जगणं लोअर टू अर्थ

एलिक्झर सोडून दोन महिने झाले. जीटीबी ला असणारी एक छोटीशी अँडएजन्सी कम डिझायनिंग स्टुडिओच. पहिल्यांदाच घरापासून बरच लांब ऑफिस. अख्खा दिवस निघून जायचा त्यात. फक्त सकाळ झालेली कळायची आणि रात्र. सकाळी साडेसात ला उठायचो. आठ सव्वा आठ पर्यंत घर सोडायचो. अंधेरी ला बाईक पार्क करायचो आणि तिथून हार्बर पकडायला यायचो. ऑफिस चा पहिला दिवस आजही जशाचा तसा आठवतोय. सकाळी ७ वाजताच घर सोडलं आणि साडेआठच्या आधीच ऑफिसमध्ये पोहोचलो. ऑफिसला टाळं होतं. शेवटी कॉरिडोरमध्ये बसलो आणि बसल्या बसल्या तिथचं झोप लागली. आमच्या बॉसचा ड्रायवर उठवायला आला आणि म्हणाला - साडे नउ पर्यंत आलं तरी चालतं. ९ वाजता ऑफिस उघडायचं. जीटीबी स्टेशनच्या अगदी बाहेर एक रेल्वे कॉलनी आहे. त्या कॉलनीच्या आसपास गाड्यांची भरपूर दुकानं आहेत. तिथेच रामविलास बंगलो होता. मोठ्ठंच्यामोठ्ठं अपार्टमेन्ट. तिथं १०००-१५०० स्केअर फिट च्या जागेत एजन्सीचा स्टुडीओ होता. माझ्याच वयातली सहा सात मुलं आणि मोजून तीन मुली. एक स्टुडीओ मँनेजर आणि बॉस कम क्रिएटीव्ह हेड कम सीईओ. एवढाच काय तो स्टाफ. एजन्सी मधली माझी ही पहिलीच नोकरी...