंद लुटणारा. पायपेटीच्या समोर दहा-एक जणांचा घोळका.
भजन-मंडळ... ते काय गातायेत... कोणतं भजन त्याच्या ओठी आहे.. भजनाचे शब्द काय... काही सुद्धा कळत नाही...
      पण...
पण ते ऐकत राहावसं वाटणारं. त्यांच्या ठेक्यावर भक्तिभाव ओसंडून वाहणारा. मध्येच सगळे कोरसवाले सुमडीत टाळ काढून एकत्रितपणे चार ठेके देत वाजवणारे. मृदंगावर भजनी ठेका. हा आवाज भान हरपून टाकणारा.
      मधूनच एक माणूस येतो...पेटीवर बसून गाणा-या-वाजवणा-याला टिक्का लावतो. पेटीला हार घालतो. झालं.
      पुन्हा पहिल्यासारखं भजन सुरूये. अखंड.
      धिं धा धिंधिंधा..
      तिं ना धिंधिंधा..
...............................अबाधितपणे... कहर करणारा ठेका...!
बँन्ग...!
गाव... प्रत्येकाचंच असतं असं नाही. पण ज्याचं असतं, त्यांना तरी कुठे ते आपलं आहे, असं वाटतं. अशी उदाहरणं आपल्या आजूबाजूला बरीच. चांगली-वाईट दोन्ही.
      गाव म्हटलं की अगदी बेसिक्स् असलेलं लँन्डस्केप... त्यात नदी हवी. छान सुंदर कौलारु घरं हवीत. चार डोंगरांच्या मध्ये पायथ्याला देऊळ हवं. बाजूला नदी किंवा तलाव.  एक चौक हवा. चौकात नाका. नाक्यावर एस्.टी. चा स्टॉप. स्टॉपच्या बाजूला एकमेव असणारं असं गावातलं दुकान वगैरे. इत्यादी.

आपआपल्या इमँजिनेशनप्रमाणे गावची चित्र डोळ्यांसमोर उभी करा. ऋतू तुम्हाला हवा तो त्या गावात दाखवा. आता ते चित्र बाजूला ठेवून द्या.
      ह्या ब्लॉगमध्ये गावाबद्दल काही नाही. आहे ते गाववाल्या बद्दल. हा नागपूर गावचा...श्याम पेठकर. हे लेखक आहेत. पत्रकार आहेत. नागपूर. महाराष्ट्र टाईम्स. त्यांच गावझुला नावाचं पुस्तकंय. ते वाचलं. त्यांचं दुसरं काही लिहीलेलं आहे, असं माहित नाही. निश्चितपणे असेलच. पण हे वाचल्यावर दुसरं काही वाचण्याची हिम्मत नाही. हे माझं पूर्णपणे वैयक्तिक मत. चुक की बरोबर... ते फारसं महत्वाचं नाही.
राम शेवाळकरांना त्यांनी हे पुस्तक डेडीकेट केलंय. राम शेवाळकर कोण हे शोधायचा प्रयत्न चालू आहे. कोणाला माहित असेल तर मला जरूर सांगा. लिखाण abstract आहे. एकदम. कहर करणारं. ललितबंधानुभव म्हणतात साहित्यातले लोक या प्रकाराला.
      जेष्ठ पत्रकार संपादक सचिन परब यांच्याशी मस्करीत पुसत्क वाचतानाच्या दरम्यान बोलणं झालं.. त्यांनी मस्करीत म्हटलेलं की काही कळत नाही गावझुला. मी seriously घेतलं. मलाही नाही कळलं. खरंच. त्या संपादकांची प्रतिक्रिया आणि पुस्तक सुद्धा.
      पण..
पुस्तकात कला भरगच्च. वाक्यावाक्यांत. Dialogue वर Dialogues. एकदम भारीतले भारी. वाचताना मजा आलेली आणि आता ब्लॉगवर लिहीताना सुद्धा.
गावातले चार चुलत भाउ आणि गावझुला... तसा काहीच संबंध नाही. लावायचा प्रयत्न केलात तर उगाच त्रास डोक्याला आणि मनाला सुद्धा. Abstract...विचित्र विचार करायचा किंवा करायचा नाही, हे ज्यानं त्यानं ठरवावं.
      पुस्तकातली काही आवडलेली वाक्य जशीच्या तशी खाली copy+paste. फेसबुकवर ह्यातलं एकएक वाक्य स्टेटस म्हणून टाकायचा विचार आधी केलेला. पण नंतर टाळलं. म्हटलं एकदाच काय ते संग्रहीत ठेवलंल बरं... प्रत्येक नंबर नवीन स्टेटस...
एवढंच.
      Dialogue No. १. वाटेत लागलेली गावे पार करायची , मात्र कुठल्याच गावच्या वाटेला जायचे नाही.
२. तो आपला सकाळीचा परसदारी बसला होता. रात्रीनं कंदिलाच्या काचेवर जडवलेली काजळी पुसत.
३. निमुळती बोटं कलावंताच लक्षण असते.
४. विश्वास ही प्रकाशाची पहिली पायरी असते.
५. अनुभव आणि साक्षात्कार यांतला फरक कोणाला कळलाय
६. आतला अंधार काहीसा दूर झाला, पण उजेड मात्र दूर आहे याचे भान त्याला आहे.
७. पाणी भरुन ती निघून गेली, तेव्हा तिच्या घड्यातून झळकणा-या जलरेषांवर त्याचे काळीज हेलकावत झलकले.
८. हळव्या क्षणांच्या फसव्या आवाहनांना साथ द्यायची नसते.
९. मेंदीभरले हातही असतात अन् हळदीभरलं अंग केव्हाही पेट घेतं.
१०. आपल्यासारख्याच्याच अस्तित्वाच्या राखेतून इतिहासाची रांगोळी रेखाटण्याचा हा खेळ त्याला गमतीदार वाटतो.
११. आपल्यासारखीच जिवंत माणसे याच रस्त्यावरून स्वप्नांचे रंगीबिरंगी कपडे घालून मिरवीत गेली असतील.
१२. काळ देवांच्या मूर्तींनाही गिळतो.
१३. जिवंत देहाकडे जातिवंत भूक असेलच असे नाही, पण वासना असते आणि वासना शमविण्याची साधनेदेखील.
१४. त्याच्या बालपणी तो रडल्यावर आश्वासनांच्या आरशात त्याला भाकरीचा चंद्र दाखविण्यात आला होता.
१५. भाकर दिल्याशिवाय गाणं फुलत नाही. आई भाकर देत राहिली आणि लोक गाणं म्हणत राहिले.
१६. म्हणूनच कुठे जायचं अन् कुठे पाहचणार, हे प्रश्न त्याला पडले नाहीत. एकाच ठिकाणी पावन होण्यापेक्षा वाहता वाहता संपून जाणं त्यानं पसंत केलं.
१७. रक्ताच्या नात्यांपेक्षा अश्रूंच्या नात्यांची त्याला जास्त धास्ती होती.
१८. पाण्यावरच्या सावल्या तर अधिक फसव्या असतात. त्या ओंजळीत येत नाहीत अन् वा-यानं नादावतात.
१९. निसरड्या दगडांशी पावलांनी सलगी करायची नसते.
२०. ओंजळभर उजेड देतो अशा थापा मारणा-यांच्या मागे लोक धावतात.
२१. चुकल्याची खंत नाही अन् अचूकतेचा अट्टाहासही नाही.
२२. जळायचे की उजळायचे?
२३. मरणा-या विषमतेने ग्रासलेल्या दरीकाठी अमृताच्या ओव्या रचता येणार नाहीत.
२४. पाहणे आणि दर्शन घेणे यातला फरक आता त्या कळू लागला होता. डोळे असणे आणि नजर असणे यातल्या फरका इतकाच त्याला तो ठळकपणे कळू लागला होता.
२५. स्वीकार आणि अंगीकार यांतला फरक त्यांना कळत नाही.
२६. मला अश्रूंचे संदर्भ कळतात पण ज्यांच्या आयुष्याचं हसं होतंय त्यांना ते सांगता येत नाहीत.
२७. कातडीच्या आत माणसं सारखीच असतात रे.
२८. जे कधीच हाती लागत नाही त्याची ओढ वाटणे म्हणजे प्रेम.
२९. आत्मपीडा म्हणजे वेदना नव्हे.
३०. क्रौर्यानं आवाज दाबता येतील, काळजातलं गाणं बंद करता येत नाही. शौर्यानं भूभाग जिंकत येतील, माणसांवर राज्यही करता येईल, मात्र माणसं जिंकायची असतील कायमची, तर प्रेमच करावं लागतं.
३१. वाटांशी सलगी करुन कुणाचीतरी वळणावर वाट बघणं त्यानं केव्हाच मागे टाकलं आहे. वाटा तुमच्या कधीच नसतात. चालणा-याला त्या हव्या त्या ठिकाणी पोहचवतातच असेही नाही.
३२. भावनेचा ओलावा आहे पण ज्ञानाचा प्रकाश नाही. अशा सोवळ्या सहानुभूतीचं काय करायचं.
३३. मला शौर्य आणि सामर्थ्य यांच्या पलिकडे जायचं आहे. मी प्रवासीच आहे.
३४. सूर्याला विचारावेत असे काही प्रश्न त्याच्याकडेही असायचे.
३५. स्वतःचा करंटेपणा लपविण्यासाठी तत्वज्ञान पाजळवतोस तू... मी क्षणात तुझी ओंजळभर फुलं करून उधळवून देऊ शकतो.
३६. वासनांना मूळात पूर्णविरामच नसतो. वासनांना देह लागतो. अन् समाधान देहाच्या पलिकडची समष्टी असते. देहविहीन वासना वा-यावर सुटतात. त्यांची वावटळ होते.
३७.  प्राण्यांनाही दैवी अवतारांशी जोडले आहे. पण माणसांचे काय?
३८. संशयाला अद्याप शब्द मिळालेले नव्हते, पण, त्या संशयाला संदर्भ तगडे होते.
३९. पुन्हा येण्याचे आश्वासन देऊन निघून गेलेल्या युगंधराच्या वचनावर विश्वास ठेवून असंख्य पिढ्या पांगळ्या झाल्या. डोळ्यांनी वाट बघण्यापेक्षा उद्याचा दिवस बघावा.
४०. अस्तित्वाचा, अस्तित्वाच्या पलिकडच्या अलौकिकत्वाचा, आपल्या वारशाचा, स्थावरचा, आरशाचा अन् चेह-याचा देखील मोह नको...आपल्या असण्याची दखल पुढच्या पिढ्यांनी घेत राहावी, हा मोह मोठा अटळ. कठीणही.
४१. दगडांचे देव अन् माणसांचे दगड कशाला करायचे?
४२. सत्तेचे प्रश्न सुटत नाहीत. धर्म, बळ अन् पैसा यांच्या त्रिमितीत तो फिरत असतो. म्हणून सत्ता अन् सुंदरी चव्हाट्यावर आले की अधिकारासाठी लढाया होतात. लढायांना उत्तरे देता येत नाहीत.
४३. बोलता बरेच आले असते. बोलण्यासारखेही होते. बरेच. पण आता शब्दांना तारण ठेऊन काही समजावून घेण्याचे कारण राहिले नाही.
४४. माणसं मारण्यापेक्षा स्वाभिमान चिरडता आला तर सत्ता गाजविता येते.
४५.शब्दांना अर्थ नसतातच मुळी, अर्थ अभिप्रेत असतात माणसांना अन् त्याच्या अभिप्रेरणेच्या मागे त्यांच्या इच्छा, गरजा लपलेल्या असतात.
४६.सगळे धर्म,समाज, नियम हेच सांगत असतात. जुने खड्डे बुजवायचे, नवे तयार करायचे.


४७. चालणा-यांना थांबणे आवडत नाही. वेदनांपाशी थांबायला तर कुणीच तयार नसतं. वेदनांना वेग नसतो पण आवेग असतो. तो कुणालाच कळत नाही. ज्याला कळतो त्याला समजून घेण्याची कुवत इतरांत नसते.

Comments