वागळे, उभ्या महाराष्ट्रानं आता बसून कुणाकडं बघायचं?



वागळे. तशा माझ्या आयुष्यात आतापर्यंत वागळे आडनावाच्या दोनचं व्यक्तींना मी ओळखतो.
एक निखिल वागळे. आणि दुसरी नम्रता वागळे.
निखिल वागळे सगळ्यांना माहित आहेत. नम्रता सगळ्यांना माहित आहे की नाही. माहित नाही.

खरंतर दोघेही एन्कर. वृत्तनिवेदक.
दोघांनीही डिबेट शो केलेत. या दोघांमध्ये निखिल वागळे जास्त प्रसिद्ध आणि चर्चेत असतात, हे कोण नाकारेल?

वागळेंचा सडेतोड शो टीव्ही ९ मधून तडकाफडकी बंद केल्यानंतर वागळे पुन्हा चर्चेत आलेत. पत्रकारांमध्ये याच्या गप्पा रंगतायेत.
विषय चविष्ट आहे. लोकांमध्येही चर्चाय. टीव्ही9 मराठी बघणारे माझे बाबा विचारतायेत.. 'अरे वागळेंचा शो का येत नाहीये?' मी निरुत्तर.

यावरुन निखिल वागळे हे काही फक्त पत्रकारांपुरते मर्य़ादित राहिलेले नाहीयेत, हे सिद्ध होते. प्रेक्षकांना त्यांच्यात फार इंटरेस्ट आहे.
मला तर असं वाटतं की ज्येष्ठ पत्रकार, संपादक निखिल वागळे हे एका डॉक्यूमेंन्ट्रीचा विषय आहेत.
लोकांना फार इंटरेस्ट आहे त्यांच्या एकंदरीत आयुष्यात. एकंदरीत वागळे जे काही करतात, त्याचं गॉसिप करण्यात केवढा इंटरेस्ट रेट आहे, हे इतर चॅनेल्सनी एकदा तपासून बघायला हवं. तुम्ही सोशल मीडियावर वागळेंविषयी एखादी पोस्ट लिहा, बघा ती वायरल होते की नाही. किंवा त्यावर कॉमेंन्टचा पाऊस पडतो की नाही.

वागळेंवर एखादा सिनेमा काढला, तर तो हीट होण्याची शक्यताही भरपूरै. त्यांचं आयुष्य भारीचं आहे. ड्रामा, अँक्शन, रिलेशन, इमोशन, ट्रेजेडी वगैरे असं सगळं खच्चून भरलेलं आहेच त्यात. एखाद्या बायोपिकला अजून काय हवं असतं?

मी काल परवा आलेल्या पत्रकारांमध्येच मोडतो. मी खरंतर धड पत्रकारही नाही. आपल्याला कसली कळतेय बातमी?

पण पत्रकारीता शिकतोय, त्या आधीपासून पत्रकार म्हणून निखिल वागळे हे नाव शेमडं पोरगंही घेतं असल्याचं ऐकून आहे.
भावंडांमध्ये मी पत्रकारीता शिकतोय असं सांगितल्यावर त्यांनी अनेकदा मला निखिल वागळेंबद्दल विचारलंय.

निखिल वागळे जे करतात त्याला पत्रकारीता म्हणतात की नाही, हे मला तरी अजून समजलेलं नाही.

पण ते जे काही करतात, ते बघण्यात लोकांना कमालीचा इंटरेस्ट आहे. वागळे कसे एखाद्याची ठासतात, वर्तकांना कसे स्टुडिओ बाहेर हाकलतात, हवीतशी उत्तरं दिली नाहीत की गेस्टचा माईक कसा बंद करतात, हे सगळं बघण्यात लोकांना रस आहे. नळावरची भांडणं टीव्हीस्क्रिनवर हीटच आहेत, हे वागळेंना टीव्हीत आल्याआल्या कळलेलं आहे.

निखिल वागळेंचा शो टीव्ही९नं बंद पाडलाय. अभिजीत कांबळे यांनीही आता टीव्ही९ सोडलंय. अभिजीत सर प्रोड्यूसर होते वागळेंच्या शो चे. ज्या टीव्ही ९मध्ये कोणे एकेकाळी विलास आठवले डिबेट शो करायचे, त्या जागी वागळेंनी एन्ट्री घेतल्यानंतर चॅनेलच्या टीआरपीमध्ये (आताच्या बार्कमध्ये) प्रगती झाली, असं म्हटलं तर ते चूक कसं ठरेल.

आयबीएन लोकमतला मागे टाकत टीव्ही९ मराठी चॅनेल तिसऱ्या नंबरवर आलं यात वागळेंच्या सडेतोडचा हात नसेल, असं कसं म्हणता येईल?

कालपरवा आलेला पत्रकार जेव्हा वागळेंकडे बघतो, तेव्हा वागळेंनी कमावलेलं नाव आपणंही कमवावं, असं कुणाला वाटणार नाही?

आयबीएन लोकमतच्या न्यूजरुमचे 'किस्से' ज्यांनी ऐकलेले नाहीत, त्यांच्यासाठी वागळेंच्या मनात आदर असणारंच आहे. वागळेंचा रिस्पेक्ट ठेवला नाही तर त्यामुळे काही फरक पडत नाही. यामुळे निखिल वागळे मोठेही होत नाहीत आणि छोटेही. त्यांच्या ठिकाणी ते ग्रेटच आहेत. ग्रेटच राहणार.

पण एवढा मोट्ठा पत्रकार आहे. त्यांच्याकडून जर काही शिकण्यासारखं असेल, तर ते काय असेल हा प्रश्न मला स्वस्थ बसू देत नाहीये.

काय घ्यावं बुआ वागळेंकडून?

नंबर एक - वागळेंची दाढी?
त्यांची ती कोरलेली दाढी फॉलो करणारे कितीजण दाखवू मी तुम्हाला मीडियात.

वागळेंची दाढी म्हणजे ट्रेंडसेटरच आहे.

पत्रकारांचा पगार फार कमी असतो, असं या दाढीतून वागळेंना सूचित करायचं नसेल ना?
मला तरी तसंच वाटतं. खरं खोटं वागळेंनाच माहित. पण मराठी पत्रकारीतेत पगार कमी आहेत, हे वागळे तरी नाकारु शकतील का?

नंबर दोन - वागळेंनी सोडलेल्या नोकऱ्या
वागळेंनी खूप नोकऱ्या केल्यात आणि सोडल्यात सुद्धा. कधी त्यांनी स्वतःहून सोडल्या तर कधी त्यांना सोडायला भाग पाडलं गेलं असेल. असो.
चांगलं वाईट सगळीकडे असतंच.. आपल्याला चांगलं तेवढं घ्यायचंय..

तुम्हाला माहिती आहेच की आताच्या पत्रकारांसाठी विकीपीडिया म्हणजे केवढा मोठा सोर्स आहे.
गुगलवर 'निखिल वा' टाकून काय येतं, ते हा फोटो सांगतोच आहे.




छोटा पत्रकार असल्यानं मी गेलो विकीपीडियावर. विकीपीडियावर मराठीत वागळे वाचले तेव्हा फार काही दिसलं नाही.

पण इंग्रजीत तेव्हा वागळे वाचले तेव्हा चीनी माणसासारखे असलेले माझे डोळे अधिकच मोठे होत गेले. अधिकच विस्फारत गेले.
टीव्हीत काम करणारे भेळवाल्यासारखे असतात. मी ही भेळवालाच. टीव्हीतलाच माणूस. जेव्हा एखादा माणूस गचकतो तेव्हा आम्ही भेळवाले काय करतो माहितीये. त्याचं प्रोफाईल ग्राफिक्स बनवतो. म्हणजे त्यानं काय-काय ग्रेट केलंय, कोणते पुरस्कार मिळवलेत वगैरे वगैरे. त्याचाच परिणाम म्हणून हे ग्राफिक्स तयार झालंय..

(हेडर)
…अशा केल्या होत्या आतापर्यंत वागळेंनी नोकऱ्या (सोर्स - विकीपीडिया)
-------------------------
- १९७७ साली माध्यमांमध्ये मुक्त पत्रकार म्हणून कामाला सुरुवात

- १९७९ साली मराठी साप्ताहिक दिनांक मध्ये रुजू

- दिनांकच्या संपादकांनी राजीनामा दिल्यावर प्रकाशकांनी १९ वर्षीय वागळेंना
कार्यकारी संपादक (मॅनेजिंग एडिटर) होण्याची ऑफर दिली

- त्यानंतर दिनांकचे मुख्य संपादक पद भुषविले

- मधल्या काळात वागळे पुण्यात गेले.
तिथे त्यांना किर्लोस्कर ग्रुपमध्ये काम मिळाले

- किर्लोस्कर ग्रुप तेव्हा काही मासिकं काढायचा

- पण एका महिन्यातच त्यांनी नोकरी सोडली आणि
वागळे मुंबईत आले.

- १९८२ साली त्यांनी स्वतःचा प्रकाशन व्यवसाय सुरु केला.
अक्षर नावाचं नवंकोरं मासिक वागळेंनी काढलं

- १९८३मध्ये त्यांनी क्रीडामासिक (स्पोर्ट्समॅगझिन) काढलं
ज्याचं नाव होतं षटकार. षटकारचे संपाद होते, संदीप पाटील.

- १९८५मध्ये चंदेरी नावाचं सिनेमॅगझिन सुरु केलं.
ज्याचं संपादक पद सुरुवातीला रोहीण हट्टंगडी यांनी भूषवलं होतं.
गौतम राजाध्यक्ष हे देखील चंदेरीचे संपादक राहिल्याचं समजतं.

- गुजराती भाषेतील मासिकंदेखील
निखिल वागळे यांनी प्रकाशित केली.
नावं फारशी माहित नाही.

- १९९० साली मराठी आणि
हिंदी वृत्तपत्र महानगरची सुरुवात

- याच वृत्तपत्राची मराठी आवृत्ती
आपलं महानगरचं संपादकपद भूषवलं

- शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंवर टीका करणारा पत्रकार म्हणून ओळख

- १९९१ साली वागळेंच्या कार्यालयावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला अशीही माहिती

- १९९४ साली आमदारांवर गुन्हेगारीसंदर्भात वागळेंनी आरोप केले होते.
वागळेंच्या केलेल्या आरोपांवर माफी मागण्यास नकार दिल्यानंतर त्यांना
आठवडाभर कैदेत ठेवण्यात आलं होतं.

- २००४ साली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वागळेंना चोप दिला
कारण - नारायण राणेंविरोधात केलेली विधानं किंवा टीका

- वागळेंनी आतापर्यंत ८० हून अधिक पुस्तकं प्रकाशित केली आहेत

- १९८९ साली निवेदक म्हणून करियरला सुरुवात

- दूरदर्शनवर अनेक शो केल्यानंतर एक सामाजिक-राजकीय टीकाकार
म्हणून अनेक चॅनेलसाठी काम

- आमने-सामने या कार्यक्रमात निवेदन

- २००८ साली २४ तास वृत्तवाहिनी असणारं आयबीएन लोकमत चॅनल ब्रॉडकास्ट झालं.

- त्या आधीपासूनच त्यात संपादक म्हणून काम पाहिलं. नेटवर्क १८चं हे मराठी न्यूज चॅनेल.

- आयबीएन लोकमतमधला वागळेंचा आजचा सवाल शो प्रचंड लोकप्रिय झाला.

- ग्रेट भेट मुळे वागळे अभ्यासू पत्रकार म्हणून नावारुपाला आले

- २०१४ साली आयबीएन लोकमतमधून राजीनामा

- आयबीएन लोकमतच्या एडीटोरियल टीमचे सदस्य म्हणून
संस्कृती पुरस्कारानं वागळेंना गौरवण्यात आलं.

- यानंतर मी मराठी या चॅनेलमध्ये पॉईन्ट ब्लँक
हा शो वागळेंनी केला

- आयबीएन लोकमत सोडलेल्या वागळेंनी
महाराष्ट्र वन चॅनेल सुरु केलं.

- आयबीएनमध्ये वागळेंसोबत काम केलेल्या अनेकांनी
महाराष्ट्र वनमध्ये वागळेंसोबतच एन्ट्री केली.

- नोव्हेंबर २०१६ला वागळेंनी महाराष्ट्र वनचा राजीनामा दिला.

- १मे २०१७, पासून वागळे सडेतोड हा डिबेट शो  टीव्ही९ मराठी
या वृत्तवाहिनीसाठी करु लागले.

- २० जुलै, २०१७ला हा डिबेट शो अचानक चॅनेलने बंद पाडला
असलाच्या बातमीला खुद्द वागळेंनीच दुजोरा दिला.
--------------------


लो.. कर लो बात. चाळीस वर्ष झाली वागळेंना मीडियात. १९७७ ते २०१७. बापरे
माझंतर वयही नाही ४०. त्यामुळे अशा माणसाच्या कामाबद्दल बोलण्याचा आपल्याला  नैतिक अधिकार आहे का? नाय, नो.. नेव्हर..

पण त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं असेलच. नव्हे आहेच..

वेळोवेळी नोकऱ्या सोडल्या पाहिजेत, ही बाब वागळेंचं करियर पाहिल्यावर आपण शिकणार नसू, तर आपण पत्रकारीतेत जेमतेमच टिकू, असं सांगत असावी.

नंबर ३ म्हणजे वागळेंची आक्रमकता.
वागळे किती डॅशिंग आहेत ना? ते किती आक्रमक वाटतात ना स्क्रिनवर?
एखाद्याला ओरडतात तेव्हा ते आपल्यालाच ओरडतायेत, असंच वाटतं. भीती वाटते.
पत्रकाराची भीती वाटली पाहिजे. पण कुणाला? हे अजूनतरी नक्की सांगता यायचं नाही.

नंबर ४ म्हणजे.. माहिती नाही.
वरच्या तीनही गोष्टी सोडल्या तर वागळेंकडून अजून घ्यावं असा प्रश्न आहेच.
उभा महाराष्ट्र ज्यांना बसून बघतो, त्यांच्यासारखं चमकायला हवं का टीव्हीवर? नाही माहित.
आपली मतं मांडायला, विचार मांडायला, मुद्दा मांडायला, वृत्तवाहिनी आणि वृत्तपत्र यांच्या व्यतिरिक्त पर्याय नाहीत का?
जर असतील तर ते कोणते आहेत हे वागळेंना माहित नसावं?
इतक्या वर्षात वागळेंना राजकीय, आर्थिक घडामोडी कळल्या नसतील?
बदलत जाणारं माध्यम त्यांना कळलं नसेल?


ज्या मंदार फणसेंना, महेश म्हात्रेंना इंटरनेटची ताकद त्यावेळी कळली होती, त्यांना आता टीव्हीत असं काय आकर्षक वाटलं असेल?

टीव्ही९ मराठीनं शो बंद पाडल्यानंतर वागळेंना व्यक्त व्हायला सोशल मीडियाशिवाय दुसरं कोणतंच गंत्यंतर का सापडलं नाही?

'ओ जोशी.. ओ भटजी'वाली क्लिप जेव्हा वायरल होते, तेव्हा पत्रकाराच्या अनावर झालेल्या संतापावर आपण कोणतीच प्रतिक्रिया का द्यायची नसते?
आपण तटस्थ असतो म्हणून?

आयबीएनमधला एक तरुण प्रेमभंग झाला म्हणून जीव देतो. याची बातमी कुणतीच वृत्तवाहिनी का दाखवत नाही?
संपादकांना हा प्रश्न विचारला तर उद्या आपल्याला नोकरी सोडावी लागू शकते, याची भीती प्रत्येकाच्या मनात खदखदतेय का?
मराठी पत्रकारीता इज इक्वल टू इनसिक्युरिटी, असं इक्यूएशन आहे का?

हातात दुसरी नोकरी नसताना, नोकरी सोडून बघा. बघा कुणी उभं तरी करत का?

आपण नवखे पत्रकार आहोत. जिथे वागळेंचा गेम होऊ शकतो, तिथे हम तुम किस झाड की मुली है?

काय गं रेप झालेल्या पीडित मुली.. तुझ्यात माझ्यात फारसा फरक नाही गं. असो.

खरंतर वागळे जे करतील ते बरोबरच असेल, असं मानणाऱ्यांमधला मी तरी नाही. पण तरीही जे घडलं त्याच घटनेचा परिणाम किती मोठा होऊ शकतो, याची जाणीव कशी कुण्याच पत्रकाराला होत नाही, याचं आश्चर्य़ वाटतं. पैसा बोलता है, बॉस.

पण म्हणून वागळेंकडून बोध घेण्यासारखं काहीच नाही, असंही नाही. त्यांच्याकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे. त्यांचं करिअर पाहून आपण योग्य ती काळजी आपलं करिअर घडवताना घ्यायली हवी. पत्रकार म्हणून सार्वजनिकतेचे सर्व नियम, अटी जपायला तर हव्याच. पण पत्रकारितेची लेबलं लावून जी माणसं फिरतायेत, त्यांनी माध्यमांच्या बदलत्या प्रवाहाबद्दल मूग गिळून गप्प बसणं, हे दांभिकतेच, बेईमानीचं आणि खोटारडेपणाचं लक्षण नाही तर अजून काय आहे?

बाकी वागळे तुम्ही मला ओळखत नाही. मी ही तुम्हाला पूर्णपणे ओळखलेलं नाहीच.

पण तुम्हाला थॅक्यू बोलायचं होतं. ते या सगळ्यात राहिलं. सो.. थॅक्यू सो मच.

पण तुमच्या अचनाक शो बंद होण्यानं माझ्या बाबांसकट अख्ख्या महाराष्ट्राला एक प्रश्न पडलाय.

त्यावर आजचा सवाल तुम्ही घ्याल का..?

सवाल इतकाच आहे वागळे.. उभ्या महाराष्ट्रानं बसून आता कुणाकडं बघयाचं?



Comments

छान लिहिलयेस 👍अनेकांच्या मनातले बरेचसे प्रश्न मांडलेस । ऊत्तर मिळणं अपेक्षित...
Unknown said…
This comment has been removed by the author.
Unknown said…
सडेतोड लेखन
http://www.marathipizza.com/nikhil-wagle-tv9-exit-due-to-closing-show-sadetod/
व्वाह। मस्तच लिहिलंय दादा। निखिलजी देतील उत्तर नक्कीच
Ramesh dehedkar said…
सत्य कधीच विसरु शकत नाही.
खर बोलले तर सख्या आईला राग येतो.
यातुन हाच बोध होतो.
छान.