पत्र लिहाणाऱ्या गुरूला.. वाढदिवसानिमित्त


त्याच्या वाढदिवसा निमित्ताने.. खाजगीतलं चव्हाट्यावर…. शुभेच्छा रे भावा
----------------



हाय गुरू. हे काही पत्र वगैरे नाहीये. पण तू बर्थडेला लिहीलेलं पत्र
भारी होतं. खूप लोकांना आवडलं ते. मलाही प्रचंड आवडलं. मला खरं तर भिती
वाटायची की त्या तूझ्या ब्लॉगमध्ये मलाही लिहीशील काहीतरी आणि लाज काढशील
माझी. पण तसं काही केलं नाहीस. जाणिवपूर्वक तसं सगळं लिहीणं टाळलंस तू,
हे ही लक्षात आलं. थँक्यूंच म्हणायला हवं. असो.
                 खरं तर बर्थडेच्या दिवशीच तूला एक सविस्तर पत्र लिहीणार होतो, पण मग
ते कृतज्ञता वगैरे केल्यासारखं वाटलं असतं तूला, म्हणून थांबलो आणि नाही
लिहीलं. तू त्या ब्लॉगमध्ये आपली पहिली भेट कुठे झाली ते मेन्शन केलंयस.
पण आपली दुसरी भेट केव्हा झालेली, ते नाही आठवत आहे मला. तूला आठवतंय
का…. ते आठवण्याच्या नादात मला बाकीचं बरंच काही आठवतंय. म्हणजे आपण एकदा
वांद्र्याच्या त्या गार्डनमध्ये बसलेलो. तुझे बाबा तुला हॉस्पिटलमध्ये
नोकरी बघत होते वगैरे म्हणून तू फ्रस्टरेट झालेलास आणि बरंच काही बोलत
होतास. सगळं कळत असूनही काय करावं याचं उत्तर शोधायला आलेलास.
वर्कशॉपमध्ये तर आपण ब-याचदा भेटलो. मांडवा ला जाऊन वोडका प्यायलो.
त्याच्या दुस-या दिवशी सलाम बॉम्बे ला जॉयनिंग होती माझी. तूझ्या
त्या लालबागच्या मंडळामध्ये तूला भेटायला आलेलो. तू ती स्क्रिप्ट लिहीली
होतीस… चिअर्स टू लाईफ.
                एकांकिकेच्या वेळीही आलेलो. तेव्हाही भेट झालेली. दहीहींडीसाठी तू
पाळणा लिहीलास, त्यानिमित्ताने भेटी झाल्या. अरे आत्ता आठवलं, दक्षताने
एकदा फोन केला होता. ही २०११-१२ मधली गोष्ट. ती तेव्हा वाटतं प्रहारला
होती, आणि तू-प्रविण प्रहार ला लिहायचात बहुदा. तर तेव्हा तिला फार
आश्चर्य वाटलं होतं, की आपण एकमेकांना ओळखतो आणि आपली मैत्री-बित्री आहे, असं
वगैरे. तुझ्याबद्दल मला हल्ली खुप लोक विचारतात.
                प्रशांत जामदार भेटला होता. गेल्या दोन तीन महिन्यांतलीच घटना आहे ही.
तूझ्या कवितांची तारीफ करत होता. भूषण वैद्य, राकेश कुंभवडेकर, प्रणय
अणेराव, निखिल शिंदे सारखी बरीच मंडळी ज्यांना कंटेन्ट मधे फार इंटरेस्ट
आहे, त्यांनी नेहमीच तुझ्या लिखाणाची तारीफ केलीये. मग आपण कविता बिविता
कार्यक्रम केला. आता ही शॉर्टफिल्मही केली - हिम्मत. नागराज ला अवॉर्ड
मिळणार होता म्हणून मिनि थिएटरमध्ये गेलो तर तिथे आपल्याला लोकनाथजींच्या
कविता भेटल्या. गझलेतून भीमरावजी भेटले. आणि अशी बरीच माणसं आपल्याला
मिळत गेली. पण…
                जी माणसं आपल्याला हवी होती ती आपल्याला मिळाली नाहीत, अशी खंत मला
तुझ्या लिखाणात नेहमी जाणवते. कदाचित तसं नसेलही, आणि तू ते कधी कोणाला
सांगणार नाहीसच आणि जरी विचारलं तरी तो विषय टाळून समोरच्याचीच मारून
मोकळा झालेला असशील, याचीही मला खात्री आहे. पण मला हे वाटत आलंय,
नेहमीच. बरं तूला ती मुलगी आठवतेय का… ओबेरॉय मॉलमधली… किती गोड हसली
होती ती तुझ्याकडे बघून…कदाचित माझ्याकडे बघून. कातील.  लगेच विषयांतर
झालं बघं.
                मला तूझी एक गोष्ट फार आवडते आणि तिचा मला हेवा वाटतो. ती गोष्ट म्हणजे
तूला कुठे माज दाखवायचा ते कळतो. म्हणजे पत्रकार असण्याचा माजुर्डेपणा जो
आपल्या आजूबाजूच्या पत्रकारांमध्ये आपल्याला नेहमी लख्खपणे दिसतो, तसा
मला तो तुझ्यात आणि प्रविणमध्येही कधीच आणि कुठेच दिसत नाही. पत्रकारीता
हा आपला व्यवसाय आहे, हे समीकरण तुम्हाला ब-यापैकी उत्तम जमलंय.
                खरं सांगायचं तर एबीपी माझा मध्ये नोकरी लागावी असं कोण्या पत्रकारीता
शिकलेल्याला वाटणार नाही. सगळ्यांनाच वाटत असणार. तसंच ते मलाही वाटत
होतंच. यावर आपण बोल्लोही होतो. पण चक्क दोन वर्षांनी पुन्हा
बातम्यांच्या दुनियेत यायचंय... त्यात एबीपी सारखी संधी चालून आली, ती
तुझ्यामुळेच. त्याबद्दल तूला जितकी दारू पाजावी तितकी कमीच आहे.
                 पण खरं सांगू का, कुणालाच म्हणजे घरच्यांपैकी कुणालाच
याचा काहीच आनंद-बिनंद झालेला नाहीये. मिडियामध्ये कोणाला बोलण्याचा संबंधच आला
नाही आणि कोणाला सांगावं अशी इच्छाही नाही. तिथे सगळं पोकळ-पोकळ आहे हे
तुलाही माहिती आहेच. सेलिब्रेट करावसं वाटत होतं त्या एचआरचा फोन आला
तेव्हा. पण नाही करता आलं. खदखदत राहिला तो आनंद आतल्याआतच कुठेतरी. असो.
                स्टार माझा लॉन्च झाल्यापासनं मी ते चँनेल बघत आलोय. पत्रकारीतेची पदवी
पूर्णपणे विचार वगैरे करून घेतली. माझामध्ये काम करायला मिळावं अशी
स्वप्न कॉलेजमध्ये असताना मीही पाहिलीयेत. पण नंतर नंतर पत्रकारीतेतले
खाचखळगे कळत गेले. त्यातला धंदा कळत गेला. आणि मी त्याच्यापासून शक्य
तितका लांब लाहिलो. पण एक गोष्ट लक्षात राहण्यासारखी झाली… ती म्हणजे
सचिन भावोजींना फार आनंद झाला मी एबीपीला लागलेल्याचा. ते सेटल आहेत
मिडीयामध्ये. पण मी कधीच कोणती नोकरी मिळवण्यासाठी त्यांची मदत नाही
घेतली किंवा वशिला नाही मागितला, याचा बहुदा त्यांना आनंद झाला असावा.
असो त्यातला एक किस्सा आता आठवला…
                मी की नै, एफवाय ला होतो. आणि मला तेव्हा इंटर्नशिपचे डोहाळे लागले
होते. मी भावोजींना तसं बोलून दाखवलं. त्यांनी सुनील कर्णिकांना म्हणजे
आपलं महानगर सध्या जे सांभाळतात त्यांना भेटायला जा असं सांगितलं आणि
स्वतःही त्यांच्याशी बोल्ले. मी त्यांना भेटायला गेलो. माहिमला त्यांच
छोटंसं ऑफिस. त्यांना भेटलो. त्यांनी कोणत्या विषयावर बातमीदारी करायला
आवडेल असं विचारलं. मी त्यांना शिक्षण आणि जनरल बीट असं उत्तर दिलं. पण
इंटरव्हूला जाण्याआधी भावोजींनी मला बजावून सांगितलेलं की डेस्कला काम
करण्याची इच्छा आहे, असं सांग. आणि मी तसं काहीचं सांगितलं नाही. विसरून
गेलो. त्या कर्णिकांसमोर माझं चांगलंच ततपप झालं होतं. ते म्हणाले परवा
ये पुन्हा भेटायला आणि येताना दोन बातम्या आण शिक्षण क्षेत्रातल्या. मी
खूष झालो… मन में लड्डू फुटा. मला वाटलं की मिळाली इंटर्नशिप. दोन
दिवसांनी दोन बातम्या घेऊन गेलो… आणि मग काय.. माझी पार शाळा केली
त्यांनी. लाज काढणे समारंभ यथासांग पार पडला.  तेव्हापासून कानाला खडा.
नो इंन्टर्नशिप.
                पण आता तूलाही हे कळून चुकलं असेलच की आपण कुठे काम करतो या पेक्षा आपण
किती पगारावर काम करतो हे जास्त महत्वाचं असतं नै. तूझ्या लेमन मधला स्ट्रगल
खूपच भारी होता. आपण अंधेरीला एकदा असं बरंच नको त्या रस्त्यावरना चालत
गेलेलो. तूला आठवतंय की नाही मला नाही माहित. पण असं बरच, कोणालाच न
सांगता येण्यासारख्या चर्चा आपण केल्यात. ज्या तुझ्यामाझ्यापासना सुरु
होतात आणि तुझ्यामाझ्यातच संपतात. थोडं जास्त झालं नै.
                खरं सांगायचं तर एबीपी माझा मधली नोकरी माझ्यासाठी फार महत्वाची जरी
नसली तरी तिथे एक काळ मला काढावा लागणार आहे. लोकांना सांगण्यासाठी
म्हणून एक उत्तम नोकरी जरी असली तरी तिथे टिकणं किंवा स्वतःला टिकवून
ठेवणं चँलेंजिंग आहे, याची मला जाणिव आहे. मुळात ज्या वयात आपल्याला ही
संधी मिळतेय, ती फार कमी जणांना मिळाली असावी, असंही मला वाटतं. आपण त्या
संधीचा पुरेपूर भरपूर फायदा करवून घ्यायला  हवा. आपण आपल्याला हवा असलेला
कंन्टेट विकायला शिकायला हवं. आता एकत्र काम करताना ब-याच गोष्टींवर काम
करता येईल, ऑफिसव्यतिरिक्त. येणारे दिवस चांगलेच असतील अशी अपेक्षा
करुयात.
                कपडे बदलावेत तशा मी नोक-या बदलल्या, असं तू लिहीलं होतंस ना… खरंच आहे
ते.  एअरटेल च्या कॉलसेंटर मध्ये मी पहिली नोकरी केली. दिवसभर लोकांना
फोन करुन एअरटेलचं सिम घ्या असं सांगायचं. या नोकरीचा अनुभव दोन दिवस.
त्यानंतर एका कास्टींग एजेन्सी मध्ये व्हीडियो एडीटर ची नोकरी. या
नोकरीचा अनुभव दोन महिने. नोकरी नंबर तीन… ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट.
इंग्रजी शाळेतल्या विद्यार्थांसाठी मराठी पुस्तकाचं प्रुफ रिडींग आणि
टायपिंग. अनुभव तीन महिने. नोकरी नंबर चार. टीव्ही ९, महाराष्ट्र.
चांगल्या समाजासाठी मी फक्त तीन महिने काम पाहिलं. नोकरी नंबर पाच… सलाम
बॉम्बे फाउंडेशन. सिनिअर फँसिलिटेट कम मिडीय़ा कोऑर्डीनेटर. कालावधी दोन
महिने. नंबर सहा… एलिक्झर डिझाईन्समध्ये बराच काळ होतो. तब्बल नऊ महिने.
एव्ही प्रॉड्यूसर कम क्रिएटीव्ह कंन्टेट डेव्हलपर म्हणून काम पाहिलं.
नंतर स्टार स्पोर्टचा स्कँम. तीन महिने. स्टार स्पोर्ट म्हणजे नोकरी
क्रमांक दहा. नंबर अकरा म्हणजे सध्याची थॉट पॉट मिडीया. मराठी कॉपी
रायटर. कार्यकाळ - दोन महिने. आणि आता नोकरी नंबर बारा…. न्यूजचा राजा,
एबीपी माझा. तर मग आता वाजले की बारा… म्हणत इथं बराच काळ घालवण्याच्या
शक्यता आहेत. तरीही बघू. कपडे बदलण्याची इच्छा झालीच तर तूला आधी सांगेनच.
खूप खूप थँक्यू.
                काल त्या कविताचा फोन आला त्या दिवशी अरे तुझ्यासाठी शेम्पेन घ्यायला
बाहेर पडलेलो, पण नंतर लक्षात आलं की तूला ती गिफ्ट म्हणून देता नाही
येणार. म्हणून आता जेव्हा केव्हा त्या अर्थाने बसू तेव्हा माझ्याकडून
तूला शँम्पेन. चीअर्स टू लाईफ. थांबतो.

Comments

Unknown said…
no comments thts so cute personal :* bt god bless u both