राळेगणसिद्धी लाईव्ह


राळेगणसिद्धी अण्णांच गावं. भष्टाचार विरोधाच्या अण्णांच्या उपोषणाला जितकी प्रसिद्धी मिळाली तितकीच त्याच्या गावाला ही मिळाली. अर्थात याचं सगळं श्रेय प्रसारमाध्यमांना जात. अण्णाचं उपोषण सुरु झाल्यापासना काही प्रेसवाले तिथे तळ ठोकून काही स्टोरी मिळतेय का याची वाट बघतायेत... तर काही स्वतः स्टोरी क्रियेट करण्यात बीझी असल्याचं दिसून आलं.
शिरुर पासना १०-१२ किमी च्या अंतरावर असलेलं हे गाव. गावासारखं गाव. शे-दोनशे घरं, दोन मंदिरं, अण्णांनी यशस्वीरीत्या उभे केलेले काही पाठबंधारे सारखे प्रकल्प, शेतीची लांबचलांब असलेली जमीन, नदी, एक शाळा.
नगर, औरंगाबाद, पुणे पासना थोड्याफार फरकानं समान अंतरावर असलेलं हे गावं. पारनेर हे राळेगण सिद्धीच्या शेजारचं गावं. शिरुर हून पारनेर ला जायला राळेगणसिद्धी हूनच जावं लागतं. राळेगण सिद्धी ला जाण्यासाठी पुणे-नगर हायवेवरुन शिरुर सोडल्यनंतर एक फाटा आहे. आतमध्ये ६-७ किमी च्या अंतरावर गावाची हद्द सुरु होते. गावात जाण्यासाठीचा इतका चांगला डांबरी रस्ता अण्णांच्या दबदब्याखाली बनवला गेलेला असल्याचं प्रकर्षानं जाणवतं. गावाच्या दिशेने जाताना चौफेर हिरवळ दिसू लागते. कधी काळी इथे पाण्याचा दुष्काळ होता, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही इतकी हिरवळ. आता संपूर्ण गावात उरलंसुरलेलं जे काही वातावरण तयार झालेलं असतं... ते आंदोलनमय.
२६ तारखेला अण्णांच्या उपोषणाला १० दिवस होत होते. याच दिवशी राळेगणसिद्दी मध्ये महाग्रामसभा ही आयोजित केली होती. पण १० दिवसांच्या पार्श्वभूमीवर इतक्या रॅली गावात येत होत्या, की गावक-यांना कार्यक्रमच बदलावा लागला. शेजारील गावातना २०-३० जणांचे घोळके पाच-दहा मिनीटांच्या कालावधीचे सारखे येतच होते. तिथे थांबलेल्या स्थानिक पत्रकारांना विचारलं तर ते म्हणाले की गेले १० दिवस हे असंच चालंलय. तरुण मुलं १०-२० फटफटीवरुन हॉर्न वाजवत यायची, तर काही भजनी मंडळं राम हरी-जयराम हरी गात यायची. काही जण अख्या ट्रक-टेम्पोनं यायची. वर अण्णांच्या सर्मथनार्थ बॅनर बांधलेला असायचं. काही जण टि-शर्ट आणि टोप्या घालून घोषणा देत यायची. पारनेर हून काही पैलवान मंडळीही इथे आली होती. जरा चौकशी केली तेव्हा कळालं की दोन दिवसांपूर्वी काही अंध व्यक्ती इथे मोर्चा घेउन आलेल्या. त्यांनी ग्रामस्थांना १०० रु. दिले आणि विनंती केली की या पैशांच्या बांगड्या सरकारला विकत घेउन द्या. काहींनी तर मुंडन करुन सरकारचं दहावं साजरं केलं होतं. काय-काय एक-एक प्रकार बघायला मिळत होते.
अशातच गावच्या मंदिराच्या समोरच एक स्टेज उभा केलेला दिसला. त्यालाच समांतर सावलीसाठी आयताकार मांडव ही घालण्यात आलेला. गेले दहा दिवस हा स्टेज आणि मांडव, राळेगणसिद्धीच्या प्रत्येक घटनेचे निर्जीव साक्षीदार आहेत. मांडवात २०-२५ खुर्च्या ठेवलेल्या. गावातली सगळी मंडळी अण्णासारख्याच पोषाखात वावरत होती. महिला आपल्या पोरांना घेउन रोडवरच बसलेल्या. स्टेजवर अर्धे भारतीय बैठकीत बसलेले, काहींनी चारपायी आणलेली. म्हातारी मंडळी त्या चारपायीवर. काही ठराविक बायका स्टेजच्या एक कडेला बसलेल्या. स्टेजच्या समोर रॅली घेउन आलेल्या गावक-यांची गर्दी. दोनशे-तिनशे माणसं स्टेजच्या इर्दगिर्द भाषणं ऐकत थांबली होती. सगळेजण क्रमाक्रमाने माईकसमोर येउन अण्णांना पाठिंबा दर्शवत होते.
गेले १० दिवस राळेगण सिद्धी बंद होतं. शिरुर एसटी बस डोपोतना बाहेर आल्यावर नगर बंद सारखंच वातावरण होतं. अशात गावात कोणा एक महाशयाने टीव्हीची सोय केली होती. काही मंडळी टिव्हीवर दिसणा-या बातम्यांचा अपडेट स्टेजवरील मंडळीना देत आणि तिथला निवेदक ते सगळ्यांना सांगी. हे झाल्यावर सगळे एका सुरात घोषणा देत आणि टाळ्या पिटत.
गावामध्ये आलेल्या रॅलींचा पाहूणचार करण्यासाठी उत्तम साळवी नावाचा माणूस तिथे होता. जयहिंद नावाची त्याची संघटना आहे, असं तो सांगत होता. हा मूळचा शिरुर चा. मारवाडी समाजातला हा उत्तम माणूस तिथल्या सर्व स्थानिकांसाठी चहा पुरवत होता. चहा साठी लागणारं दूध, पाणी, गॅस, भांडी, प्लास्टिकचे ग्लास, चहापावडर असं सगळं हा माणूस गेले १० दिवस राळेगणसिद्दी मधे स्वः खर्चातून आणतोय. तिथे येत असलेल्या समर्थकांच्या जेवणाचीही आणि राहण्याची काहीही सोय उपलब्ध नसल्याने, त्यांना काही मदत व्हावी म्हणून तो प्रयत्नशील आहे, असं लोक सांगतात.
हे सगळं पाहत असताना, भाषणं कुठेच थांबलेली नसतात. मधूनच एक लहान मुलाचा बुलंद आवाज कर्ण्यातून ऐकू येतो. दुसरीतला हा मुलगा दोन मिनीटांच भाषण देतो, वंदे मातरम चा जयघोष करतो आणि निघून जातो. विचारपूस केल्यावर कळंत की हो बालकिर्तनकार आहे. त्याला भाषण कोणीतरी लिहून दिलेलं. मुलाशी बोलायला गेल्यावर तो उत्तरतो, माझ्या बाईंनी दिलं लिहून. मग त्याचा प्रश्न - मी १०-१५ दिवस शाळेत नाही गेलो. माझी शाळा कधी चालू होणार..? 
त्याला काय उत्तर देणार मी? थोडं पुढं गेल्यावर शाळा आहे. – तिचं नाव जीवन शिक्षण मंदिर .शाळां ही त्या स्टेजच्या पासून चार पावलांच्या अंतरावर. शाळेत काही मुलं गणवेशात दिसली. ती मातीत खेळत बसलेली. शिपाई ही होते. त्यांना काही विचारण्याच्या आधीच त्यांनी तिथून पळ काढला.
नगर ला जायला गावातना आतून एक रोड गेलाय. तो खूपच अरुंद आहे. त्या दिशेने काही घर आणि वस्ती होती. गाव पाहण्यासाठी त्या दिशेने गेलो. व्यसनमुक्त गाव अशी ओळख राळेगणसिद्धी ची ऐकून होतो. पुढे जाताच ती ओळख चूकीची असलेल्याचं समजलं. एक मोर्चा नगरच्या दिशेहून येत होता. त्यातल्या ५-६ जणांना धड आपल्या पायावर चालता येत नव्हतं, इतकी त्यांनी दारु त्यांच्या पोटात गेली होती. मग निहारता निहारता असं लक्षात आलं की अर्ध्यापेक्षा जास्त लोकं पिउनच आलीयेत.
दरम्यानच्या काळात एक फॉरेन पत्रकार तिथे आला. तशी लगेचच त्याच्या दिशेने गर्दी धावली. सगळे जणं त्याच्या भोवती. थोड्यावेळाने पुन्हा सगळं होतं तस..!
थोडा आराम करण्याच्या उद्देशाने देवळात जाउन बसलो तर तिथेही सही आभियान आणि काय काय चाललं होतं. आत गेल्यावरही गर्दी. औरंगाबादचे बारस्कर नावाचे कोणी व्यंगचित्रकार आहेत त्यांची व्यंगचित्रांच प्रदर्शन त्या मंदिरात भरवण्यात आलेलं.
ते थोडावेळ पाहून तिथून निघायच ठरवलं. निघताना वाटेत बरेचसे टिव्ही रिपोर्टर मुलाखत घेत होते. मुलाखत घेताना लोक काय अगदी हावभाव देऊन कॅमेरासमोर उभे राहून प्रतिक्रिया देत होते. कॅमेराच्या पाठीमागे आल्यावर तेच लोक फिदीफीदी हसायला लागायचे. सगळंच कसं पूर्वनियोजित खेल चाललेला. हा सगळा प्रकार पाहून बरिच चीड येत होती. निघताना आणखीन एक महत्वाची बातमी अशी मिळाली ही सध्या जी ग्रामसभा राळेगणसिद्धी मध्ये अस्तित्वात आहे ती अण्णांच्या विरोधी पॅनलची निवडून आलेली आहे. आणि तरीही ती अण्णांना पाठिंबा दर्शवतेय. वरवरचा ढोंगीपणा सरळसरळ जाणवत होता. या राळेदणसिद्धीत याच दहाव्या दिवशी खरं काय आणि खोट काय अशी पत्रकं ही वाटण्यात आली. ती पत्रकांना प्रामुख्यानं वाटण्यात आली. आंदोलनकर्तांना दिल्यावर त्यांनी ती सुबक घडी घालून खिशात ठेवून दिली. यावरुनच कळंत की राळेगणसिद्दी मधल्या अर्ध्याहून अधिक लोकांनी जनलोकपाल काय हे माहित असणं तर सोडाचं पण फक्त मिडीया आपल्या गावात आहे म्हणून आपण रॅली घेउन यायच्या ...घोषणाबाजी करायची, अशा पद्धतीचा फोलपण सध्या तिथं चालूय.
लोकपाल येणारंच, सरकारला ते आणावंच लागणार सारख्या खोट्या आर्विभावात सध्या ते जगत आहेत. पिपली लाईव्ह जर का कोणी पाहिला नसेल तर त्यांनी राळेगणसिद्धी ला जावं.... आणि राळेगणसिद्धी लाईव्ह पाहावा.  

Comments