कैलासवासी कोकण...?
कोकण हा प्रदेश सह्याद्रीच्या भव्यदीव्य अशा घाटीला लागून आहेत. अशा घाटीमध्ये असलेल्या कैलाश स्वामींच वास्तव्य हे अतुल्य आहे. हर हर महादेवाच्या नाम घोषाने निनादून भारावलेली कोकणनगरी आता कैलासवासी होण्याच्या मार्गावर आहे.
कोकणातील भिन्न-विभिन्न भागामध्ये खाणकाम(मायनिंग) आणि खाणकामाशी निगडीत प्रकल्प खूप विस्तरित प्रमाणात चालू आहेत. त्या प्रकल्पांचा कोकणावर होणारा विपरीत परिणाम डोळेछाक करता येण्याइतका नाही. बॉक्साईट आणि इतर काही मॅगेनीज सारख्या खाण्यांचे प्रमाण आणि आताच्या औद्योगिकीकरण च्या युगामध्ये अशा धातूंची वाढीव मागणी विश्वासार्ह वाटते. मात्र खाणकाम करताना वापरण्यात येणारे तंत्र, खाणकामाचा निसर्गाने नटलेल्या कोकणावर होणारा परिणाम अतिशय वाईट आहे. वास्तव परिस्थितीमध्ये अशा आणि 49 खाणकाम प्रकल्पांना सरकार तर्फे परवाना देण्यात येतो, याचा अर्थ न कळण्याइतकी मति कोणाचीहि भ्रष्ट झालेली नाही.
अशा परिस्थितीला कोकणातील स्थानिक जनतेने ज्या प्रमाणात विरोध आणि टिका करायला हवी होती, ती नोंदवली गेलेली नसल्याने अशा गोष्टी जास्त फावतात, असे प्रामुख्याने दिसून येते. जैतापूर मुळे पर्यावरण हानी होईल अशा पद्धतीची आंदोलने करण्यात येत आहेत, हीच आंदोलने मायनिंग च्या संदर्भात का करण्यात आली नाहीत ? जैतापूरला मिळालेल्या प्रसिद्धीइतकी प्रसिद्धी मायनिंगसाठी होणा-या विरोधाला का करण्यात मिळू नये ? अणूउर्जा प्रकल्पांमुळे पर्यावरणाची हानी होत नाही, अशा पद्धतीचे स्पष्टीकरण जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. काकोडकर यांच्याकडून करण्यात आले, जे खूप अंशी वैज्ञानिकदृष्ट्या सकारात्मक असलं तरी यासंदर्भात आता काही निष्कर्ष काढणं कठीण आहे.
मात्र, कोकण कैलासवासी होणार आहे, अशी भीती तेव्हा निर्माण होते जेव्हा आशियातील सर्वात मोठ्या अणुउर्जा प्रकल्पाला 35-39 नॉर्म पाळण्याचे आदेश दिले जातात आणि ते पाळण्यात येतील किंवा नाही, ही साशंकता जिवंत राहण्याइतके भ्रष्ट राजकारण खेळण्यात येते, कोकणी माणसाचे दुर्व्यवहार, दिखाउपणा, थुंकलावेगिरी जेव्हा नडते, आणि मग तेव्हा कॅटरीना वादळ येते, अवकाळी पाउस येतो, भुकंपाचे धक्के बसू लागतात !
किनारपट्टीवरील मासेमा-यांना जिवंत राहण्यासाठी मारामारी करण्याची कामं करण्यास भाग पाडलं जातं. मासेमारी हा खरंतर कोकणातल्या आता प्रमुख व्यवसायांपैकी एक होत चाललाय. नवीन ट्रॉलर्सने करण्यात येणारी मासेमारी ही पारंपारिक मासेमारी करणा-यांना आव्हानात्मक आहे. ट्रॉलर्सवरनं होणारं समुद्राचं नुकसान ही अफाट आहे आणि ते नुकसान भरुन काढणही तितकंच अशक्य आहे. ट्रॉलर्सच्या फायद्यांपुढे आता निसर्गाचं होणारं नुकसान आता सगळे दुर्लक्ष करु लागलेत.
पर्यटन आणि त्याच्याशी संलग्न असलेले व्यवसाय आता कोकणात बरेच जोर धरु लागलेत. चिकार डेवलपर्स् सिंधुनगरी, आणि कुठल्या कुठल्या नगरी यांसारखे प्रकल्प अगोदरच रुजू झालेत. चार जिल्ह्यांचा कोकण. त्यातल्या ठाणे ची झालेली दुर्दशा आता इतर तिघांना – रायगड रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग यांना भोगावी लागू नये, अशी प्रार्थना कोकणवासी कुठेच करताना दिसत नाही. कोकण रेल्वे आणि मुंबई गोवा यांचा पुरेपुर फायदा कोकणा बाहेरील ट्रान्सपोर्ट आणि ट्रेडिंग वाले सर्रास घेताना दिसतात. या गोष्टी कोकणी माणसाच्या नजरेसमोर होत होत्या. पण स्वतः या स्पर्धेत उतरण्याची बुद्धी आजही त्याला होत नाहीये. कोकणचा चेहरा आता वेगानं बदलतोय.
तिथल्या माणसाची विचारसरणी बदलतेय. कोकणी माणूस व्यसनाच्या आहारी जाताना दिसतो. त्याचे भयानक परिणाम त्यांच्या कुटुंबीयांवर होताना दिसत आहेत. केरळी माणसांचा कोकणातल्या जमिनींवर असलेला डोळा आता या वस्तीवर आपला हक्क गाजवू लागलेला आहे.
आंब्याच्या बागा, नारळी पोफळीच्या बागा आणि इतर पारंपारिक घराणेशाहीचा मान राखायचा सोडून कोकणातला माणून चाकरमन्यांचा पाहूणचार करुन चार पैसे मिळवण्याच्या नादात ‘आपली माती आपली माणसं’ हा कार्यक्रम बघण्यास साफ विसरुन गेलाय. त्याला मेहनत करायची वीट आलीय. तो पैसा कमवायच्या पाठी लागलाय. यात त्याने फळांच्या राजा ला खूप मोठी सजा दिलीय. तो केविलवाणा झालाय. त्यालाही करटान खायची सवय कोकणी माणसाने लावलीय. चिबूड, फणस आणि काजू-करवंद यांनी ही जणू आपली चव न देण्याची शपथच घेतलीय. यात नुकसान कोकणच्या माणसाचंच होणार आहे. किंबहूना व्हायला सुरुवात झालेलीच आहे.
औद्योगिकीकरण सकारात्मकदृष्ट्या वाढीस आलेल असलं तरी यात कोकणातील भूमीपुत्रांचा दखल घेण्याजोगा विकास साधता आलेला नाही. मायनिंग च्या दुषित वातावरणाने कोकणी माणसाला आणि दुषित केलाय. 20-25 वर्षांपूर्वी गाव सोडलेला चाकरमनी आज आपल्या पी एफ्. आणि सेव्हींग अकाउंट मधल्या बॅलन्सने वडीलोपार्जीत जागेचे भाग करुन बंगले बांधायला लागलाय. एकत्र कुटुंब पद्धतीचा आदर्श उदाहरण म्हणून पाहिली जाणारी कोकणातील कुटुंब आता स्व-संस्कृतीचा –हास करतायत. हा नको असलेला बदल आहे. आंबा तोच आहे-फणसही तोच आहे-शहाळं आणि शहाळ्यातलं पाणी ही तेच आहे...फक्त या अमर्यादित झालेल्या बदलामुळे कोकणी माणसाचा दृष्टीकोन नको त्या गोष्टींकडे कलला आहे.
आता कोकणातला माणूस जमिनीच्या दलाली करू लागलाय. त्याचं उत्पन्नाच मुळं साधन तो आता गमावून बसलाय. शेती कशी केली जायची या आधारावर आता कोकणात कृषी विद्यापिठं निघत आहेत. कोल्हापूर कारवार येथून लोकं येउन मिळेल ती कामं सध्या करताय. आंब्यांची खानदानी बाग आता कॅनिंगला दिली जातेय. थोड्या दिवसांत कोकणातल्या माणसाला कोकणातचं पर्यटनासाठी फिरण्यास पैसे भरावे लागतील आणि तेव्हा ही त्याला त्याचा गर्व वाटावा इतका तो निगलगट्ट झालेला असेल. कोकणचा कॅलिफोर्निया करण्याची स्वप्न बघणारा कोकणी माणूस कोकणात असेल की नसेल, अशी शंका निर्माण व्हावी असे चित्र सध्या कोकणात तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. याला आताच आळा घालायला हवा. नाहीतर कोकण कोकण रव्हायच्यो न्हाय.
या वरुन असं लक्षात येतं की कोकणाचं आता वय होतंय आणि कोकण आता फक्त इतिहासामध्ये पाहता येईल. लोकं हल्ली हल्ली गोव्याला जायला म्हणून निघतात आणि वाटेत कोकण नावाचं एक ऐतिहासिक ठिकाणं असल्यासारखं इथल्या पर्यटन स्थळांना भेट देतात. तिथे फोटो काढतात. आता फोटोतनाच कोकणांच निसर्ग सौदर्य निहारता येतं तर आणि ते पाहून पर्यटक तिथे येतील की नाही अशी शंका मनात येते. शेवटी राहून राहून वाटायला लागतं की कोकणातला सह्याद्री वितळायला लागलाय आणि कोकण कैलासवासी होतोय की काय ?
Comments
प्रत्येक शेतीचा कामासाठी गडी माणसं ठेवली जात आहेत, अन अर्थातच माणूसबळाच्या अभावी दक्षिणेकडून आलेले काम मिळवून जातायत आणि कोकणी माणूस सरकारी रोजगार हमी योजनेकडे मदतीची धाव घेतोय..