अंधश्रद्धा निर्मूलन - समज आणि गैरसमज

         
पुराव्याअभावी एखादी गोष्ट स्वीकारण्याची आपल्या मनाची दृढ इच्छा म्हणजे श्रद्धा होय. अशी श्रद्धेची व्याख्या जॉन ड्यूईने केली. पुराव्याच्या आधारे मिळणा-या ज्ञानाचे क्षेत्र जसजसे वाढते तसतसे श्रद्धेचे क्षेत्र कमी कमी होत जाते. ज्ञानाच्या दृष्टीकोनातून श्रद्धेचे क्षेत्र कमी कमी होत जाते त्यामुळे श्रद्धेचे स्वरुप अभावात्मक आहे. अशी श्रद्धा व्यक्तिला कार्यप्रेरणा देते. यातूनच श्रद्धा आणि अंधश्रद्धेबद्दलचे समज आणि गैरसमज यावरील विचारमंथनास सुरुवात होते.
                      भारतीय तत्त्वज्ञानात श्रद्धा बुद्धी यांचा संबंध श्रुतिप्रामाण्यात दाखविला आहे. ब्रम्हजिज्ञासा, कर्मजिज्ञासा, योग आणि भक्ति यांचे आकलन होण्यासाठी श्रद्धा ही नेहमीच एक धार्मिक सद्गुण म्हणून आवश्यक बाब गणली गेली आहे. भगवद्गीतेतही श्रद्धावानाला ज्ञान प्राप्त होउ शकते - 'श्रद्धावान लभते ज्ञानम्', असे म्हटले आहे. म्हणून ईश्वराचे अस्तित्व दर्शविण्यासाठी श्रद्धा हा एक प्रमुख आधार मानला आहे. परमेश्वरावर श्रद्धा ठेवण्यासाठीच ती एक दिलेली प्रेरणा होय. श्रद्धा नसेल तर ते ज्ञान एक मत म्हणून शिल्लक राहते, असेही म्हटले जाते.
                      विज्ञान हे निरिक्षण परिक्षण यावरच प्रामुख्याने भर देते. धर्मात श्रद्धेवर भर असतो. यावरुन एक गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे मानवी जीवनाला धर्म विज्ञान या दोहोंचीही आवश्यकता आहे. म्हणूनच विज्ञान धर्म यांचे क्षेत्र वेगवेगळे असले तरी ते दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. धर्म आणि विज्ञान हे दोन विषय अनेकदा परस्परविरोधी आहेत, असे गृहित धरुनच त्यांच्याविषयी बोलले जाते. एखाद्या विषयाचा सुव्यवस्थितपणे अभ्यास केल्यास त्यातून विज्ञान निर्माण होते. हा विषय नैसर्गिक असेल तर तो प्राकृतिक विज्ञानाचा विषय असतो.
                      कोपरनिकस या वैज्ञानिकाने सूर्य मध्यावर असून पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा सिद्धांत मांडला. अर्थात हा विषय विज्ञानाचा असल्यामुळे धार्मिकांनी कोपरनिकसचा हा सिद्धांत पुराव्याचा विचार करुन मान्य करावयास हवा होता. आजही आपण सकाळी सूर्य उगवतो आणि संध्याकाळी मावळतो, असे अवैज्ञानिक भाष्य करतो. कोपरनिकसचा सिद्धांत आपण मान्य केला. मात्र दुर्दैवाने आचरणात नाही आणला. कोपरनिकस, ब्रुननो गँलिलिओ यासारख्या शास्त्रज्ञांचा त्यांच्या वैज्ञानिक संशोधनामुळे जिवंतपणी छळ झाला, तो ह्या मुळेच. विज्ञान महत्वाचे आवश्यक ज्ञान असले तरी ते अपूर्ण आहे. विज्ञाने अनेक प्रकारची असली तरी त्यांचा दृष्टीकोन निश्चित असतो.
                      माणसाने जगाचे स्वरुप, मानवी प्रात्पव्य कर्तव्ये . विषयी अनेक प्रश्न निर्माण केले आपल्या बुद्धिने या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. यातूनच तत्वज्ञानाचा उदय झाला. अशातूनच सेंट अन्सेल्म याने ईश्वराच्या अस्तित्वाविषयीचा सत्तशास्त्रीय युक्तिवाद अकवाव्या शतकात प्रथम मांडला. ईश्वर हा सुंदर सृष्टीचा निर्माणकर्ता असे कौतुक आजही केले जाते. मात्र अंध, पंगू, बधिर वगैरे अशा जीवांची निर्मिती परमकृपाळू, सर्वशक्तिमान ईश्वर का करतो? या प्रश्नाला उत्तर मिळत नाही.
                      धर्माची 'धार्यते अनेन इति धर्मः' अशी व्याख्या केली आहे. याचा अर्थ ज्यामुळे जीवनाला प्रेरणा मिळते तो धर्म होय. बहुतेक धर्म हे ईश्वरकेंद्री असून ज्या धर्मात ईश्वर मानलेला नाही तिथेही धर्म हा नीतीपेक्षा व्यापक असतो. असे असले तरी धर्म हा अनैतिक मात्र असता कामा नये. काही कृती ह्या केवळ धार्मिक म्हणून समजल्या जातात. त्यांना आपण शुद्ध धार्मिक कर्तव्ये असे म्हणू शकतो. उदा. परमेश्वराचे स्मरण करणे, प्रार्थना उपासना करणे. ज्याप्रकारची उपासना पद्धती स्वीकारली असेल त्यानुसार पूजा अर्चा करणे, . या कृत्यांचा संबंध माणसामाणसातील संबंधाविषयी येत नसला तरी अनेकदा त्यातूनच नीती अनीती विषयक प्रश्न निर्माण होऊ शकतात. उपासनेतही अघोरी उपासना करणारे अनेक संप्रदाय आढळून येतात. अशा उपासनेत नरबळी वा पशुबळी सारखे अघोरी प्रकार घडू शकतात. म्हणून नैतिकता ही धार्मिकतेचे एक महत्वाचे अंग समजले गेले पाहिजे. धर्मजीवन हे नैतिकतेपेक्षा अधिक व्यापक असले तरी ते नीतीविरोधी असता कामा नये.
                      एखादा धार्मिक तरुण वारंवार तीर्थयात्रेसाठी निघतो हे कितपत योग्य आहे? अर्थातच या तरुणाचे अशा प्रकारचे धार्मिक वागणे नैतिकदृष्ट्या बरोबर नाही. कारण तो तरुण कौटुंबिक सामाजिक कर्तव्ये सोडून जातो. खरा धर्म आपली अशा प्रकारची कर्तव्ये सोडून बाह्य कर्मकांड करीत बसा असे सांगत नाही. अनेकदा परलोकाच्या नावाखाली ऐहिक जीवन ऐहित मुल्ये यांच्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले जाते. म्हणून - 'धर्मार्थकामा सममेव सेव्याः'  धर्मानेच अर्थ काम या पुरुषार्थाची समानरित्या सांगड घातली पाहिजे. हा नियम ऐहिक पारमार्थिक जीवनात किंवा धार्मिक जीवनात योग्य सांगड घालणारा ठरतो. स्वतःविषयी ईश्वराविषयीची असलेली कर्तव्ये पार पाडताना आपल्या कौंटुबिक सामाजिक कर्तव्यांकडे लक्ष दिले पाहिजेदया, क्षमा, शांती, करुणा, प्रेम यासारखी जीवनमुल्ये सार्वत्रिक आहेत सर्वमान्य आहेत. सत्यनिष्ठा, प्रामाणिकपणा ही मुल्ये विज्ञानही स्वीकारते धर्मातही ती मान्य झालेली आहेत. म्हणून धर्म विज्ञान हे परस्परांना पूरक ाहेत अल्बर्ट आईनस्टाईन ह्या जगप्रसिद्ध वैज्ञानिकाने ह्या संदर्भात खालील उद्गार काढलेले आहेत.
 धर्माशिवाय विज्ञान हे पंगू आहे विज्ञानाशिवाय धर्म हा आंधळा आहे.
                      धर्मावर सामाजिक सांस्कृतिक घटकांचा परिणाम होउन कालमानाप्रमाणे धर्मात वापरल्या जाणा-या संकल्पनांचा अर्थ बदलत गेला. धर्माच्या नावे अनेकदा अंधश्रद्धांना ऊत येतो. विज्ञानामुळे या अंधश्रद्धांना उघड केले जाउन त्यांची हकालपट्टी केली जाउ शकते. खरा धार्मिक माणूस हा दया, क्षमा, शांती, प्रेम, करुणा, अस्मिता, भाव, पुरुषार्थ परोपकार, कृतज्ञता प्रार्थना ह्या मूल्यांवर भर देणारा असतो. त्यामुळे विज्ञानामुळे निर्माण झालेले नव तंत्रज्ञान तो ईश्वराची सेवा समजून लोकसेवेसाठी उपयोगात आणू शकतो. तसेच जगातील बहुसंख्य वैज्ञानिक हे ईश्वरवादी नैतिक मूल्ये मानणारे आहेत. ईश्वराचे अस्तित्व बौद्धिक किंवा तार्किक प्रमाणाच्या सहाय्याने सिद्ध करता येत नाही. त्यामुळे श्रद्धेच्या सहाय्याने ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलचा विश्वास व्यक्त करणाचा प्रयत्न प्रत्येक धर्मात केला जातो.
                      धर्म हाच एक भ्रम आहे, असे फ्रॉईड म्हणतो. मार्क्सने धर्माला अफूची गोळी म्हटले आहे. अर्थात चार्वाक, जैन, बौद्ध, जडवादी, यदृच्छवादी या सर्वांची भूमिका निरीश्वरवादी आहे. कल्पना कितीही केल्या तरी त्यातून कल्पनाच मिळतात. अशा कल्पनेतून खरे अस्तित्व सिद्ध होत नाही. खरे अस्तित्व अनुभवाने सिद्ध होते. पण तर्काने नव्हे. धर्म धर्मसंबंधी संकल्पना यांचे बौद्धिक विश्लेषण समीक्षा धर्माच्या तत्त्वज्ञानात केली जाते. अशी समीक्षा धर्मातील योग्य श्रद्धांना पोषक असू शकते वाईट श्रद्धा चालीरितांना मारक असू शकते. धर्माचे तत्त्वज्ञान धर्माचे समर्थन करण्यासाठी उदयास आलेले नाही. त्याचप्रमाणे धर्माचा नाशही करण्यासाठी ते प्रवृत्त झालेले नाहीत.
                      वैज्ञानिक ज्याप्रमाणे निसर्गाचे नियम प्रयोगशाळेत सिद्ध करुन दाखवितो, त्याप्रमाणे चमत्कारातून ईश्वरी सत्तेचे अस्तित्व सिद्ध होत असते. असे चमत्कार संतांच्या चारित्र्यातून वाचावयास मिळतात. योगशास्त्रात योगी पाण्यावरुन चालतो हा एक चमत्कार दिसून येतो. योगाने शरीराला समतोलपणा येऊन आत्मिकज्ञान प्राप्त होते. मनुष्य विदेही अवस्थेत जातो. त्यावेळी तो निसर्ग नियमांच्या पलीकडे जातो. ही जी आत्मनंदाची किंवा आत्मसाक्षात्काराची अवस्था आहे ती ईश्वरीसत्तेची अवस्था होय. परंतु त्याचा फायदा घेउन आज अनेक साधू, भोंदू ह्यांनी लोकांना फसविण्यासाठी चमत्काराचा धंदा केलेला आहे. खरे सत्पुरुष चमत्कार करीत नाहीत.
                      चमत्काराचा उगम हा मानवी अज्ञानातून होत असतो त्यामुळेच समाजाच्या अप्रगत अवस्थेत भोंदूगिरी, बुवाबाजी करणा-या बगत, मांत्रिक यासारख्या लोकांना चांगला वाव मिळतो. लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेउन हा वर्ग लोकांच्या मनात अंधश्रद्धा निर्माण करीत असतो. अनेक लोक त्यास बळी पडतात. श्रम पैसे वाया घालवितात. नंतर फसलो गेलो असेही म्हणतात. चमत्कार हे माणसाची बुद्धी आंधळी, पांगळी दुबळी करतात. त्यांच्यातील माणूसपण खच्ची करतात. त्यास दैववादी बनवितात. अशा प्रकारच्या चमत्काराला ईश्वरी सत्तेच्या ज्ञानाचे साधन मानले जात नाही. लोकांचे अज्ञान हा अशा प्रकारच्या चमत्काराचा प्रमुख आधार असतो. अशा चमत्काराला किंवा चमत्कार करणा-या बुवांना, बाबांना, गुरुंना, भगतांना, मांत्रिकांना, महाराजांना तत्त्वज्ञानात काही स्थान महत्व नाही.
                      धर्म ही एक श्रद्धेय पवित्र संस्था मानली जाते. अनेक चालीरीती धर्माच्या नावे समाजात रूढ दृढ होतात. त्यांची कालानुपरत्वे चिकित्सा होणे समाजाच्या दृष्टीने आवश्यक ठरते. पुरोहित हे धर्मोपदेशक असतात. त्यांचे व्यावसायिक हितसंबंध निर्माण होतात. ते शुद्ध खरा धर्म समाजाला सांगत नाहीत. अनेकजदा अधर्म धर्मनीति असेही होऊन बसते. अधर्माला धर्म समजले जाते. त्यामुळे धार्मिकांचे वा श्रद्धांळूंचे नुकसान होते. घातक चालीरीतींचा अवलंब केला जातो.
                      अनेक धर्म असल्यामुळे धार्मिक संप्रदायही अनेक आहेत. त्यामुळे अनेकदा सांप्रदायिक संकुचित अशी वृत्ती किंवा दृष्टी निर्माण होते. म्हणूनच धर्माच्या नावे अनेकदा जाती धर्मां-धर्मांमध्ये कटकटी कलह निर्माण झालेले दिसतात.
                      संतपरंपरा लाभलेल्या महाराष्ट्रातील संतांनी धर्मांधपणातील अंधश्रद्धांना कधीच गोंजरले नाही. उलट त्याचा कडक समाचार घेतला. संतशिरोमणी नामदेवरायांचे शिष्य संत चोखोमेळा यांनी तर या रोखठोकपणात आपल्या गुरुवरही कडी केली. खरं तर चोखोबाराय अत्यंत बुजरे, स्वत:कडं कायमच कमीपणा घेणारे. पण धर्ममार्तंडांविरुद्धचा बंडाचा खणखणीत आवाज पहिल्यांदा चोखोबांनीच उठवला असं बिनदिक्कतपणं म्हणता येईल. कारण देवाच्या नावानं भोळ्याभाबड्या लोकांना फसवणाऱ्या भोंदू बाबांचं ढोंगी रुप त्यांनी समोर आणलं.
माकडाचे परि हालविती मान। दावी थोरपण जगामध्ये।।
स्वहिता मुकले, स्वहिता मुकले। बळी झाकी डोळे नाक धरी।।
माळा आणि मुद्रा दाविताती सोंग। डोलविती अंग रंग नाही।।
पोटाचा पोसणा विटंबना करी। भीक दारोदारी मागितले।।
चोखा म्हणे जगामध्ये भोंदू। तया कोण साधू म्हणे देवा।।
                     चोखोबांच्या बंडाची ही पताका उंच धरली ती त्यांच्या कुटुंबाने. त्यांची पत्नी सोयराबाईने विटाळाचे अभंग लिहून तत्कालीन धार्मिक रुढींवर प्रश्नचिन्ह उभं केलं.

देहाचा विटाळ म्हणती सकळ।आत्मा तो निर्मळ शुद्धबुद्ध।।
देहीचा विटाळ देहीच जन्मला।सोवळा तो झाला कवण धर्म।।
विटाळ वाचोनी उत्पत्तीचे स्थान।कोण देह निर्माण नाही जगी।।
देहाचा विटाळ देहीच निर्धारी। म्हणतेच महारी चोखीयाची।।

                     वारकरी संतपरंपरेत असा एकही संत नाही की ज्याने या समाजाला छळणाऱ्या रुढी, परंपरा, अंधश्रद्धा, ढोंगी बुवा यांच्या विरोधात अभंग लिहिले नाहीत.
ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस असा आपल्या अभंगातून संत बहिणाबाईंनी वारकरी पंथाच्या उभारणीचा इतिहास सांगितलाय. संत ज्ञानदेव, नामदेवरायांनी रुजवलेल्या या बंडखोर वारकरी विचारांवर खऱ्या अर्थाने कळस चढविला तो संत तुकाराम महाराजांनी. बुडती हे जन देखवे डोळा येतो कळवळा म्हणूनिया म्हणत त्यांनी लोकांच्या अंधश्रद्धाळू मानसिकतेवर सणसणीत कोरडे ओढले.
वैद्य वाचविती जीवा। तरी कोण ध्यातें देवा।।
काय जाणो कैसी परी। प्रारब्ध तें ठेवी उरी।।
नवसें कन्यापुत्र होती। तरि कां करणें लागे पती।
जाणे हा विचार। स्वामी तुकया दातार।।

                     अलिकडच्या काळात या साऱ्या संतांच्या शिकवणुकीचं सार अत्यंत प्रभावीपणे सांगणारा एक महासंत होऊन गेला. संत गाडगेबाबा असं त्यांच नाव. अंगावर चिंध्या पांघरणाऱ्या या महामानवानं सर्व संतांचे क्रांतीकारी, अंधश्रद्धानिर्मूलनाचे विचार सांगत माणुसकीचं, स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं. प्रबोधन विचारांनी समाजाला गदागदा हलवून जागं केलं, भानावर आणलं. नवस-सायास, पुराण-पोथी, पूजा-अर्चा, गंडा-दोरा, स्वप्न-साक्षात्कार, अंगारा-ताईत, भोंदूगिरी आणि बुवाबाजीचं अवडंबर, अंधश्रद्धा याविरोधात बाबा टाहो फोडून लोकांना सांगत असत -
देव आहे कोण? समाज देव आहे. त्याची सेवा करा आधी. जिवंत देवाची सेवा केली पाहिजे. तुमच्या अकलेत माती पडली की कुठे चरायला गेली तुमची अक्कल? तुमचं घर तुमचं देऊळ हाय. तुमची पोरंच तुमचे देव. तुमचे कामधाम तुमचा धर्म. लिहिण्या-वाचण्याचं बुक म्हणजे तुमची पोथी. बह्याळानो! कायले बुवांच्या आन् भटाईच्या मागे धावतां?”

                     असे हे संतांचे विचार. वारकऱ्यांनी ते वर्षानुवर्षे जपले. वाढवले. अशा वारकऱ्यांचा जादूटोणा विधेयकाला विरोध...अशा बातम्या ऐकून वाचून मनाला क्लेश होतात. असं का होऊ लागलंय? याचं उत्तर शोधत गेलं की लक्षात येतं, या विधेयकाला विरोध करणारे खरे वारकरी नव्हेतच. वारकऱ्यांचं रुप घेऊन वारकऱ्यांमध्ये घुसलेले ते सनातनी धर्ममार्तंड आहेत. त्यांनीच तर वारकऱ्यांचा बुद्धीभेद करण्याचा, त्यांचा डोके फिरवण्याचा नियोजित कार्यक्रम हाती घेतलाय.
                     म्हणजे अशा प्रसंगांमध्ये वारकऱ्यांच्या खांद्यावर आयती बंदूक ठेवता येते. सोयीनं त्यांना वापरून घेता येतं. वारकऱ्यांमधली ही घुसखोरी काही आजची नाही. ती आहे, जवळपास अठराव्या शतकातली. धाकटे बाजीराव पेशवे लवाजम्यासह पंढरपूरच्या वारीला जाऊ लागले तेव्हापासूनची. बाजीरावानं पंढरपूरचा जणू पिकनिक स्पॉट केला. हीन राजकारणाचा अड्डा केला. इंग्रजांचा पाठींबा असलेले बडोदयाचे वकील गंगाधर शास्त्री पटवर्धनांच्या खुनाचा डाग याच पंढरपुरात बाजीरावाला लागला आणि पेशवाईच्या पतनालाही इथूनच सुरुवात झाली.
                     पण याच काळात घडू नये ते घडलं. शतकानुशतके समन्वय आणि एकी टिकवणाऱ्या वारकऱ्यांमध्ये दुफळी निर्माण होऊ लागली. आपल्या सोबत्यांच्या जातीपाती टोचू लागल्या. या गाफील वारकरी समूहात सनातनी घुसले. वारकऱ्यांकडून संतांचा क्रांतीकारी उपदेश मागे सुटू लागला. त्या पोकळीत  हिंदुत्त्ववाद्यांनी शिरकाव केला. वारकरी कट्टर धर्मवादी होऊ लागले. महाराष्ट्रातल्या अभ्यासकांनी, पुरोगामी, डाव्या विचारवंतांनीही या शेकडो वर्षांच्या सर्वसमावेशक वारकरी विचारधारेचा देव, धर्मवादी दैववादी म्हणत उपहास केला. तिथंच सगळा घोटाळा झाला.
                     ज्यांनी वारकऱ्यांचा सर्वसमावेशक, समन्वयवादी धर्म समाजाला समजावून सांगितला, कोणाही जीवाचा घडो मत्सर। वर्म सर्वेश्वर पूजनाचे असा तुकोबारायांचा दाखला देत खरा बंधुभाव सांगितला, त्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र विसरला. दुर्दैव असं त्यांच्या नावाने पुण्यात असलेल्या पुलावरच विद्वेषवादी प्रवृत्तींनी डॉ. नरेंद्र दाभोळकरांचा निर्घृण खून केला!
                     हा असा आहे का आपला धर्मकोणताही धर्म हा मानवतेच्या विरुद्ध नसून मानवता धर्माचे तत्त्व सांगतो. सर्व धर्मांचे अंतिम सत्याचे मार्ग जरी भिन्न असले तरि ते एकाच अंतिम सत्याकडे येतात, असं स्वामी विवेकानंद म्हणतात. वस्तूस्थितीचे वा सत्याचे भान ठेवणारी अशी श्रद्धा कोणत्याही वस्तूचे वस्तूनिष्ठ ज्ञान देऊ शकत नाही. यालाच अंधश्रद्धा म्हणायला हवी.


                      धर्म अनेक असल्याने प्रत्येक धर्मातला इतिहास असल्यामुळे धार्मिक संकल्पनांनाही इतिहास असतो. संकल्पनेचे विश्लेषण करताना त्या संकल्पनेमागील गृहितके त्या संकल्पनेतून निष्पन्न होणारी तार्किक विधाने लक्षात घेतली जातात. असे करीत असतांना विसंगती आढळल्यास ती विसंगती स्पष्टपणे दाखविली जाणे गरजेचे अनिवार्य असते. सुसंगत विचार करीत असताना अनुभवाला येणा-या गोष्टीचाही विचार करावा लागतो. विचार अनुभव यांच्यात विसंगती आल्यास विचार नव्या रुपात मांडला गेला नाही तर अंधश्रद्धेला बळी पडणा-यांची संख्या वाढतच जाईल.

Comments