आपल्यातला बाहुबली कुठंय?



एबीपी माझासाठी तसं फारसं लिखाण होत नाही. ठरवून कित्तेकदा लिहीलेले लेख अर्थवट सोडून दिलेत. 
लिंक लागत नाही. माझासाठी लिहीताना फार दडपण असल्यासारखं वाटत राहतं. 

असं का होतं माहित नाही. पण तरी हातावर मोजता येतील इतक्या वेळा माझा साठी ब्लॉग लिहीलेत.
ते मलाही फारसे आवडलेले नाहीत. पण हा ब्लॉग आवडला होता.

तो रविवारचा दिवस होता. अनिष वेबला त्याचं काम करत बसला होता. बाहुबलीनं इतकी कमाई केली वगैरे बातमी समोर होती. त्याला म्हटलं, ब्लॉग लिहून देऊ का.. खूप चालेल. त्यानं पटकन दे म्हणून सांगितलं.
घाईघाईत हॉ ब्लॉग आटोपला. त्याला मेल केला. मेघराज सरांना फोनवरुन कळवलं. आणि ब्लॉग वेबसाईटवर आला.

अपेक्षा होती की हा ब्लॉग वायरल होईल. पण अपेक्षेप्रमाणे चालला नाही.
म्हणजे इतर ब्लॉग आणि पोस्टच्या तुलनेने चांगलाच चालला. पण मनासारखा चालला नाही.
त्यामुळे हा ब्लॉग लिहूनही मजा आली नाही.

हा ब्लॉग न चालण्याचं कारणही अपेक्षित होतं... त्याचं टायटलमुळे ब्लॉग चालला नाही.

बाहुबली हीट झाला.. पण त्याच्यावरचा ब्लॉग जोरदार आपटला.

टायटल होतं

कटप्पाने बाहुबलीला नाही मारलं ओ...



खरंतरं टायटल असायला हवं होतं...  - आपल्यातला बाहुबली कुठंय?

ब्लॉग पुढे कॉपी पेस्ट केलाय.. वाटलंच तर वाचा.
------------------------------------------------------------------------------------
बाहुबली पाहणारे बाहुबली 2 पाहणार नाहीत, असं होणारच नाही. गेल्यावर्षी याच दरम्यान म्हणजे एप्रिल 2016 च्या शेवटी नागराजचा सैराट आला आणि त्यानं बॉक्स ऑफिसवर खतरनाक कमाई केली. यावर्षी बाहुबली 2 रिलिज झालाय. आता पहिल्याच दिवशी विक्रम नोंदवणाऱ्या बाहुबली 2 नं दमदार कामगिरी केली तर त्यात आश्चर्य कसलं?
बातम्या वाऱ्यासारख्या पसरत आहेत. लालबागच्या राजाच्या लाईनीत कितीवेळ उभा राहिला, तसा ट्रेंड बाहुबली 2 साठी तिकीटबारीच्या लाईनवर बघायला मिळणार, अशी दाट शक्यता आहे. ऑनलाईन बुकींग केल्यानंतरही तिकीट बारीवर जावंच लागतंय. शो सकाळचा असो, दुपारचा किंवा संध्याकाळचा प्राईम टाईम, रांगा वाढतच आहेत.
बाहुबली 2. खूप मोठ्ठा सिनेमा. अडीच तासांपेक्षाही जास्त वेळाचा. सैराटचंही तसंच होतं. सध्या पटकन प्रेक्षक कंटाळतात म्हणून कमीत कमी वेळात जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न सगळ्याच क्षेत्रात पाहायला मिळतो. पण एवढा मोठा सिनेमा असूनही प्रेक्षक बाहुबली 2 च्या शेवटापर्यंत खुर्ची सोडायला तयार नसतात. हे बाहुबली 2 चं मोठं यश.
बाहुबली 2 बघायचा म्हणून बुकमायशोवरुन तिकीट बुक केलं. सगळीकडे बुकींग फुल होण्याच्या मार्गावर दिसत होतं. जिथंतिथं फिलिंग फास्ट असंच होतं. आताही तशीच परिस्थिती आहे. जिथं सीट होत्या त्या पुढच्या रो मधल्याच शिल्लक राहिलेल्या दिसत होत्या. अजूनही दिसतायेत.
सुदैवानं गोरेगावच्या सिनेमॅक्सचं सकाळी 9 वाजताचं तिकीट मिळालं. मनासारखी सीट अखेर मिळालीच. थिएटरच्या अगदी मधोमध. गेलो. आई बाबा बायकोला सोबत नेलं.
घरातून निघताना उशिर झाला. अगदी 9 च्या ठोक्याला थिएटरवर पोहोचलो. वाटलं सिनेमा चुकणार. पण झालं उलटंच. थिएटरवर लोकं बाहेरच थांबले होते. इतकी लोकं सकाळ सकाळी येतील असं त्या थिएटरात काम करणाऱ्यांना वाटत नसावं बहुदा. त्यांची तारांबळ उडाली. अखेर 9.20 ला लोकांना आत घेण्यात आलं.
सगळ्या अपकमिंग ट्रेलरचं संकट पार करत अखेर पावणेदहाच्या सुमारास 9 चा सिनेमा सुरु झाला. थिएटर हाऊसफुल्लं. एकही जागा शिल्लक नव्हती. सगळे वेळेवर हजर. सुट्टीच्या दिवशी झोपेचं खोबरं करुन बाहुबली 2 बघायला येणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. विशेष म्हणजे बाहुबली 2 बघायला फक्त तरुण-तरुणी आले नव्हते. म्हातारे कोतारे, साठी पन्नाशीतले प्रेक्षकच तरुणांपेक्षा जास्त होते.
सिनेमा सुरु होतो. साहो रे बाहुबली…
शिट्या, टाळ्या यांच्याशिवाय तुम्हाला बाहुबली 2 बघता येत नाही. प्रभासची एन्ट्री होते. वाजल्या शिट्या. एखाद-दोन पंच घेणारे डायलॉग पडले. वाजल्या शिट्या. अॅक्शन सीक्वेन्स आला. वाजल्या शिट्या. टाळ्या, मज्जा आणि अवाक् झालेले प्रेक्षक अधेमधे अवाक झालेलेही पाहायला मिळतात.
तुम्ही मजा मस्ती करत सिनेमा बघणारे असाल, तर आणि तरच तुम्ही बाहुबली 2 चा आनंद लुटू शकता. चेन्नई एक्स्प्रेस, दुनियादारी आणि सैराट जर तुम्ही थिएटरात पाहिला असेल तर बाहुबली 2 बघताना फारसा त्रास होत नाही. असो.
अचानक हे असं कसं होऊ शकतं? असे वाटणारे सीनही सिनेमात अाहेत. एखादा माणूस एवढा कसाकाय ताकदवान असू शकतो? तो एवढी मोठी उडी कशी काय मारतो बुआ? दहा हत्तींचं बळ एका माणसात कसं येतं? याचे नेम इतके कसे तंतोतंत? असे फालतू आणि इललॉजिक प्रश्न बाहुबली बघताना तुम्हाला पडू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करा.
समोरुन शंभर बाण येत असताना, त्यातला एकही बाण हिरोला न लागण्याची परंपरा आपल्या देशात नवीन आहे का?
ज्यांना रियल रियल बघायला आवडतं त्यांना हा सिनेमात अजिबात आवडणार नाही. ज्यांना अॅक्टींग बघायला आवडते, त्यांनाही हा सिनेमा आवडण्याची शक्यता कमीच. राहता राहिली स्टोरी. तर कट्टपानं बाहुबलीला का रे बाबा मारलं असावं? याचं फक्त उत्तर शोधण्यासाठी जात असाल तर तुमचा हेतू सफल होतो. पण खरंच कटप्पाने बाहुबलीला नाही मारलं ओ…
सिनेमात अफलातून दृष्य दिसतात. डोळ्यांना सुखावणारी. कॉम्पुटरवर ही दृश्य तयार केली आहेत, असं सांगितलं तर खोटं वाटावं इतकी खरी. सीजी आणि कॉम्पुटर इफेक्टचा एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेला वापर याबद्दल बाहुबली 2 चं कौतुक करावं तितकं थोडं. पण त्याहीपेक्षा या बॅकग्राऊंड स्कोअर बाहुबली 2 ला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतं.  पण ही बाब फारशी कुणाच्या लक्षात येत नाही, हे देखील बाहुबली 2 चं मोठं यशच.
बाहुबली 2 एकाचवेळी एकापेक्षा जास्त प्रादेशिक भाषांसकट प्रदर्शित होतो, ही बाब बाहुबलीची लोकप्रियता सांगण्यासाठी पुरेशी आहे. बाहुबली चांगला वाईट, हे पूर्णपणे व्यक्तीसापेक्ष. पण भारतीय प्रेक्षकांना  अतिरंजित, स्वप्नवत, काल्पनिक आणि भावाभावांमधली भांडणं बघण्यात अजूनही प्रचंड इंटरेस्ट आहे, याची जाणिव बाहुबलीच्या निमित्तानं होते. वर्षानुवर्ष जे सिनेमे आपल्याकडे येत गेले, त्यातली घिसीपीटी गोष्ट बाहुबलीमध्ये आहे. इथूनतिथून थोडेफार बदल केले की कोणत्याही जुन्या सिनेमात सापडेल अशी बाहुबलीची गोष्टंय. सख्खे भाऊ पक्के वैरी टाईप.
बाहुबली 2 बॉक्स ऑफिसवर कमाल करेल, हे सांगायला कुण्या तज्ज्ञांची गरज नाही. प्रश्न असाय की,  बाहुबली 2 मध्ये अंशतः का असेना बंडखोरी, विद्रोह, राजकारण, सत्ता यावर खोलवर प्रकाश टाकतं. पण ते कुण्या प्रेक्षकाला दिसलं असेल का?
बाहुबली 2 मध्ये मला आपला देश दिसतो. कपटी राज्यकर्ते दिसतात. फसवे समाजसेवक, अभ्यासक, प्रचारक आणि इतर लोकं दिसतात. भोळीभाबडी जनता दिसते. पिचलेला समाज दिसतो. बाहुबलीचं होरपळेलं राज्य दिसतं. खरंतर अन्यायाला वाचा फोडणारा हिरो पाहिला की प्रत्येकाची छाती फुलून येतेच.
आपला आत्मसन्मान आणि स्वाभिमान जपणारी हिरोईन पाहिली की स्त्रीयांबद्दलचा आदर 200 किलोने वाढतो. शब्द प्रमाण मानणारी माणसं कल्पनाविश्वात नुसती दिसली तरी ऊर भरुन येतो.
निरपेक्ष प्रेम करणारी जोडी दिसली की पुन्हा प्रेमात पडावंसं कुणाला वाटणार नाही? बाहुबली बघताना या सगळ्या भावना दाटून येतातच.
पण बाहुबलीमधून दिग्दर्शकाला जर काही सांगायचं असेल तर ते काय असेल?
सत्तेचा माज केल्यानं काय होतं, हे त्याला सांगायचंय?
महिलांनी आपला स्वाभिमान कधीही सोडता कामा नये, हे सांगायचंय?
की धर्मापेक्षा माणूस आणि माणूसकी मोठी, हे सांगायचंय?
कदाचित दिग्दर्शकाला यातलं काहीच सांगायचं नसेल.
पण माणसानं माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे. प्रेम केलं पाहिजे आणि करु दिलं पाहिजे. याच्यापेक्षा वेगळं काही बाहुबली 2 ला सांगायचं असेल असं वाटतं नाही. सैराटलाही तेच सांगायचं होतं. पण हे कळलं किती जणांना? माहित नाही.
फेसबुकवर वॉचिंग बाहुबली टाकणारे खूप आहेत… गरज आहे फिलिंग बाहुबली वाटणाऱ्यांची

Comments