लिलाव

मी जगतोय स्वातंत्र्यात
भोगतोय गुलामी
स्वातंत्र्याची...
मला नाही हक्क
इथल्या व्यवस्थेत बोलण्याचा 
तरी मी अभिव्याक्तिच्या
अधिकाराची मालकी
खिशात घेउन फिरत असतो
माझ्या बोलण्याने 
तसा फारसा फरक पडत नाही
कुणालाच...
कदाचित
मी भान हरवलेला
प्राणी आहे
माझ्या एका हातात
संस्काराची शिदोरी असते
आणि
एक हातात धारदार शस्त्र
हे शस्त्र मी रोज वापरत असतो.
श्वासावरती येणारी जळमटे
दूर करण्यासाठी
मी मोजत असतो
माणसांचा प्रामाणिकपणा
अन् डोकावत असतो
आतल्या तळात
मी शोधात असतो
मलाच माझ्या अंतरंगात
माझी गत तीच
आत्मा हरवलेल्या 
शरीरासारखी
मी कोण?

व्यवस्थेच्या तुटलेल्या 
पादत्राणांना जोडणारा 'खिळा'
मी कोण?
माझ्याच घरात
ति-हाईतपणाची वागणूक
सोसणारा
मी कोण?
त्यांना नकोस
असलेला
'शापित अर्थ'
तरी मी
लढत असतो
झुंजत असतो
इथल्या अर्थकारणाशी 
समाजकारणाशी
संस्कृतीशी
कारण 
मी अजून आत्म्याचा 
लिलाव केला नाही!

Comments