अविचारी


                        संतोष भिसे नावाचा आपला एक फ्रेन्ड आहे. जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये एम.एफ.ए.चा स्टूडंन्ट आहे. यानं कमर्शिअल केलंय, औरंगाबादहून. मूळचा नगरचाय. पोरगा हुशार, मेहनती वगैरे आहेच. पण महत्वाचं म्हणजे एकदम डाउन टू अर्थ आहे. आपल्याला डाउन टू अर्थ असलेली माणसं खूप ग्रेट वाटतात. आपल्या मनात संतोष बद्दल भरपूर रिस्पेक्ट.
संतोष ला कॉलेजमध्ये एक प्रोजेक्ट आहे एम.एफ.ए.चा. त्यासाठी त्याने काही पेन्टीग्स केल्यात. त्यावर त्याला काहीबाही लिहून हवं होतं. मदत मागितली माझ्याकडून. मी पण त्याला देईन लिहून, असं सांगितलेलं. पण चित्र पाहून वेगळं असं काही लिहावसं वाटत नव्हतं. चित्र खूप बोलकं होतं. पण त्याला कॉपी हवीच आहे, अशी अट त्या प्रोजेक्ट मध्ये होती. खूप दिवस.. जवळपास आठवडा विचार करण्यात गेला. 
कॉन्सेप्ट बँचलर रुमची होती. अशा चार मित्रांसोबत एकत्र येउन मुबई पुण्यासारख्या शहरात मी कधी राहिलेलो नाहीये. कारण मूळच मुंबईचं. त्यामुळे बँचलर्स रुम या कॉन्सेप्टवर मी लिहीलेलं सर्रास चुकीचंच असणार, अशी मला खात्रीच होती. ते चुकू नये म्हणून मग आठवडा भर विचार करुन एका दोघांना हे चित्र दाखवून मी काही कॉन्सेप्ट मिळतेय का बघूया, असा विचार केला. पण ज्यांना दाखवली ते म्हणतात, ह्यावर कशाला काय लिहायला पाहिज्ये किंवा तू मस्त लिहीशील यावर, अशीच उत्तर मिळाली. म्हणून.. नव्याने चित्राकडे पाहिलं. बँचलर रुम ला मराठीमध्ये काही समांतर शब्द सापडतोय का यासाठी पण खूप शोध घेतला.. पण मनासारखा शब्द सापडला नाही… 
चित्रांवरती लिहीण्याचा अनुभव मस्त होता. हे मजेशीर आहे. फक्त खूप समजून घेण्याच्या भानगडीत पडलं ना तर प्रोब्लेम होतो. मग काही सुचतच नाही. उगाच फिलॉसॉफिकल कल्पना डोक्यात येत राहते, ज्यांना काहीचं अर्थ नसतो. त्यांना आवर घालणंही तेवढंच कढीण असतं. त्यांमुळे हे लिहीताना.. जराही विचार केला नाही, असं नाही. विचार हाच केला की यातून विचार मांडायचा नाही. लिहीलेली कॉपी… पुढे पेस्ट केलीये… बघा जमलीये का..
..................................................
.........................

 
त्याचं काय आहे, की आम्हाला प्यायला कारण नाही लागत. पण आम्ही कारणाशिवाय काही करतही नाही. त्यामुळे असंच पित बसणं आमच्या पिढीला शोभा देणारं नाही. आम्ही पितो. पण आम्ही का पितो यावर आम्ही चर्चाही करतो. आम्ही बँचलर आहोत. म्हणजे आम्हाला अस्सं वाट्ट की आम्ही बँचलर आहोत. कारण आमचं लग्न झालेलं नाही. आम्हाला लग्न करायचं नाही असंही नाही, पण ते होत नाही म्हणून आम्ही बँचलर पार्टी करतो, असं समजू नये.
आम्ही आमच्या राहत्या घरापासून लांब, मुंबई-पुण्यासारख्या कॉस्मो पॉलिटीन शहरात येतो. कशाला येतो. आम्हाला शिकायला चांगल कॉलेज हवं असतं… नोकरी हवी असते चांगल्या पगाराची. छोकरी हवी असते चांगल्या मुखड्याची. हे सगळं जे काही चांगल आहे ते आम्ही मूळ जिथे राहत असतो तिथं नसतं.. म्हणून मग आम्हाला बँचलरगिरी करायला मुंबई पुणं गाठावं लागतंच. इथे आल्यावर आमचा एक वेगळाच प्रवास सुरु होतो. 
आम्ही जेवतो कुठे, मेस चा डब्बा लावतो की खानावळीत जातो की रोज हॉटेलात मिष्टान्न सेवन करतो, असा प्रश्न सहसा आमच्या सोबत असणा-यांना पडत नाही. आम्ही कुठूनतरी दुरून परग्रहावरुन आलोय काहीतरी करुन दाखवायला याचंच कुतूहल सगळ्यांना जास्त. आम्ही हे जे सगळं करतो ते पोटासाठी.. ह्याचं अल्टीमेटम ब्रेड आणि बटरच. पण काहीतरी तुफानी करत असलेल्याचा एक वेगळाच फिल बँचलरच्या रुममध्ये जाणवतो. तो उगाचच.
आमच्या रुम मध्ये प्रकाश पण वेगळा असतो. सफेद ट्यूबलाईट पण वेगळा रंग सोडते आमच्या रुम मध्ये. ही खासियत आहे. आमच्या रुममध्ये कधी कोणती गोष्ट नीट ठेवायची नसते. ज्या वस्तू बाहेर जाताना लगेच हव्या असतात त्यांना दरवाजाच्या जवळच ठेवायचं. जास्त मेहनत करण्यापेक्षा योग्य कृती करण्यावर आमचा भर असतो, असा आमचा गैरसमज आहे. अंथरुण पांघरुण आम्ही कधीच घडी करत नसतो कारण प्रत्येक दिवसानंतर रात्र ही निश्चितपणे येणारच आहे, हे शाश्वत सत्य आम्ही जाणून आहोत. आता मी आणि माझा रुममेट असा एक सखोल गहन विषय आम्ही मांडू शकतो. मात्र त्याच्या खोलात शिरणं आम्हाला परवडणारं नाही. कारण अजूनही आम्ही बँचलर आहोत. सगळी सत्य एकाच वेळी उघड करण सोयीस्कर नाही आणि हिताचं तर मुळीच नाही. 
रुममेट नावाचं जे एक नाजूक नातं एका बँचरल रुममध्ये पाहायला मिळतं, त्यावर अद्याप कोणीच का प्रकाश टाकलेला नाही, या बद्दल आश्चर्य आहे. सालं चार भिंतीमध्ये जेव्हा एक रक्ताची माणसं एकत्र राहतात, त्याला घर म्हणायचं आणि जेव्हा तशाच चार भिंतीमध्ये वेगवेगळ्या मातीची माणसं एकत्र राहू लागली की ती बनते बँचलर रूम. तिचं घर कधीच होत नाही का. हे थोतांड आहे. बरं ठिक आहे. जर का नसेल होत तर ते चांगलंच आहे. होउही नये. कारण घरात अशी खुल्लेआम उघडीनागडी पोस्टर्स लावणं, पसारा करणं, देवाला न मानणं, चे गुएरा ला द्रोणाचार्यांच्या ठिकाणी नेउन ठेवणं, धर्म-जात-पातीची आपआपली समिकरणं राबवणं आणि आपल्याच मस्तीत गुर्मीत खिदळत राहणं, हे सगळं घरात करता येणं अशक्यप्राय नसलं तरी चँलेजिंग आहे ना भाउ. एव्हढी रिस्क कोण घेतो. 
आता बँचलर रुम म्हटली की सगळेच कमवत असतात असं नाही. त्यात सगळे सारख्याच वयाचे असतात असही नाही… पण कसंय की मोठं होण्यासाठी आधी लहान आहोत ह्याची जाणीव तर व्हावी लागते ना. ती इथे आम्ही एकमेकांना देत असतो. उडता येतंय की नाही हे पाहण्यासाठी आकाशात उडी घ्यावी लागते ना. ते कोणा ना कोणाकडे पाहूनच येत असतं. बँचलर लोकांमध्ये हे आयडॉल तयार होता असतात. मोल्ड होण्याची त्यांची तयारी आहे पण त्यातही त्याच्या टर्म आणि कंन्डीशन्स आहेत. आणि त्या जेन्युअन आहेत. आम्ही आज प्यायला बसलोय म्हणून एवढं सांगतोय बरं का…नाहीतर एव्हाना आम्ही एकमेकांशी हु का चू ही करत नाही.
आम्ही लोकसत्ता वाचतो म्हणून आम्हाला एवढं बोलता येत. कुबेराचे विणतो शेले… असा अभंग म्हणूनच आज पहिला पेग लावलेला. जाड्या आज पित नाहीये.
असाही तो कधीच का पित नाही. कसा जगतो…नशा जरुरी है. जी माणसं पित नाहीत ती पिणा-या माणसांचा राग का करतात. त्यांना एकदातरी रागाने पाजली पाहिजे. जरातरी सिंपथी दाखवावी एवढी माफक अपेक्षा आहे. बाकी जेव्हापासून आम्ही सिगरेट सोबत दारू प्यायला लागलोय तेव्हापासून आमचा स्वतःबद्दलचा अभिमान १० किलोने वाढलाय. यातला कट्टर पिणारा कोणीच नाही… सगळे नेट प्रँक्टीस करतायेत. पण रूबाब प्रत्येकाचा झिंगल्यासारखा. अर्थात झिंगण्यासाठी आम्हाला दारु लागते… सिगरेट लागते… आणि चकणा लागतो.
आमच्या वाट्याचं दुःख रिझवण्यासाठी आम्ही पित बसलेलो नाही. आम्ही सगळं सेलिब्रेट करतो. सुख तर सुख आणि दुःख तर दुःख. आम्ही आनंदी राहायचं ठरवलंय. फक्त ठरवलंय. आम्ही पितो म्हणून आम्ही. .. नाहीतर इथे कोण नाय कोणचा. वुई जस्ट सेलिब्रेट द मुव्हमेन्ट. लेट एनी मुव्हमेन्ट केम टू अस. वुई विल रॉक दँट मुव्हमेन्ट. क्षण नि क्षण आम्हाला बँचरल लोकांना महत्वाचाय. म्हणून सगळं सेलिब्रेट करायचंय. चकणा असो. दारु असो. सिगरेट असो. 

आमच्या रुममेट ला नोकरी लागली… आम्ही पितो.  आमच्या रुममेटने नोकरी सोडली… आम्ही पितो. आमच्या रुममेट ला नोकरी लागत नाहीये… आम्ही पितो. आमच्या रुममेटला डिसटिक्श्न मिळालं… आम्ही पितो. आमच्या रुममेटला कंडम माल पटला… आम्ही पितो. आमच्या रुममेटला बापाने पैसे नाही पाठवले.. आम्ही पितो.  आमच्या रुममेट ला रुम बदलायचीये… आम्ही पितो. आमचा नवीन रुममेट आलाय… त्याला बँचलर व्हायचंय… आम्हीही पितो… त्यालाही पाजतो.  वुई सेलिब्रेट.



Comments

Unknown said…
wa wa!!!!!!!!! majaaaaa ahe....... asach na pita pan vicharanchya kinva avicharanchya nashet zingun lihit raha... tyamule aamchya sarkhya vachakana celebrate karayla nimitta milta..... !!!!!!!!
bhushan vaidya said…
चांगभलं