..असा होता टीव्ही ९ मराठीचा राजीनामा!
अमोल मोरे नावाचा एक मित्र टीव्ही९ मध्ये भेटला. मध्यंतरी त्याचा फोन आला. नंबर सेव नव्हता म्हणून ओळखलं नाही. उशिरानं ट्यूब पेटली. अमोल मूळचा कोकणातला. मी ही कोकणातलाच. त्यामुळे लगेच आपुलकी निर्माण होतेच. हल्लीचीच गोष्ट. मी जॉईन झालो होतो नुकताच टीव्ही९ मराठीला. आणि अमोल सोडून चालला होता चॅनेल. अमोल आता गावी असतो. लांजा-राजापूर जवळ त्याचं गावंय.
मला वाटलं चांगली संधी मिळाली म्हणून अमोल टीव्ही ९ सोडून जात असावा. पण तसं नव्हतं. अमोल कंटाळला होता. वैतागलेला. गावी जाऊन शेती करायचं अमोलनं मनाशी पक्क केलं. अमोल गावी गेलाय. मी जेव्हा टीव्ही९ मराठी सोडलं. तेव्हा त्यानं फोन केला. फोनवर बोलणं झालं. त्यावरना तो समाधानी वाटत होता. दोन पैसे कमी कमवेन. पण कटकटीचं आयुष्य नको रे बाबा, असं अमोल सोडून जाताना बोल्ला होता, ते डोक्यात एकदम घट्ट बसलं होतं. असा धाडसी निर्णय घेणारे अमोलसारखे फार कमी जण उरलेत माध्यमांत काम करणारे. अमोलच्या हिमतीला सलाम.
महिन्याभरापूर्वी मी ही टीव्ही ९ सोडलं. माझी कारणं वेगळी होती. टीव्ही ९ मध्ये मी २०१३ सालीही काम केलं होतं. तिथे काय माहौल आहे, टेक्नीकली चॅनल किती कमजोर आहे, आणि काम करण्यासाठी लागणारं वातावरण पूरक कसं नाहीये, हे सगळं मी जाणून होतो. तरीही गेलो. खाज म्हणा किंवा नवीन काहीतरी करुन बघण्याची इर्षा म्हणा, मला टीव्ही ९ मध्ये जावंस वाटत होतो म्हणून गेलो. योग्य अयोग्य, चूक बरोबर असा कोणताही विचार न करता, मनाला जे वाटलं ते केलं. त्याचा पश्चाताप आजही जाणवत नाहीच. उद्या जाणवेल, याचीही आशा थोडी विरळच.
टीव्ही ९ चार-पाच वर्षांपूर्वी जसं होतं, तसंच ते आजही आहेच. हे असलं सातत्य राखायला केवढी मेहनत घेतली असेल तिथल्या वरिष्ठांनी, हॅट्स ऑफ. गेल्या काळात तिथले अनेक वरिष्ठ चॅनेल सोडून गेलेत. उमेश कुमावत संपादक म्हणून आले. पण फार काळ तिथे थांबले नाहीत. अनेक वर्षांपासून असलेले अभिजीत कांबळे हे टीव्ही ९ मधलं मोठं नावं. टॅक्नीकली स्ट्रॉँग, सेन्सिबल आणि अपडेटेट असे अभिजीत सरही चॅनेल सोडून गेले. इनपुटच्या प्रीती सोनपुराही चॅनेल सोडून गेल्यात. निलेश खरेदेखील गेले. प्रमोद चुंचूवार गेले. माझ्यासारखी चिल्लर आणि छोटीमोठी प्रोड्यूसर लोकही येत-जात राहिले. मध्यंतरी असंही कानावर आलं की परमेश्वर गडदे नावाच्या एका आउटपूटमधल्या मित्राला राजीनामा द्यायला लावला. खरंखोटं टीव्ही९चा एचआर जाणो. असंही ऐकून आहे की, गजानन कदम नावाच्या माणसाचं ऐकण्यासाठी काहींना ताकीदही देण्यात आली.
टीव्ही ९ चे आधीचे संपादक रेड्डी सर होते. ते ही गेले. मोठमोठी अनेक माणसं गेली. खरंतर टीव्ही९ हे चॅनेल मराठी. पण त्यांचा संपादक कधीच मराठी नव्हता. निलेश खरे, उमेश कुमावत ही मराठी कोळून प्यायलेली माणसं होती. पण त्यांना फार काळ तिथं टिकता येणार नाही, असं वातावरणच तयार करण्यात आलं. विनोद कापरी सध्या तिथं सल्लागार संपादक आहेत. पण त्यांनाही मराठी कळत नाही. विनोद कापरी टीव्हीतला मोठा माणूस. पण ज्या भाषेचं चॅनेल आहे, ती भाषा संपादकाला कळलीच पाहिजे, असा काहीही नियम नसतो, हे मला टीव्ही९ मध्ये आल्यानंतर कळलं. ही टीव्ही९ची परंपराच आहे, असं म्हणायलाही वाव आहे. शमीत सिन्हा नावाचे मोठे हिन्दीतले पत्रकार तिथे आहेत. ते तिथे काय करतात, हे टीव्ही९ मध्ये काम करणाऱ्या कुणालाही किंवा खुद्द शमीत सरांनाही विचारायला हरकत नाही.
हे एवढं सगळं उघड-नागडं लिहीण्यामागे कारण आहे. माध्यमांमध्ये काम करणा-या अनेक प्रस्थापित लोकांनी एकतर लगेचच नोक-या सोडल्या पाहिजेत किंवा त्यांना काढून तरी टाकलं पाहिजे. खूप जुन्या काळापासून टीव्हीत काम करतो आहोत, या एका कारणामुळे मराठी वृत्तवाहिन्यांचं ८०पेक्षा जास्त टक्के नुकसान झालेलं आहे. या ८० टक्के लोकांनी मराठी वृत्त वाहिनीत काम करणं सोडलं, तर फार बरं होईल. तसं झालं तर वृत्तवाहिन्यांचच भलं होईल. अर्थात हे निव्वळ माझं मत आहे. या माझ्या मतावरुन तुम्ही मला हव्या तेवढ्या शिव्या घालू शकता. त्या मी आवडीनं पचवीन.
माध्यमं बदलताएत. बदलत्या माध्यमांत काम करण्याची पद्धत बदलली नाही, तर कसं चालेल?
असो, अमोलसारखा निर्णय घेण्याची ताकद आणि मानसिकता देव या सगळ्या प्रस्थापितांना देवो.
टीव्ही९ मध्ये खूप छान माणसं काम करतात. या छान माणसांनी आपलं छानपण सोडून दिलं, तर हे चॅनेल आपली विश्वासार्हता परत मिळवू शकेल, असा मला विश्वास नाही तर खात्री आहे.
बाकी घर काय सगळ्यांनाच चालवायचं असतं, बिलं सगळ्यांनाच भरायची असतात. पण मूल्यांशी तडजोड करुन बिलं भरायची की मूल्यांशी प्रामाणिक राहून समाधानी आयुष्य जगायचं, एवढाच प्रश्नंय.
तसं आपण कधीच आपले राजीनामे सार्वजनिक करत नाही. मी तर आतापर्यंत ब-याच नोकऱ्या केल्या. सोडल्या. त्यावेळी मी इतका मोठा राजीनामा कधीच लिहीला नव्हता. चार ओळींपलिकडे कधी मी राजीनामा लिहीलाच नसेन. पण टीव्ही९ ला दुसरा राजीनामा लिहीत असताना खूप छान वाटत होतं. मनापासून असं वाटलं की तो राजीनामा वाचला गेला पाहिजे, म्हणून हा खटाटोप.
राजीनामा मराठीत लिहीला होता. पण सल्लागार संपादक आणि एचआर दोघांनाही मराठी कळत नाही. त्यामुळे अॅड एजेन्सीमधला माझा कॉपी राईटर मित्र प्रतिक, कॉलेजमधली मैत्रिण पूर्वा आणि फेसबूक फ्रेन्ड विशाल यांनी तो इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करुन दिला. या तिघांनीही राजीनामा वाचून मनापासून दाद दिली आणि शिव्याही घातल्या होत्या. मज्जा आली होती. लिहीणाऱ्याला अजून काय हवं असतं.
आदरणीय,
सांगायला फारसा आनंद होत नसला तरी अतिव दुःखदेखील होत नाहीये. हा मेल लिहीताना एका मोठ्या ताणातून मुक्त होत असल्याची भावना आता माझ्या मनात आहे. माफ करा, पण उद्यापासून म्हणजे १० नोव्हेंबरपासून मी ऑफिसला येणार नाहीये. हा माझा राजीनामा समजावा, आणि तो स्वीकारावा, ही कळकळीची विनंती. मला यापेक्षा जास्त चांगली संधी मिळाल्यानं मी नोकरी सोडतोय. पण नोकरी सोडण्याचं कारण फक्त चांगली संधी नाही आहे. तर बरंच काही आहे.
गेल्या दोन पेक्षा जास्त आठवड्यांपासून मी एकटा एका विनोदी शो वर काम करतोय. ऐनवेळी टाकलेली जबाबदारी एक आव्हान म्हणून मी स्वीकारली. पण नंतर त्या जबाबदारीचं ओझं माझ्यावर लादलं जातंय की काय, अशी शंका मला वाटू लागली. स्क्रीप्ट, शूट, कॉस्ट्यूम, लोकेशन, दिग्दर्शन, जुने कॉमेडी शो आरकाईव्ह करणं, लेखकांकडून वेळेत स्क्रीप्ट मागवून घेणं, प्रॉडक्शनवाल्या गणेशच्या प्रत्येक टुकार प्रश्नांना उत्तरं देणं, अभिनेत्यांना भेटणं, त्यांच्या रिहर्सल करणं, स्क्रिप्ट हिंन्दीमध्ये समजावून सांगणं, लेखकांसोबत मीटिंगा करणं, हे सगळं कोऑरडिनेशन निव्वळ मी एकटा करत होतो. कोऑरडीनेशन करण्यासाठी मी पत्रकारीता शिकलो नाही. गेले काही दिवस मी करत असलेल्या कामाचा पत्रकारीशी संबंध आहे का, हा प्रश्न मला गेले काही दिवस सतावतोय. याचा ताण म्हणा किंवा मग वैताग, आता माझा निर्णय झालाय. मी थांबतोय.
मी सांगितलेला माणूस मला मदतीसाठी दिला गेला नाही. एक शो काढणं आणि तो ही विनोदी, हे काही हसण्याइतकं सोप्प तर नक्कीच नाही, हे तरी तुम्हाला पटलं असेलच ना. इतकंच काय तर या शो चं बजेट काढणंदेखील मीच केल. पत्रकारीतेचा आणि या सगळ्या कामांचा काही संबंध आहे, असं मला तरी वाटत नाही. राहता राहिला प्रश्न लिहीण्याचा, तर मी स्वतःही स्क्रिप्ट लिहीलं आणि नको त्या जबाबदारींतून मला मुक्त करण्याची मागणीही केली. पण त्यावरही मला काही ठोस उपाय कुणी केल्याचं जाणवलं नाही. माफ करा, पण इतकं सगळं काम पोटतिडकीनं करुनही माझा पगारही वेळेत आला नाही. तो न येण्यामागे तांत्रिक कारणं नक्कीच असतील. ती कारणं मला मान्यही आहेत. पण त्या तांत्रिक अडचणींतून मार्ग काढण्यासाठी पाठपुरावाही मलाच करावा लागला. त्याचा जो मनस्ताप भोगावा लागला, त्याची किंमत तुम्ही करु शकाल का ? आशा करतो की या महिन्यात जे काही थोडे दिवस मी काम केलं, त्या कामाचा आर्थिक मोबदला किमान वेळेत मिळेल.
मला खात्री आहे, तुम्हाला माझ्यापेक्षा चांगला प्रोड्यूसर कॉमेडी शो साठी मिळेल. कुणामुळे कधी कुणाचं काही अडत नाही हे तर तुम्हाला माहित आहेच. त्यामुळे माझ्याशिवायही टीव्ही९ मराठी गगनभरारी घेईल, याचा मला विश्वास वाटतो. कृपा करुन मला थांबवण्याचा आणि समजवण्याचा प्रयत्न करु नका. पगार झालेला नसतानाही मी मनापासून या शो साठी धडपडलो. पण अहमदनगरहून आलेल्या छोट्या घनश्यामच्या कुटुंबियांना देण्यात आलेली वागणूक पाहिली आणि काळजाचे तुकडे झाले.
मराठी माणसाच्या हक्काचा नारा देणा-या चॅनेलची चॅनेलमध्ये जीव ओतून काम करणा-यांचं कौतुक करावं अशी अपेक्षा नाही. पण किमान माणसाला समजून घ्यायचा तुम्ही मनापासून प्रयत्न कराल, अशी मी आशा बाळगतो.
मला संधी दिलीत, त्याबद्दल मी तुमचा कायम ऋणी राहिन. टीव्ही ९ मध्ये काम करण्याचा अनुभव अफलातून आहे. हे दिवस माझ्या कायम लक्षात राहतील. तुम्ही सगळे खूप थोर आणि हुशार आहात. तुमच्याकडून मी खूप काही शिकलो. अशावेळी नेहमी आपण काय करायचं हे शिकतो. यावेळी मी काय करायचं नाही, हे शिकलो. त्याबद्दलही तुम्हा सगळ्यांचे पुनश्च मनापासून शतशः आभार.
विश यू लव लक एन्ड सकसेस…
गुड बाय
तुमचा,
सिद्धेश
Comments