कोण आहे रे तिकडे जिवंत??


शायद वहा पहोचे ना जमाने की नजर
जो जख्म मुझे तेरी मोहब्बत ने दिये है....
असं गालिब म्हणतो... जख्मी होण ं हे जिवतपणाचं लक्षण आहे... या जिवंतपणा वर लिहायचं होतं...कारण एका मित्राने एक साधा प्रश्न विचारलेला मला. आपण बस ट्रेन मधून फिरतो... आपल्या बाजूला बसलेला-उभा असलेला माणूस कोण आहे हे आपल्याला का माहित नसतं...? अस्वस्थच झालो... आयुष्याचं होतं तेवढं सगळं ज्ञान पाझळावं असं वाटलं... म्हणून मग हे लिहावंस वाटलं...!

लेखांच नाव आहे - 'कोण आहे रे तिकडे जिवंत..?'
     गिरगाव व्हाय दादर हे नाटक पाहिलं... ब-याच दिवसांपासून पाहायचं राहिलेलं... मित्रांकडून खूपसं चांगलंच एकून होतो नाटकाबद्दल... त्यामुळे अपेक्षा ही ब-याच होत्या... आणि त्यातल्या ब-याच पूर्ण झाल्या... नाटक पाहिल्यावर मी आणि एक मैत्रीण त्यातल्या ब-याचशा गोष्टींवर टिका करत होतो... सुधार सुचवत होतो... पण त्या नाटकाच्या प्रयत्नाला आमचा सलाम होता... आणि अजून चार एक लोकांना घेउन पुन्हा येउ नाटकाला असं ठरलं होतं... मात्र हे नाटक पाहण्याआधी किंवा कोणतंही नाटक पाहण्याआधी आणि नंतर... जग तेच होतं...तेच राहणार आहे, पण आता काहीतरी जिवंत आहे असं वाटत होतं...
    ओशो बद्दल बरंचस वाचन घडलं... त्याच्या बद्दल ही बरंचस वंगाळ ऐकून येतो.... आणि थोडंसंच चांगलं माहिती होतं... ओशो ने ब-याचशा लोकांना प्रभावित काय केलं, तो माणूस आयुष्य कसा जगला, त्याचे विचार काय, त्याने स्वतःच पोट कसं भरलं आणि तो मेला कसा... असं बरंचसं... अजूनही ओशो वर अभ्यास चालूये... पण तो पूर्ण करण्याची इच्छा मेलीये... मात्र ओशो वर अभ्यास केला पाहिजे असं सांगितल्यापासून दोन एक मित्र ओशो चं साहित्य घेउन त्याच्या विचारांच्या पाठीच लागलेत... पण हे विचार कळायच्या आधी आणि नंतर... जग तेच होतं... तेच राहणार आहे, पण आता काहीतरी जिवंत आहे असं वाटत होतं...
    एनसीपीए मध्ये चित्रपट महोत्सवात एक माहितीपट पाहिला... आनंद पटवर्धन यांनी बनविलेला... तो पाहून माझ्या एका बुजूर्ग मित्राने त्यांनी बनविलेले जवळपास सगळे माहितीपट विकत घेतले... ते पाहायला त्यांच्याकडे वेळ फार नाही हा वेगळा विषय आहे... तो पिक्चर आणखीन पाचसहा जणांनी पाहावा म्हणून त्यावर एक ब्लॉग ही टाकलेला भावनेच्या भरात... आणि माझे काही उपद्व्यापी दोस्त गेलेही पाहायला... जे मित्र पाहायला गेले आणि जे नाही गेले, सगळ्यांच्या आधी आणि नंतर... जग तेच होतं... तेच राहणार आहे, पण आता काहीतरी जिवंत आहे असं वाटत होतं...
    काळा घोडा फेस्टिवल लागतो मुंबईत...दरवर्षी... गेली तीनही वर्ष जातोय मी तिथे... मात्र ह्या वर्षी सुरुवातीचे तीनही दिवस गेलेलो... तिस-या दिवशी तिथे एक लायटर वाला दिसला... सिगरेट पेटवण्यासाठी उपयोगात येतील असे कसले कसले भारी भारी लायटरचे तो डेमो आम्हांला दाखवत होता... ते पाहून मी आणि माझा मित्र चकीतच झालो... लगेच दम मारणा-या दोस्तांना फोनाफोनी करुन ते लायटर विकत घ्यायला सांगितले... शेवटच्या दिवशी त्यातला एक म्हणाला- “संपले लायटर... कालाघोडा ला जायच्या आधी आणि नंतर... जग तेच होतं... तेच राहणार आहे, पण आता काहीतरी जिवंत आहे असं वाटत होतं...

      गेल्याच आठवड्यात एक मित्र लोणावळ्याजवळच्या कार्लाच्या लेण्या बघायला घेउन गेला... कसल्या भारी होत्या... लेण्यांमधलं आपल्याला काही कळतं नाही... पण कसं काय एवढं कोरिव काम अचूक केलं असेल त्या काळी... ते पण दगडात... ते बघायला किती जण जातात हे पाहावं म्हणून मग त्यांचं कौतुक वाटू लागलं होतं... लेण्या पाहून यायच्या आधी आणि नंतर... जग तेच होतं... तेच राहणार आहे, पण आता काहीतरी जिवंत आहे असं वाटत होतं...
    या वर्षीच्या सुरुवातीला माथेरान ला गेलेलो... कशाला तर माहित नाही... जावसं वाटलं म्हणून गेलो... तिथे जाउन खूप काही शिकलो असं नाही... पण बरेचसे चांगले अनुभव मिळाले... मग त्या अनुभवांनी शिकवलं... आणि मग बेमुराद आनंद लुटला... माथेरानला जायच्या आधी आणि नंतर... जग तेच होतं... तेच राहणार आहे, पण आता काहीतरी जिवंत आहे असं वाटत होतं...
    माझं हे शेवटचं वर्ष आहे...कॉलेजचं... पण गेले काही महिने मी खूपच टाळाटाळ करत होतो कॉलेजला जाणं... अखेर माझ्या पालकांना बोलवण्याचे शिक्षकांनी आदेश फर्मावले... गेल्या वेळी बहिण बनून एका मैत्रीणीला नेलेलं... आणि यंदा मावशीला आई बनवून... वेळ तेवढ्या पूरती मारुन नेली... काम झालं... आणि आयुष्यात उरलेली सुरलेली सगळी भीती संपली... अशा उनाडक्या करण्याच्या आधी आणि नंतर... जग तेच होतं... तेच राहणार आहे, पण आता काहीतरी जिवंत आहे असं वाटत होतं...
     मध्यांतरी राडा आणि पार्टनर ह्या दोन कादंब-या वाचल्या... त्यातली पार्टनर एकदमच फालतू वाटली तर राडा जरा प्रमाणाच्या बाहेरच आवडली... चार लोकांशी बोलल्यावर कळालं की एवढं त्यात आवडण्यासारखं काही खास नाहीये... नंतर दोन मित्र म्हणाले आम्हाला ही खूपच भावली राडा कादंबरी... कसलं भारी... मग पुन्हा हायसं वाटू लागलं... पण पार्टनर कादंबरी ला शिव्या घालणाला सध्या तर मी एकटाच मला दिसत होतो आमच्या वर्तुळात... पुस्तकं वाचायच्या आधी आणि नंतर... जग तेच होतं... तेच राहणार आहे, पण आता काहीतरी जिवंत आहे असं वाटत होतं...
     झेंडा – मोरया - फक्त लढ म्हणा - देउळ.... हे सिनेमे काल परवाच पुन्हा एकदा पाहिले... काहीच नाही वाटलं पाहून... पहिल्यांदा पाहिलेले तेव्हा तोंड उघडं पडलं होतं... पण आता पाहताना बनविलेल्यांच्या तोंडात मारावीशी वाटली... हे पिक्चर पाहण्या आधी आणि नंतर... जग तेच होतं... तेच राहणार आहे, पण आता काहीतरी जिवंत आहे असं वाटत होतं...
      काल पेपर होता... आणि सिलॅबस काय हे सुद्धा माहित नव्हतं... पेपर सुरु होण्याच्या पाच दहा मिनिटं आधी मैत्रीणीनं काही प्रश्न सांगितले... माझ्या नोट्सचे फोटो तिच्या मोबाईम मध्ये काढले... पेपर मध्ये आलेलेया महत्वाच्या प्रश्नांची उत्तर त्या फोटोंमध्ये होती...शेवटचा बैंच असल्याने मिळून पाच जणांनी डीजीटल स्वरुपात सामूहिक कॉपी केली... पेपर सुरु व्हायच्या आधी आणि नंतर... जग तेच होतं... तेच राहणार आहे, पण आता काहीतरी जिवंत आहे असं वाटत होतं...
     काही आठवड्यांपूर्वी मुंबईच्या एका कॉलेजात वर्कृत्व स्पर्धेला गेलेलो... मराठीची अभिमान वगैरे बाळगण्याची काही गरज नाहीये मराठी माणसाला आणि ती का नाहीये.... या विषया वर बोल्लेलो... उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेलं... स्पर्धा संपल्यावर त्या महाविद्यातल्या ज्या ऑडिओ विज्युअल रुम मध्ये आम्ही होतो... त्याचा इनचार्ज असणारा तो तरुण कारकून... माझ्याकडे आला आणि म्हणला - मस्त झालं भाषण...छान बोल्लास मला खूपच आवडलं... त्याची प्रतिक्रिया हृदयस्पर्शी का काय ते म्हणतात ना तशी वाटली होती एकदम... ते भाषण करण्यापूर्वी आणि नंतर... जग तेच होतं... तेच राहणार आहे, पण आता काहीतरी जिवंत आहे असं वाटत होतं...
      वरची प्रत्येक गोष्ट करताना असचं होत होतं.... सध्या कविता शेर गझलं खूप जवळच्या वाटू लागल्या होत्या...शब्दांच्या प्रेमात पडतोय की काय असा भास होत होता... फक्त चांगल्याच गोष्टी पाहायच्या असं ठरवलं की वाईट आपसूकच संपत... सगळीकडे आनंद शोधला तर दुःख कुठेय हे शोधावं लागतं... म्हणजे एखाद्या भिका-याला पैसे गाडी बंगला संपत्ती दिली आणि म्हटलं की आता जगं... तर तो म्हणेल का नाही! मला भिक मागायला आवडते... मला तेच करु द्या... - माणसांचही तसंच आहे...
     त्याला स्वतःचा आनंद दिसला की मग त्याला इतरांची दुःख नाही दिसत... आणि ज्याला इतरांची दुःख दिसतात तो स्वःताचा आनंद इतरांना देउन टाकतो... असं करण्याच्या आधी आणि नंतर जग तेच होतं... तेच राहणार आहे, पण असं केल्याने काहीतरी जिवंत आहे असं वाटलं तर त्यात गैर काय आहे...
     मरणानंतरचं जीवंतपणा शोधण्या ऐवजी प्रत्येक क्षणाक्षणात जीवन शोधलं तर आधी चं जग आणि नंतरचं जग असले फालतूचे प्रश्न पडणारच नाहीत... जिवंतपणाचं ते लक्षण आहे... जे आधी आणि नंतर करतील त्याचं त्यांच्या आयुष्यात बरंच अंतर पडत चाल्लंय ... असं समजावं... महत्वाचं म्हणजे हे वाचण्याच्या आधी आणि नंतर... जग तेच होतं... तेच राहणार आहे, पण आता काहीतरी जिवंत आहे असं वाटायला पाहिजे... नसेल वाटत तर त्याला कोणी काहीही नाही करु शकत ...


Comments

SPEECHLESS!!!! \m/\m/ U rock \m/\m/
Siddhesh Sawant said…
Kupch thnx...:)