...ते दिवस!

तेव्हा ऑफिस गुरुतेंगबहाद्दूर स्टेशनच्या अगदी जवळ होतं. पण आम्ही किंग्स सर्कलला उतरून तिथनं चालत ऑफिसला जायचो. 10 मिनीटं लागायची. कधी एकटा. तर कधी मित्रांसोबत. आत्तापर्यंत केलेल्या नोकऱ्यांमध्ये सगळ्यांत लांब असलेली ही नोकरी. एलिक्झर डिझाईन्स. ही अॅड एजेन्सी सोडून आता जवळपास वर्ष होईल. नव्हे वर्ष झालं.

2014च्या लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणूकांची फ्रीलान्स कामं संपली होती. मंकरंद आणि मी आम्ही दोघेही आता मोकळे झालो होतो. त्यात निखिल शिंदे हा आमचा कॉलेजमधला मित्र. त्याला महानगरपालिकांच्या निवडणूकांसाठी कँम्पेनिंग करायला टीम हवी होती. ते काम करावस वाटतं होतं. पण वेळ जुळून येत नव्हती.


दरम्यान, मकरंदला एक स्टोरी आठवली. अँन्थन चेकॉव्हची. मकरंद कॉलेजमध्ये असताना त्यानं पैसा वसूल या एकांकीकेत काम केलेलं. पैसा वसूल चं संपादन तेव्हा इरावती कर्णिक आणि अद्वैत दादरकर ने केलं होतं. या एकांकीकेची शॉर्ट फिल्म करुयात का असं मकरंद ने विचारलं. तासभर फोनवर एकमेकांशी बोल्लो. करुयात असं ठरलं. 

नंतर तो मिठबांव ला गेला. शूट लागलं. शूट करुन आला. फुटेज माझ्याकडे येऊन एडिटला पडलं. अंदाजे 13-14 सीन्स होते. मी तेव्हा बेरोजगार होतो. नोकरीच्या शोधात होतो. दिवसा मुलाखती द्यायच्या आणि घरी येऊन एडीट करायचं असा दिनक्रम होता. जून उजाडलं. मी एलिक्झरमध्ये लागलो. आणि थोडाफार मिळणारा वेळही मिळेनासा झाला.



शेवटी दुसरा एडिटर शोधला. त्याने पैसा वसूल एडिट केली. ती अर्धी एडीट झाली. मग परत थोड्या दिवसांनी दुसरा एडिटर. असं करत करत चार पाच एडिटरच्या हाताखालनां पैसा वसूल ही शॉर्ट फिल्म गेली. दरम्यान दिपक कुडाळकर आमच्या मदतीला धावून आले.

पाच शॉर्ट फिल्म्स करायच्यात आपल्याला, असं कुडाळकरांनी सांगितलं. मकरंद आणि मी कामाला लागलो. विक्रांत ला सोबत घेतलं. त्याची फेस ऑफ शॅडो ऐकली होती. तिचं काम सुरु झालं. पूर्ण झालं. थोड्या चुका होत्या त्यात. पण आम्ही शिकलो त्यातून बरंच काही. 

कुडाळकर सरांना अवयवदानावर एक फिल्म अपेक्षित होती. ती मकरंद ने लिहीली. विघ्नेश शिंदेनं तिच्या चित्रीकरणाची संपूर्ण जबाबदारी पार पाडलीमी या सगळ्यात कुठेच नव्हतो.  मी ऑफिस मध्ये राष्ट्रवादीचं राज्यसभेचं कँम्पेनिंग करत होतं.


कधी कधी असं व्हायचं की मी सगळं एडीट घरी जाऊन बघायचो. पण ते रिएडीट करायला वेळ नसायचा. मग सकाळी ऑफिसजवळ मकरंद भेटायला यायचा. त्याला हार्डडिस्क-पेन ड्राईव्ह देणं व्हायचं.  तेव्हा डिस्कस करायचो. ते बदल दुसऱ्या दिवशी व्हायचे.

पाच शॉर्ट फिल्ममध्ये माझ्या दोन डॉक्युमेन्ट्री. विक्रांतची एक शॉर्ट फिल्म आणि मकरंदच्या दोन, असं ठरलं होतं. डिसेंबरची डेडलाईन होती. ती जानेवारी पर्यंत एक्सटेन्ड केली.

यावेळी मी एनएच 17 या मुंबई-गोवा हायवेवरती डॉक्युमेंन्ट्री केली. आणि दुसरा विषय होता पोर्नोग्राफी. दोन्ही विषय हाताळायला पुरेसा वेळ मिळाला नाहीच. न्यूजरिपोर्टसारखे दोन्ही विषय बनले. तसे ते व्हायला नको म्हणून खूप धावपळ झाली. मधल्या काळात आम्हाला अनेकांनी मदत केली.

एका ख्यातनाम मिडीया हाऊसमधला मकरंदचा मित्र. त्याने आम्हाला पैसा वसूल चे ग्राफिक्स करुन दिले. रौनक फडणीस मदतीला धावून आला. केतकी चक्रदेवनं ऑडिओची जबाबदारी घेतली. आनंद मेनननं सगळ्या फिल्म्सला म्युझिकमय करुन टाकलं. आनंद आमच्या सगळ्यात एकदम सिनियर. रौनक फडणीस म्हणजे लय भारी मधलं ते माऊली माऊली गाणं तुम्हाला माहित असेलच. त्याच्या एडीटमध्ये ह्याचा मोठा हातय. केतकी चक्रदेव. मूर्ती लहान किर्ती महान. एलिजाबेथ एकादशी ला साऊंडसाठी एक पुरस्कार मिळाला होता. ही त्या फिल्ममध्ये साऊंड ला सहाय्यक होती. इतकंच काय... हंटर ला ही होती. दर्शन आंब्रे..वाईल्ड लाईफ करणारा हा सिनेमॅटोग्राफर. आता वेडिंगमध्ये स्थिरावणारं हे एक विश्वासातलं नाव. यानंही आमच्यासाठी वेळ काढला. लौकिक जोशी.  ठाण्याच्या इंडस्ट्रीतलं फायडी सिनेमेटोग्राफर मधलं अग्रणी घेतलं जाणारं नाव. सगळेच उत्तम.

पण हे काम करताना हे सगळेचं आपलं थोरपण जाणवू देत नव्हते, हे विशेष. मस्त माणसं.. जिवंत वगैरे.

सगळ्या फिल्म्स तयार झाल्या. या वर्षाच्या सुरुवातीला रविंद्रच्या मिनी थिएटरमध्ये त्यांच पहिल्यांदा पब्लीकली स्क्रिनिंग झालं. अगदी थाटामाटात. खूप लोकं आली होती. दिग्गज वगैरे. पेपरात वगैरे छापून आलं होतं आमच्याबद्दल. आम्ही तर हवेतच होतो. मी पहिल्यांदा निवेदन केलं होतं कार्यक्रमात. त्याचीही सगळे तारीफ करत होते. कार्यक्रम ज्या दिवशी झाला, त्याच दिवशी मी सोलापूर ला गझल संमेलनाला निघून गेलो गुरुसोबत.

सचिन गव्हाणे तेव्हा स्टेशनला सोडायला आला. त्याला प्रचंड आवडलेला दर्पण नावाचा पाच शॉर्टफिल्मचा कार्यक्रम. तर नंतर सगळं सपलं. विषय संपला.

मी पुढे स्टार स्पोर्ट्स साठी काम करु लागलो. शॉर्ट फिल्म, फिल्म, डॉक्युमेन्ट्री पासून पुन्हा थोडं लांब व्हायला झालं. मग... पुढचं आठवत नाही.

नंतर बीएमसीच्या रात्रशाळेत, रोहन टिप्पेच्या गणपतीच्या मंडळात,  खारला एक.. कोणता तरी असाच कलाकार लोकांचा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये, अजून असं कितीकिती आणि कुठचं कुठचं सांगू.. इथं तिथं सगळीकडं  या पाचही फिल्म्सचं स्क्रिनिंग सुरुच होतं.



मध्यंतरी आमचा मित्र सुकृत या सगळ्या फिल्म कुडाळकर सरांच्या कृपेने फिल्म फेस्टीवलमध्ये पाठवत होता. आत्तापर्यंत भारतातल्या काही तुरळक सोडल्या तर सगळ्याच शॉर्ट फिल्म फेस्टीवल्स मध्ये आमच्या पाच पैकी कोणत्या ना कोणत्या फिल्मने नाव काढलंय.

यात सगळ्यात जास्त पुरस्कार मिळाले ते पैसा वसूलला.



आता पुन्हा एकदा या सगळ्या फिल्म लागणार आहेत. सेंट झेवियर्सच्या मराठी विभागात.  24 तारखेला त्यांच्या तेजोमयी या अंकाचं प्रकाशन होणार आहे. ते निमित्त साधनं तिथल्या पोरांनी आमच्या फिल्म्स दाखवायचं ठरवलंय. नंतर गप्पाटप्पा ही होणार आहेत. आग्रह नाही... पण जमलं तर या.

तर आत्तापर्यंत अनेक ठिकाणी स्क्रिनिंग झाली. अगदी प्री स्क्रिनिंग पासना आम्ही प्रतिक्रिया जाणून घेत आलो. लोक भारी-बिरी रिएक्ट होतात. त्या प्रतिक्रिया जाणून घेणं माझ्या कुतूहलाचा विषय. म्हणून मी बहुधा जातोच जिथं कुठं स्क्रिनिंग असतं तिथं. आलात तर भेटूच.


खूप मज्जा आलेली या फिल्म मेकिंगच्या प्रोसेसमध्ये. दोन फिल्मपैकी केलेली एक फिल्म आहे पॉर्नोग्राफीवर. माझ्या आई बाबांना मी आत्तापर्यंत केलेली ही बेश्ट फिल्म वाटते. हार्डली चार दिवसांत ही फिल्म बनवलीये. दी हीडन वर्ल्ड असं तिचं नाव आहे. ती तुम्हाला कदाचित आवडू शकतो.

असो. थांबतो.

24 तारखेला, मंगळवारी. दुपारी चार वाजता.
मराठी वाङमय मंडळामध्ये. तेजोमयीचं प्रकाशनही आहे आणि स्क्रिनिंग सुद्धा.



आता सध्या कुठलीच शॉर्ट फिल्म करत नाहीये. करावीशी वाट्टे. पण वेळ आड येते. थकून जायला होतं. मेन्टली. फोटोग्राफी पुन्हा सुरु करावीशी वाट्टे. सगळंच पुन्हा सुरु करायला हवं. रांगोळी सारखं करायला हवं. काढलेल्या रांगोळ्या आता पुसून नवीन रांगोळी टाकायला हवी.



कधी-कुठे-कशी-केव्हा- .... माहीत नाही


Comments