कैचीने नाळ कापली

24 वर्षांपूर्वी जन्मलो. आम्ही राहायला जोगेश्वरीला. ती आईची तिसरी वेळ होती. 8 वर्षांचा गॅप. 83 नंतर डिसेंबरच ते 1991 साल. त्या हॉस्पिटलचं नाव रचना वगैरे होतं असं बाबा सांगतात. मरोळला कुठंतरी ते हॉस्पिटल आहे. मी जाऊन शोधलंही. मला नाही सापडलं. ती शुक्रवारची रात्र होती. मी येण्याचे इन्डिकेशन्स देत होतो. बाबा आईला घेऊन रचनात पोहोचले. 
शनिवारची ती पहाट. मला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. पण ते यशस्वी ठरत नव्हते. शेवटी डॉक्टरांनी सिझरिंग करायचं ठरवलं. अखेर कैचीने नाळ कापली गेली. आई मोकळी झाली. मी रडू लागलो. दोन मुलींनंतर मुलगा झाला.. याचा कोण आनंद झाला असेल नै त्या वेळी बाबांना.
दोन मुलींनंतर 8 वर्षांनी मुलगा झाला. दोन्ही बहिणींना ही भाऊ मिळाला म्हणून आनंद झालाच असेलच नै.

मला तीन आई होत्या. आई..ताई.. आणि माई.

आई मला मारायची. ताईही मारायची. माई मारणं टाळायची. बाबांनी फार मारलं नाही. पण जेव्हा मारलं तेव्हा वळ उठले.

ताई-माई व माझ्यात जनरेशन गॅप. त्यामुळे आमच्यात म्हणाव्यात अशा गप्पा..चर्चा किंवा तत्सम झालंच नाही. झाली ती भांडणं. एकीशी भांडायचं..दुसरीनं मिटवायचं. एवढंच काय ते.
अंगणवाडीचे दिवस मला अजूनही आठवतात. आई-पप्पा दोघेही नोकरी करायचे. आई-पप्पा नोकरी करतात, हे कळायच्या आधीपासूनच मी पाळणाघरात वाढलोय. आमच्यात तशी काही अटॅचमेन्ट नाही. जेव्हा कळायला लागलं तेव्हा पप्पांच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघत रडणाऱ्या माझ्या डोळ्यांतले अश्रू गोठले होते. आई माझ्याच शाळेत शिक्षिका. शाळेत मला आई नाही बाईच म्हणायचं, अशी ताकीद होती. बाईंचा मुलगा म्हणून माझ्यावर इतर शिक्षकही डोळा ठेवून असायचे. डबा खाण्यापुरता मी आईच्या प्राथमिकच्या वर्गात जायचो. मला ते मुळीच आवडायचं नाही. नंतर नंतर डबा मिळत होता. पण तो ही मी कधीतरीच खाल्ला असेन.

आई घरी आली की तिचं कँटलॉग, पेपर तपासणं.. आणि घरं-जेवण... इत्यादी. बाबा घरी आले की त्यांची पूजा, मंदिर, देवाची पुस्तकं वाचणं... इत्यादी. पाळणाघरी सोडणं, शाळेत मिटींगला येणं किंवा अभ्यास केला नाही म्हणून मारणं या व्यतिरीक्त त्यांच्या त्या वेळच्या दिनक्रमात मी कधी होतो का?
मला हवा तसा वेळ माझ्या पालकांनी दिला नाही, असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे आता मीही बदला घेतो. दोन्ही बहीणींची लग्न झालीत. आई बाबा रिटायर्ड झालेत. पण आता मी त्यांना वेळ देत नाही. आमची नोकरीच तशीये. आणि त्यावेळी त्यांची नोकरी तशी होती.

मी लहान असताना त्यांनी मला वेळ द्यायला हवा होता.. असं मला वाटायचं. अजूनही वाटतं. नाही म्हणायला ते आम्हाला फिरायला घेवून जायचे. कोल्हापूर, सोलापूर, गावी, इत्यादी इत्यादी. पण त्याला वेळ देणं म्हणायचं का.

कारणाशिवाय केलेल्या गोष्टी मला आवडतात. जिथं कारण येतं तिथं जाणं मी टाळतो. काचं उत्तर माहित नाही हे किती भारीये. मग असं कारण नसलेल्या गोष्टी करू लागलो. तबल्याचा क्लास, शाळेचा क्लास झाला की शाळेचा अभ्यास, क्लासचा अभ्यास आणि तबल्याची प्रॅक्टीस यांत मला कुठे वेळ मिळाला स्वतःसाठी. मी ही नाही मला वेळ दिला.

कधी वाचनात.. कधी फिरण्यात.. कधी ह्यात तर कधी त्यात... सगळीकडेच व्यस्त होऊन गेलो. भरपूर फिरलो. हिंडलो. एकटाच. निवांत. पुढं प्रेमात वगैरे पडलो. अरे बापरे.

मग यातही आमच्या आड वेळ येऊ लागली. फोनच्या वेळा.. भेटण्याचे दिवस.. सगळं कसं शेड्यूलप्रमाणं करावं लागतंय नै. बोगसए सालं प्रेमही.

25वं लागलं. वेळ कुठे कसा गेला माहित नाही. 24 वर्षांत आपण काहीच नाही केलं सांगण्यासारखं. काय सांगायला हवंय? आपल्या सगळ्या जडणघडणीत आपल्याला कोणी जगायलाच नाही शिकवलं. आपण अजूनही अशिक्षित. अडाणी. इल्लिट्रेट. इत्यादी.

निर्विवाद... निरागस... असं काही केलं पाहिजे. ते काय असतं हे कधी कळणार? फार वेळ नाही हातात आता. 24 उलटून गेली. ज्या पद्धतीचं आयुक्श्य आम्ही सध्या जगतोय... त्यावरून फारफार तर आम्ही अजून 20 एक वर्ष तग धरू शकू.

20 वर्ष. 365 दिवस गुणिले 20. एवढेच दिवस बाकी आहेत आपल्याकडे.

जी 24 वर्ष घालवली ती पूर्णपणे वाईट होती असं नाही.. फक्त जी माणसं हवी होती जवळपास... जी जवळपास हवी वेळोवेळी असं वाटत होतं... त्यांनी काही वेळ दिला नाही. ती अजूनही वेळ देत नाहीत. वेळेपेक्षा दुसरं चांगलं गिफ्ट काय असू शकतं बर्थडेला देण्यासारखं.

ते द्यायला जमणार आहे का त्या माणसांना. तर नाही. कदाचित माहीत नाही. ठिकै.

माणसं साली भलतीच प्रॅक्टीकल आणि मँच्युअर्ड वगैरे झालीत. आणि मी सहामाही परिक्षेत सगळ्या विषयांवर काठावर पास झालेल्या विद्यार्थ्यासारखा. ज्याला खरंतर नापास व्हायचं होतं.

रडायचं.. पण डोळ्यातनं पाणी नाही आलं पाहिज्ये. डोळ्यातनं पाणी आलं तरी चालेल.. पण कोणाला कळलं नाही पाहिज्येल... की ते अश्रू आहेत.

बरळायचं.. काहीही. मनाला वाट्टेल ते. वाट्टेल तसं. किमान स्वतःच्या मनाला तरी आपण वेळ दिला याचा दिलासा मिळायला हवा. मनासी टाकीले मागे.

एक बाकी एकाकी
एक अंत एकांत
एक अडके एकात
एक एकटा जगात..
एक खिडकी एक वारा
एक चंद्र एक तारा
एक नजर एक वाट
एक एकटा एकटाच
व्वाह शिरवाडकर!!


एनीवे.. या सगळ्यांत माझं मलाच विश करायचं राहून जायचं... शुभेच्छा. लवकर मर. किंवा जगण्यात रम तरी.

Comments