गैरसमज


साला काय गंम्मत आहे ना …
मी ग्रॅज्युएट झाल्यावर नोकरी करायचीच नाही अस्सं ठरवलं होतं. नुसत्या डॉक्युमेन्ट्री आणि फिल्म शी रिलेटेश कामं करत राहायची असा निश्चय होता. अर्थात आपण ठरवलेल्या सगळ्या गोष्टी आपण करतोच असं नाही. तरुण असताना लग्न न करण्याचं ब-याच जणांनी ठरवलेलं असतं. आता लग्नाचा दाखला दिलाय म्हणून लगेच नोकरी आणि लग्नाची तुलना करायची काहीच जरुर नाही.  सांगायचा मुद्दा हा, की नोकरी करायची नाही असं ठरवलेलं वर्षभरापूर्वी. वर्षभर केलीच नाही. आवडेल ती कामं केली. जेव्हा पैसे कमवायची गरज आली, तेव्हा नोकरी करायला पाहिजे असंही वाटलं.  पर्याय म्हणून एका खासजी क्लासमध्ये लेक्चरर म्हणून मास्तरकी पण केली. आई शिक्षिका असल्यामुळे पोरानं आईचे गुण घेतलेत असे टोपणे सुद्धा खाल्ले मित्रांकडनं. पण वेळेला पुरतील एवढे पैसे हातात येत होते, म्हणून मग मित्रांच्या टोमण्यांचा काही परिणाम झाला नाही. आणि लेक्चर बेस्ज्ड पैशांमुळ तितकीशी गरज नाही वाटली नोकरीची. अर्थाच घरच्यांना माझं हे असं वागणं, म्हणजे नोकरी न करणं अजिबात आवडत नव्हत. त्यांच्या वागण्यातून त्यांनी याचे ब-याचदा निषेध नोंदवले आहेत. पण आपल्यावर त्याचा काही एक परिणाम झालेला नव्हता.
मला फिरायला खूप आवडतं. सदान् कदा कुठे ना कुठे हिंडत राहणं, आपला छंद आहे. गाडी-बाईक दोन्ही चालवता येत असल्यामुळे माझं अडत कुठेच नाही.  कधी कोणाला मदतीसाठी ड्रायव्हर म्हणून, तर कधी ड्रायव्हर ला सोबत म्हणून.. किंवा कधी स्वतःहून ठरवून किंवा कधी दुस-याने बोलावलं म्हणून नेहमी कुठे ना कुठे जाणं होतंच असतं. गेले चार एक वर्ष माझ्या शाळेतले मित्र गोवा ला जायचा प्लान करत होते. पण योग काही जुळून येत नव्हता. अखेर या वर्षी तो योग आला आणि आम्ही गोवा ला जायचे ठरवले. साधारण १४ फेब्रुवारी ला आम्ही गोवा ला जायला निघणार होतो. त्या आधी ४ दिवस मी गझल संमेलनाला आष्टगाव ला गेलो होतो. आष्टगाव म्हणजे अमरातीच्या पुढे साधारण ५०-६० किमी च्या अंतरावर. त्याआधी मुंबईहून अमरावती तब्बल ७०० किंमी.  तिथेही गाडी घेउनच गेलो होतो. सोबत कुणी रिलिव्हर ही नव्हता.  तब्बल ७५०-८०० किमी ड्राईव्ह करुन पुन्हा १४ ला निघण म्हणजे त्रासदायकच होतं. पण यंदा गोवा प्लान बारगळू नये म्हणून काहीही झालं तरी १४ ला जायचंच अस्स ठरवलं.
१४ ला पहाटे चार वाजता आम्ही सगळे माझ्या सेकंड हॅन्ड नव्या होंडा सिटीने निघालो. तसा मी प्रामाणिकपणे नियमबाह्य वाहन चालक आहे.  म्हणजे झिगझॅग, स्पीड वगैरे तर आपले गुणधर्म आहेत. आणि या असल्या सवयींवर जरा लगाम बसवा, असे उपदेश अनेकांनी मला केलेत. पण इतरांच ऐकेलं तर तो मी कसला…
       तरी ह्या वेळी थोडी कमी वेगातच गाडी हाकत होतो. मुंबई गोवा वरचा कशेडी घाट उतरलो आणि आमच्या गाडीला समोरुन येणा-या एक स्वीफ्ट वाल्याने ठोकलं. त्यानं समोरासमोर ठोकू नये म्हणून मी गाडी फूल लेफ्ट ला मारली म्हणून थोडक्यात सगळे बचावलो. आणि पहिला बॅंग माझ्या डोअर वर होउन स्वीफ्ट वाला आम्हाला घासत पुढे गेला. हा अपघात मी पुढे आणखीन एक्सप्लेन करत नाही, नाहीतर विषयांतर होईल. अपघातात कोणालाही साधं खरचटलं ही नाही. गोवा ट्रिप यशस्वीरित्या पूर्ण करुन आम्ही घरी परत आलो. माझ्या घरी गाडी ठोकून आलेल्याचं कळालं तेव्हा जाम शिव्या पडल्या. आधीच नोकरी करत नाही, मनाच्या मर्जीने वागणार, नुसते लाड चाल्लेत, कधी शिस्त लागणाराय याला वगैरे वगैरे स्तुतिसुमनं वारंवार सगळ्यांकडून ऐकावयास मिळत होती. ह्या सगळ्या जाचातून सुटका होण्यासाठी काही काळ का होईना नोकरी करुयात…असं ठरवलं आणि प्रयत्न सुरु केले. घरच्यांचा राग शांत झाला की पुन्हा आपण आहोतच.. येरे माझ्या मागल्या करायला.
अशातच गोव्याला असताना दक्षता ठसाळे नावाच्या टीव्ही ९ मध्ये असणा-या मैत्रिणीने जय महाराष्ट्र नावाचं नवीन चॅनल येतय अस सांगितलं. आणि त्या चॅनल साठी बरिचशी टीव्ही९ मधली मंडळी स्थलांतरित झालेल्याच कळालं. असं असताना मी टीव्ही९ ला नोकरीसाठी अर्ज केला नसता तरच नवल होतं. अर्ज केला.. सिलेक्ट झालो.. पण पगार काही मनासारखा देईनात म्हणून मी त्यांना नाही बोलून आलो.  अर्थात लोकांना नोक-या मिळत नाहीत आणि तूला किंमत नाही मिळालेल्या संधीची वगैरे वगैरे प्रवचनांनी माझा उद्धार केला. माज असल्यासारखाच नकार दिला होता  त्या टीव्ही९ च्या एच् आर् वाल्याला. 
पण काय माहित काय झालं त्याला. अखेर पुन्हा त्यांनी कॉल करुन बोलावलं आणि मांडवली करुन अखेर मार्चच्या ५ तारखेपासनं टीव्ही९ ला जॉईन झालो. आता जवळपास महिना झाला. चॅनेलमध्ये काम करण्याची पहिलीच वेळ आहे. टीव्ही९ च्या आउटपूटच्या प्रॉडक्शन विभागाला असतो मी. इथे बातम्यांचे व्हीज्युअल्स एडिट होतात, बाईट कापले जातात, पॅकेज बनतात, प्रोमो-मोन्टाज तयार होतात, ग्राफिक्स् बनतात. व्हिओ रेकॉर्ड होतात. रन डाउन वाले टॉकबॅक वर सगळं झटपट पटापट मँगी बनवल्यासारखे पॅकेज मागत असतात. इथेच बुलेटिन हेडलाईन लागतात… बुलेटिन रन लागतो. 
एडिटींग माझ्यासाठी अजिबातच नवीन नव्हतं. पण कशानंतर काय हे समजणं माझ्या कुतूहलाचा विषय होता. त्यामुळं सगळं कसं नव्या नवरीसारखं वाटतंय. पण या नव्हरीची सासू एक नाही तर एकापेक्षा एक, अनेक-कित्येक आहेत, आणि सासरे बनण्यासाठी जबरदस्त स्पर्धा आहे. नणंद, भावजय आणि दीर यांचा जाच तर आहेच. पण सोबतीला सवत असल्यासारखे, पण आपुलकीनं शिकवणारे मित्र पण बरेच आहे. असो. आपल्याला या सासू-सूनेच्या वादात पडायचं नाही. 
तर.. सांगायचा मुद्दा हा की.. आयुष्य तेच आहे नावाचा एक ब्लॉग दीडएक वर्षाआधी केला होता. त्यात नोकरी सोडण्याविषयी लिहीलं होतं आणि यात नोकरी जॉईन करण्याविषयी लिहीलय. 
५ तारखेपासून सुरुवात झालेल्या माझ्या नोकरीला महिना होत आला. या महिन्यात बातम्यांचा बाजार पाहिला, असं म्हटलं तर त्यात अतिशयोक्ती होणार नाही. अगदी प्राध्यापकांच्या संपाच्या बातम्यांसहित झालेल्या आरंभाला अगदी आता अजित दादांच्या वक्तव्यांपर्यंतचा मी जिवंत साक्षीदार आहे. यातली कॉमन बातमी दुष्काळाची होतीच. अर्थात त्या दुष्काळाचा या सगळ्या टीव्ही वाल्यांनी जोकच करुन टाकलाय. त्यात अध्ये मध्ये सलमान खान, संजय दत्त हे ही जोडीला होते. मध्ये काटजू होते. संतोष मानेची फाशी होती. मुंब्रातली इमारत पडली, त्यावर तर टीव्ही९ सलग चार दिवस खेळत होतं. या सगळ्यात मी वॉईस ओवर अारटिस्ट् म्हणून नव्याने नावारुपाला आलो. त्याबद्दल टीव्ही९ चे आभार. चांगल्या समाजासाठी व्हॉईस ओवर का होईना… माझ्या कडना केला गेला. मी सातवीत असताना रंग खेळणं सोडलं होतं, टीव्ही९ ने माझी ही ९ वर्षांची तपस्या भंग करत मला रंग खेळायला भाग पाडलं. त्याबद्दल ही थॅक्स्.

या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं ऑफिस माझ्या घरापासनं ६-७ मिनिटांच्या अंतरावर असल्यामुळे मी नोकरी साठी होकार दिला. यात ही आमचा माज रिफ्लेक्ट होतो. पण आमच्या ऑफिसमध्ये डोंबिवली, खोपोली सारख्या ठिकाणंहून महाभयंकर असा प्रवासाचा त्रास सोसत लोक येतात असं जेव्हा मला कळालं, तेव्हा मला स्वतःचाच हेवा वाटला.
आता पार्ट टू बिगीन्स… इथे नोकरी करण्यापूर्वी मी एका खाजगी क्लासमध्ये लेक्चरर म्हणून काम करत होतो. ती नोकरी नव्हती. पण ते काम ही मस्त होतं. आणि हे कामही मस्त आहे. अर्थात कोणतं काम कितपत आवडून घ्यायचं किंवा घ्यायचं नाही हे सर्वस्वी व्यक्तिसापेक्ष आहे. आता नोकरी तर करतोच आहे. पण सोबतीला डॉक्युमेन्ट्री पण आहे. 
गेल्या वर्षी फूल टाईम वेळ काढत दहीहंडीसाठी वाट्टेल ते ही डॉक्युमेन्ट्री केली. तिला पुरस्कार वगैरे मिळाले. मिडीयाने पण खूप कौतुक केलं तिचं. आता पानिपत ह्या विषयावर अभ्यास सुरु केलाय. विश्वास पाटलांच पानिपत वाचत असतानाच एका मित्राने संजय क्षीरसागर नावाच्या इतिहासकाराचं पानिपत असे घडले  नावाचं पुस्तक आणून दिलंय. ते वाचायला घेतलंय. तेव्हापासून विश्वास पाटलांची कादंबरी नकोशी झालीये. अर्थात ती चांगली नाही असं मला अजिबात म्हणायचं नाही. हे आपलं माझं (मूर्खपणाचं) मत मांडण्याचा अधिकार आहे, म्हणून त्याचा पूरेपूर वापर करुन घेतोय, एवढंच. नोकरीसोबत आता डॉक्युमेन्ट्री ही आहे, फोटोग्राफी सुद्धा आहे. पण एक मोठी गोष्ट या सगळ्यात हरवून जातेय. ती म्हणजे फिरणं. नकळत पणे नोकरीने दिनचर्येची एक शिस्त घालून दिलीये. त्यातही शक्य तितका बेशिस्तपणा करण्याचा आमचा अट्टाहास असतो. 
आता या सगळ्या महिन्याभराच्या काळात एक वेगळं जग बघितलंय. एक वेगळीच दुनिया अनुभवलीये. या दुनियेतल्या लोकांवर सर्वसामान्यांमध्ये फारसं कुणी लिहीताना बोलताना दिसत नाही. म्हणजे बातमीदारी करणारे, बातम्यांच्या बाजारात वावरणे, किंवा बातम्या टीव्हीवर दिसेपर्यंतच्या अख्या प्रोसेस मध्ये असणारी माणसं सोडली तर या बातमी करणा-या लोकांवरच्या बातम्या कोणीच करत नाही. गेल्या वर्षी जेष्ठ पत्रकार व संपादक सचिन परब यांनी टीव्ही पत्रकारांच्या जीवनावर बेतलेला एक हटके दिवाळी अंक काढला होता. त्याचं नाव होतं न्यूजरुम लाईव्ह. त्या दिवाळी अंकात न्यूजरुम होतं. पण न्यूजरुमचा लाईव्हनेस आणणं मासिकासाठी कठिण  होतं. 
इंटरनेट मिडीयावर सगळं कसं उघड नागडं लिहीण्याची मुभा असते. त्यामुळे या लाईव्ह न्यूजरुम विषयी आता लिहायला घेतलंय. त्याविषयी जे वाट्टेल ते वेडवाकडं लिहायचा प्रयत्न करतोय. 
ते प्रत्येक आठवड्याला नवीन नवीन अपडेट करत राहायचं असंही मनाशी ठरवलंय. पण अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे लग्न न करण्याचं ठरवणारे आणि ठरवलेल्या गोष्टी न करणारे यांचातला रोग मला लागू नये, एवढी माफक अपेक्षा आहे. 
आता लिहीत राहिन सतत यावर… प्रॉमिस… सो डोन्ट मिस नेक्श्ट ब्लॉग… 
तूर्तास अपघातानंतर प्रचंड भडकलेल्या माझ्या आईबाबांचा राग शांत झालेला आहे आणि मी नोकरी सोडण्याच्या आत माझं लग्न लावून द्यायला पाहिजे, अशी धोकादायक आणि नॉटी मनाला दिलासा देणारी बातमीही खात्रीलायक सूत्रांकडून असाईनमेन्ट डेस्कच्या हाती लागलेली आहे. त्यामुळे ब्रेक नंतर लग्न आणि पत्रकार हा ब्रेकिंग विषय घेउन येत आहोत.. आपण कुठेही जाउ नका… वाचत राहा… मनासी टाकीले मागे!

Comments

Gangadhar Mute said…
सुखरूप बचावल्याबद्दल परमेश्वराचे आभार.

पुढील "सर्व प्रकारच्या" प्रवासाला हार्दीक शुभेच्छा. :)
Siddhesh Sawant said…
धन्यवाद मुटे सर...
Dagdu Lomte said…
chhyan...
aaniApghatatun wachlat he (aamch) Nashib