सुगंधी जखमा

आपला जन्म मुळातच मरण्यासाठी झालेला आहे, यावर त्याचा ठाम विश्वास होता. जगण्यासाठी जन्माला आलेल्यांना हे तो किंचाळून किंचाळून सांगू लागला होता. त्याला मरणाची एवढी ओढ लागली होती, की तो मरणावर प्रेम करायला लागला. मरण्यासाठी जगू लागला. कधीतरी श्वासांना थांबवायचंय म्हणून तो प्रत्येक श्वास मोजायला लागला. हृदयाच्या ठोक्यांचा अंतर्मुख करणारा आवाज त्याला मरणाची साद घालत होता. तल्लीन होउन, डोळे मिटून तो मरणाची वाट बघत होता. आणि तेव्हा त्याला फराज च्या दोन ओळी आठवल्या. वफ़ा के ख़्वाब मुहब्बत का आसरा ले जा अगर चला है तो जो कुछ मुझे दिया , ले जा ... कधी कोणे एके काळी तो कोणावर तरी प्रेम करुन हरला असेल. अदरवाईज अशी गझल कुणाला का आठवावी. तशाच मिटलेल्या डोळ्यांनी तो देशी दारुच्या त्या दुकानासमोर निमुटपणे जेव्हा झोपी गेला तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती. पहाटेची चाहूल लागत होती. कुत्रे आळसावलेल्या आवाजात भुंकत होते. रुममेटचा फोन लागत नाही म्हणून आम्ही तीघे त्याला शोधायला बाहेर पडलो. नेहमीच्या नाक्यांवर चक्रा मारल्या. रात्रभर धावपळ. पोलिसांत जाण्याअगोदर १० वेळा विचार केला. पोलिसांकडे जायला तशी ...