जगणं लोअर टू अर्थ




  एलिक्झर सोडून दोन महिने झाले. जीटीबी ला असणारी एक छोटीशी अँडएजन्सी कम डिझायनिंग स्टुडिओच. पहिल्यांदाच घरापासून बरच लांब ऑफिस. अख्खा दिवस निघून जायचा त्यात. फक्त सकाळ झालेली कळायची आणि रात्र. सकाळी साडेसात ला उठायचो. आठ सव्वा आठ पर्यंत घर सोडायचो. अंधेरी ला बाईक पार्क करायचो आणि तिथून हार्बर पकडायला यायचो. 

ऑफिस चा पहिला दिवस आजही जशाचा तसा आठवतोय. सकाळी ७ वाजताच घर सोडलं आणि साडेआठच्या आधीच ऑफिसमध्ये पोहोचलो. ऑफिसला टाळं होतं. शेवटी कॉरिडोरमध्ये बसलो आणि बसल्या बसल्या तिथचं झोप लागली. आमच्या बॉसचा ड्रायवर उठवायला आला आणि म्हणाला - साडे नउ पर्यंत आलं तरी चालतं. ९ वाजता ऑफिस उघडायचं. जीटीबी स्टेशनच्या अगदी बाहेर एक रेल्वे कॉलनी आहे. त्या कॉलनीच्या आसपास गाड्यांची भरपूर दुकानं आहेत. तिथेच रामविलास बंगलो होता. मोठ्ठंच्यामोठ्ठं अपार्टमेन्ट. तिथं १०००-१५०० स्केअर फिट च्या जागेत एजन्सीचा स्टुडीओ होता. माझ्याच वयातली सहा सात मुलं आणि मोजून तीन मुली. एक स्टुडीओ मँनेजर आणि बॉस कम क्रिएटीव्ह हेड कम सीईओ. एवढाच काय तो स्टाफ. एजन्सी मधली माझी ही पहिलीच नोकरी.
ऑफिस जीटीबीला जरी असलं तरी किंग्स सर्कल ला उतरुन दहा मिनिटं चालत जायचो. सकाळी जाताना एकटाच असायचो. संध्याकाळी मात्र मित्र असायचे सोबत. अंधेरी हून ८.५२ ची लोकल पकडण्याचा खूप प्रयत्न असायचा. पण जिना उतरताना कित्येकदा ती लोकल प्लँटफॉर्म सोडताना पाहिलीये. खूप दुःख व्हायचं. नंतरची लोकल ९.२० ला असायची. मागून शेवटच्या डब्यात आम्ही.. सोबतीला जे कोणी असतील ते. म्हणजे मी संदीप सचिन संतोष सेकन्ड लास्ट डब्यात चढायचो. डब्यात भजनाचा एक ग्रुप होता. संदीप ला ती भजनं खूप आवडायची. संदीप आमच्या एजन्सीचा आर्ट डीरेक्टर. डफ वर वाजवलेला भजनी ठेका माझ्या कानात अजूनही गुंजतोय. 
अंधेरी हून किंग्स सर्कलचं अंतर २० मिनिटांच. अंधेरीहून गाडी सुटली की पार्ले कंपनीच्या बिस्कीटांचा घमघमाच यायचा. सांताक्रूझ जवळ आलं की पिंक कलर चा स्काय वॉक दिसायचा. खार सोडताना गाडी ब्रिज वर चढायची. तेव्हा कब्रिस्तान दिसायचं. फार विलक्षण वाटायचं तेव्हा. कित्येकदा विचार करुनही त्या कब्रिस्तानाचं वर्णन नाही करता आलं. तिथं आतमध्ये काही घरं दिसायची. बाहेर कपडे वाळत घातलेले दिसायचे. साधारण जून जुलै च्या महिन्यामध्ये तर कब्रिस्तानातला पाउस असा लेख सुचला होता. पण टंगळ मंगळ करत राहिलो आणि लिहायच राहूनच गेला. कब्रिस्तानाच्या दिसण्याअगोदर हिंदू स्मशानभूमी पण होती तिथं बाजूलाच. आपलं डेस्टीनेशनपण अशाच टाईपचं असणार असं तेव्हा वाटून जायचं. प्रत्येक स्टेशनच्या मधल्या अंतरांमध्ये डब्यातल्या भजनी ग्रुपचा एक अभंग बिनचूक संपलेला असायचा. वांद्रे स्टेशन जवळ येउ लागतं आणि पत्र्याची झोपडपट्टी दिसायला लागायची. संतोष आमच्या एजन्सी मध्ये इल्युस्ट्रेटर म्हणून काम करायचा. त्याला कित्येकदा तो लँन्डस्केप कागदावर उतरवण्यासाठी सांगितला असेन. 
वांद्र्याच्या खाडीजवळ गाडी आली की गलिच्छ गूवाचा घाणेरडा वास यायचा. कधी डब्यात बसायला जागा मिळाली नाही की आम्ही डोअर जवळच उभे राहायचो आणि असह्य होउन जायचो त्या वासाने. तेव्हा कित्येकांना त्या ब्रीज जवळ असणा-या पाईपलाईन पाशी हगताना पाहिलंय. अांघोळ करताना पाहिलंय. तिथंल एक दृष्य भार भारी असायचं. मागे कोणत्यातरी कंपनीची थ्री बीएचके किंवा टू बीएचके फ्लँट ची वेस्टर्न एक्सप्रेसवर भव्य पोस्टर अँड लागलेली असायची आणि त्या अँडसमोर ही सगळी माणसं किड्यामुंग्यांसारखी तिथंच हगायला बसलेली, पाहायला मिळायचं. मी त्यातल्या कित्येकांना स्मार्ट फोन घेउन हगायला बसलेलं पाहिलंय. गाडी एव्हाना माहिम ला आलेली असायची. माहिम हे तसं जंक्शन. माहिमपासून गाडी हार्बर ट्रँक वर येताना लाईट पंखे काही क्षणांसाठी बंद व्हायचे. एव्हाना आम्ही डोअर वर लटकायला पुढे आलेले असायचो. ट्रँकच्या अगदी बाजूने कडेने लागून असलेली घरं, तिथंच आजूबाजूला छोट्याशा मैदानात पोरं बॉक्स क्रिकेट खेळताना दिसायची, आया त्यांच्या चिमुरड्यांना पेपर वर हगायला बसवताना पाहिल्यात, मोठी माणसं पत्ते आणि कुठलेसे कागद घेउन ट्रँकशेजारीच चटई पसरून बसलेली पाहिलीयेत. या सगळ्या पाहिलेल्या गोष्टीं. याच कधी आकलन करण्याच्या कधी भानगडीत पडायचोच नाही. 
किंग्स सर्कल ला उतल्यावर एका पब्लिक ब्रीज वरुन जावं लागायचं. स्टेशन च्या बाहेर आल्या आल्या तिथं एक छोटीशी मशिद होती आणि बाजूला एक मंदिर पण होती. गाडीतून जेवढी केव्हढी माणसं उतरायची. दोन मिनिचं तिथं स्थिरावायची आणि मग पुढे व्हायची. ब्रीजवर हमखास त्यामुळे ज्याला घाई असायची तो कुणाला ना कुणाला धक्का देउन जागा करत निघून जायचा. आणि बाचाबाची व्हायची. त्या ब्रीजवर एकतरी फकिर भीग मागत बसलेला दिसायचा म्हणजे दिसायचाच. गांधी मार्केट ची अख्खी गल्ली आम्ही चालत जायचो. सकाळी जाताना सगळं उजाड असायचं आणि येताना मात्र तिथे कसले कसले कपड्यांचे पाणी पुरीचे स्टॉल लागलेले दिसायचे. 
आयुष्यात क्रिएटीव्ह काहीतरी करायला हवं म्हणून स्वतःची खाज भागवायला मी शॉर्ट फिल्म करत राहिलो. एजन्सी ची नोकरी सांभाळून मी नसताना घरी मात्र पाच शॉर्ट फिल्म्स् चं एडीट सुरु होतं. फेस ऑफ शँडो बद्दल मला खरं तर फारच अपेक्षा होत्या. पण स्क्रिनप्ले शूट मध्ये एक्झिक्यूट नव्हता करता आला. प्रयत्न पूर्णपणे फसला नव्हता. आम्ही शेवटी शेवटी खूपच माती खाल्ली होती, हे कळून चुकलं होतं. १५ जून ला फेस ऑफ शँडो चं शूट आम्ही कर्नाटक संघ ला केल आणि १६ ला मी एलिक्झर जॉईन केल. 
    एलिक्झर मधे असताना राष्ट्रवादी चं व्हाट्सअँप व्हीडीयो कँम्पेनिंग करायला मिळालं. नेवासा तालुक्याच्या एका आमदाराच्या पुस्तकाची कॉपीही लिहीली. धम्माल आली ते काम करायला. खास शूट साठी मला नेवासा तालुक्यामध्ये पाठवलं होतं. तिथं एस्. बी शेटे नावाचा एक भारी मित्र भेटला. हा तिथला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता. त्यांनीच आम्हाला नेवासा फिरवला. अशी माणसं राजकारणामध्ये अक्षरशः सडतायेत, असं मला मनापासून वाट्टं. त्यांनी स्वतःचं काहीतरी करावं, हे माझं आपलं एकतर्फी मत. भरपूर पैसा त्या आमदाराने प्रमोशन वर खर्च केला आणि तो हरला यात मला जराही काही विशेष वाटलं नाही.
जस जसं इलेक्शन संपायला आलं, तसं तसं मला फार काही काम नव्हतंच. कंटाळायला लागलो ऑफिसमध्ये. पण घरापासून अंधेरी-अंधेरीहून हार्बर-किंग्स सर्कल वरुन चालत ऑफिस असं जवळपास ८-९ महिने केलं. एजन्सी मध्ये काम करत असताना काही मजेशीर प्रोजक्ट पण केले. गीत रामायणाला ६० वर्ष पूर्ण झालेली. त्याची डॉक्युमेन्ट्री केली. एजन्सीत जॉईन होण्यापूर्वी शूट केलेल्या फेस ऑफ शँडो चं एडीट केलं. मकरंद सावंत दिग्दर्शित पैसा वसूल आणि अर्पण या दोन शॉर्ट फिल्मही एडीट केल्या. त्यावर ब-याच जणांनी काम पाहिलं. महत्वाचं म्हणजे एनएच १७ आणि द हिडन वर्ल्ड ह्या दोन डॉक्युमेन्ट्री सारख्या वाटणा-या दोन एव्ही पण केल्या.
आता, म्हणजे काल परवा काही आनंद देउन जाणा-या गोष्टी घडल्या. पैसा वसूल ही आमची फिल्म बेंगलूर फिल्म फेस्ट ला पहिली आली. मला तर सिलेक्ट कशी झाली, यायच राहून राहून आश्चर्य वाटत होतं. पण पहिली येणं म्हणजे सुखद धक्काच होता. कारण या फेस्टिवल ला मराठी भाषेतल्या दोनच फिल्म होत्या, आणि बाकीच्या सगळ्या अमराठी भाषिक होत्या. त्यातून पैसा वसूल पहिली येणं, आमच्या सगळ्यासाठीच कौतुकास्पद होतं. भरीसभर म्हणजे आम्ही केलेल्या पाच ही फिल्म्स बेळगाव फिल्म फेस्टिवल ला सिलेक्ट झाल्यात. आणि यापेक्षा कहर म्हणजे पुण्याच्या सावित्रीवाई फुले विद्यापिठाच्या डिपार्टमेन्ट ऑफ कम्युनिकेश स्टडीज कडून भरवण्यात आलेल्या फिल्म फेस्ट मध्ये अर्पण ला स्क्रिनिंग चा सन्मान देण्यात आला होता. हे सगळं अनपेक्षित होतं.


सध्याचं ऑफिस एका भल्यामोठ्या टॉवर मध्ये २४व्या मजल्यावर आहे. तिथना खाली पाहिलं की सगळं जगं इवलंस दिसतं. माणसं कीड्यासारखी दिसतात. लोअर परेल स्टेशन वरुन सुटनारी ट्रेन गांडुळासारखी वाटते. ऑफिसातून निघाल्यावर लोअर परेल स्टेशन ला जातानाच्या मार्गावर बरीच छोटी मोठी दुकानं मांडून भाज्या फळं विकायला बसलेले असतात. ही माणसं वरुन दिसतच नाही. वरती असलेल्या माणसाला इथना खालून जाणारा माणूसही दिसतं नाहीच. फार विचित्र घालमेल होउ लागते मनात. भरभर पावलं टाकत मी स्टेशन गाठतो. ट्रेन पकडतो..बोरिवली स्लो. आता एव्हाना मला एलफिस्टन, दादर, माटुंगा, माहिम ही स्टेशनं कळतंच नाही मागे निघून गेलेली. मी मोबाईल मध्ये दंग झालेला असतो, किंवा झोपी गेलेला असतो. 
पण माहिमची खाडी लागली की ट्रेनचा विशिष्ट आवाज येतो. वांद्रे जवळ यायला लागलं की वििचत्र वास यायला लागतो. दरम्यान मोबाईलचंही नेटवर्क सुद्धा गेलेलं असतं. आता आपली गाडी ब्रीज वरुन जाणार नसते, त्यामुळे कब्रिस्तान आणि स्मशान बघायला मिळणार नाही, याची जाणीव होते. जुना प्रवास पुन्हा डोळ्यांसमोर दाटून येतो. हात पाय सुन्न होतात. भानावर येईपर्यंत अंधेरी आलेलं असतं. पण आता आपण जोगेश्वरी ला उतरतो कारण अंधेरी ऐवजी आता बाईक जोगेश्वरी स्टेशन ला पार्क असते, हे ही विसरायला होतं. जोगेश्वरी येतं.. पंधरा मिनिटांनी घर येतं.. घरी येउन जेवायचं, झोपायचं आणि पुन्हा सकाळी स्वतःला सारखं सारखं बजावत राहायचं आता आपल्याला जोगेश्वरी ला जायचंय, अंधेरीला नाही.. लेफ्ट टर्नची जागा आता राईट टर्न ने घेतलीये, असं घोळवत राहावं लागतं. मग पुन्हा अशी असंख्य माणसं स्टेशनवर दिसतात.  मी ही स्वतःहून त्यांच्यातलाच एक होउन जातो. जीवघेणा प्रवास संपला असं वाटे पर्यंत दुसरा जीवघेणा प्रवासाला आपण कधी सुरुवात होउन जाते, कळंतही नाही. हे कळेपर्यंत लोअर परेल पुन्हा येतं आणि जगणं लोअर टू अर्थ झाल्याची जाणीव होते. 


Comments

Unknown said…
Wah bohat khoob !!
मस्तय रे...शेवट आवडला
bhushan vaidya said…
मस्त मस्त
Unknown said…
हे मुंबईतलं जगण असंच … कधी कधी आपलीशी वाटणारी हि गर्दी … तर कधी खाली खाली डब्यात मनात झालेली आठवणीची गर्दी …